परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालात गैरहजर दाखविण्याची परंपरा विद्यापीठाने कायम राखत एमएच्या उपयोजित मानसशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. या शाखेची परीक्षा संपून चार महिन्यांनंतर निकाल लागला आणि निकालपत्र हातात पडल्यावर ‘वैद्यकीय मानसशास्त्र’ या विषयाच्या परीक्षेला सर्व २४ विद्यार्थी गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. चौथ्या सत्राची परीक्षा तोंडावर असताना तिसऱ्या सत्राच्या या निकालामुळे विद्यार्थी चांगलेच गोंधळले आहेत.
गेल्या वर्षभरात निकालामध्ये गोंधळाची परंपरा विद्यापीठात सुरू आहे. डिसेंबर महिन्यात पार संपलेल्या एमएच्या उपयोजित मानसशास्त्र शाखेच्या वैद्यकीय मानसशास्त्र हा विशेष विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचा तिसऱ्या सत्राचा निकाल मार्च संपत आला तरी लागला नव्हता. चौथ्या सत्राच्या तसेच एटीकेटीच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर झाले तरी निकालाचा पत्ता नव्हता. अखेर मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यामध्ये विद्यापीठाच्या विभागातील वैद्यकीय मानसशास्त्र हा विशेष विषय घेतलेल्या २४ विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक टाकल्यावर ते चुकीचे असल्याचा संदेश येत होता. यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका मिळाली. त्या वेळेस सर्व विद्यार्थ्यांना धक्का बसला. या सर्व विद्यार्थ्यांना ‘वैद्यकीय मानसशास्त्र’ या विषयात गैरहजर दाखविण्यात आले. प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांनी या विषयाची परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे चौकशी केली असता त्यांना तुम्ही परीक्षेला बसलात याचा काय पुरावा, आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवू, असे प्रश्न करत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांकडे या संदर्भात लेखी तक्रार केली आहे. एटीकेटी परीक्षा जवळ आल्यामुळे या विषयात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत की नाही हे समजल्याशिवाय केटी परीक्षा कशी देणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. या संदर्भात परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांना विचारले असता या प्रकरणाची माहिती घेऊन अधिक तपशील सांगता येईल असे उत्तर दिले.