घरात एकटय़ा असलेल्या वृद्धेची हल्लेखोरांनी हत्या केल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील दापूर येथे घडली. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापूर शिवारात विश्वास सहाणे वास्तव्यास आहेत. मंगळवारी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात मंजुळाबाई नामदेव सहाणे (७०) या एकटय़ाच होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास कोणी तरी घरात शिरले आणि त्यांनी मंजुळाबाईंची हत्या केली. मंजुळाबाईंचा नातू शेतातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. इगतपुरी पोलिसांनी धाव घेऊन श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनाही पाचारण केले. श्वानपथकाने जवळच्या रस्त्यापर्यंत माग काढला. वृद्धेची हत्या करण्यामागचे गूढ उकलण्याचा तपासयंत्रणा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी विश्राम सहाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.