मुंबईची येत्या वीस वर्षांची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक कुंडली मांडणारा प्रस्तावित ‘विकासाचा आराखडा’ सर्वसामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो त्यांना समजणाऱ्या भाषेत म्हणजेच मराठीत उपलब्ध व्हावा, अशी मागणी जोर पकडू लागली आहे.
– सध्या हा प्रस्तावित आराखडा केवळ इंग्रजीतून उपलब्ध आहे. मात्र, अत्यंत किचकट संकल्पना आणि संज्ञा यांची भरताड असलेला हा तब्बल २१ किलो वजनाचा ‘विकास आराखडा’ मराठीतून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’चे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी थेट आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
– विकास आराखडा तयार होत असतानाही तो मराठीत भाषांतरित करण्यात यावा, असा विचार पुढे आला होता. मात्र, अनेक किचकट शब्दांमुळे व संकल्पनांमुळे तो मराठीतून भाषांतरित करणे जिकिरीचे बनणार होते. त्यामुळे, हा विचार मागे पडला. आता हा विकास आराखडा मुंबईकरांच्या माहितीकरिता व अभ्यासाकरिता खुला करण्यात येणार आहे. परंतु, तो सर्वसामान्य मुंबईकरांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवायचा असेल, तर तो त्यांना समजेल अशा भाषेत उपलब्ध व्हायला हवा, अशी मागणी देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
– मराठी भाषेचा वापर कार्यालयीन कामाकरिता केला जावा यासाठी आग्रही असलेल्या आणि पालिकेत सत्ताधारी असलेल्या ‘शिवसेने’ने आराखडा तयार होत असतानाच भाषांतराचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, इतक्या हजारो पानांचे भाषांतर करणे, तसेच त्यातील अत्यंत क्लिष्ट व इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधणे जिकिरीचे बनले असते. त्यातून आराखडय़ाच्या काही पानांची साधी फोटोकॉपी काढायची म्हटली तरी त्याला अडीच रुपये खर्च येतो. त्यामुळे, इतक्या पानांचे भाषांतर करून तो मराठीत उपलब्ध करून देणे हा मोठा व्याप होता. त्यामुळे हा विचार मागे पडला, असे शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. तरीही हा आराखडा मराठीत उपलब्ध करून देण्याबाबतचा विचार आम्ही सोडलेला नाही. किमान त्याचा सारांश तरी मराठीत उपलब्ध करून देता येईल का, असा विचार सुरू आहे.
– सध्या हा आराखडा छापील स्वरूपाबरोबरच पालिकेच्या संकेतस्थळावर, सीडी स्वरूपात उपलब्ध आहे. मराठीत भाषांतरित झाल्यास तो सीडी स्वरूपात अत्यंत स्वस्तात आणि सहजरीत्या उपलब्ध करून देता येऊ शकेल.