गणेशोत्सवापासून सतत बंदोबस्ताच्या कामात जुंपलेल्या मुंबई पोलिसांना या दिवाळीत थोडी उसंत मिळाली असली तरी गुप्तचर खात्याकडून मिळालेला घातपाताच्या शक्यतेचा इशारा लक्षात घेऊन सतर्कता कायम आहे. दिवाळीत दीर्घ रजा दिल्या जाणार नसल्या तरी आवश्यकेतनुसार किरकोळ रजा मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे दिवाळी संपेपर्यंत बहुसंख्य पोलिसांची बंदोबस्तातून सुटका नसून त्यांची दिवाळीही बंदोबस्तातच साजरी होणार आहे. साडेतीन महिन्यांपासूनचा हा बंदोबस्त दिवाळीपर्यंत काही प्रमाणात कायम राहणार आहे.
गणेशोत्सव हा मुंबई पोलिसांची कसोटी पाहणारा सण. महिनाभर आधीपासून त्याची तयारी सुरू होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि बकरी ईद हे सण संपत नाहीत तोच निवडणुकीची धामधूम सुरू झाली आणि ४४ हजार पोलीसही बंदोबस्ताच्या त्या कामाला जुंपले गेले. कोम्बिंग ऑपरेशन, प्रतिबंधात्मक कारवाया, वाढीव गस्ती, नाकाबंदी आदी कामांत पोलीस लागले होते. गणेशोत्सवापासूनच सर्वाच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. प्रतिनियुक्तीवरील सर्व पोलिसांना बंदोबस्ताला बोलावून घेण्यात आले होते.  
एवढय़ा प्रदीर्घ ताणतणावाच्या बंदोबस्तानंतर निवांतपणा मिळणे अपेक्षित होते. परंतु गुप्तचर विभागाच्या इशाऱ्याने सतर्कता वाढली आहे. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्र्णी यांनी सांगितले की, आम्ही तुलनेने बंदोबस्त कमी केला असून त्याचे स्वरूप बदलले आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी आलेले केंद्रीय पोलीस बळ तसेच बाहेरील पोलीस परत पाठविण्यात आलेले आहेत. परंतु शहरातील बंदोबस्त कायम आहे. पोलीस दलाला सुट्टय़ा मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
 दिवाळी सणात मुंबईत घातपात घडू शकतो अशी माहिती गुप्तचर खात्याने दिली आहे. त्यामुळे पोलीस अधिक दक्ष आहेत. बाजारात या काळात मोठी गर्दी होते. तेथे साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे, आस्थापनांवर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आलेले आहे. सणासुदीच्या काळात बनावट नोटा मोठय़ा प्रमाणात बाजारात आणल्या जातात.
त्याच्यावर पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने लक्ष केंद्रित केले असून काही जणांना बनावट नोटांसह अटक झालेली आहे. हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सुटी असल्याने लोक गावी आणि फिरायला जात असतात. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढते. त्यावरही पोलीस लक्ष ठेवून असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
जातीय दंगली घडविण्याचा समाजकंटकांचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. दिडोंशी येथे एका शिवसैनिकाची मंगळवारी हत्या झाल्याने दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस अधिकच सतर्क झालेले आहेत. तेथे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
निवडणुका संपल्या म्हणजे आम्हाला शांत राहून चालणार नाही. समाजविघातक शक्ती अशाच संधीची वाट बघत असतात त्यामुळे आम्ही सतर्क आहोत. आम्ही कुठलाही धोका पत्करायला तयार नाही, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही दिवाळीत आवश्यकतेनुसार सुटय़ा मंजूर केलेल्या आहेत. दिवाळी संपल्यानंतर दीर्घ मुदतीच्या रजा देण्यात येणार आहेत. सध्या शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे, कुठलाही अनुचित प्रकार घडू न देणे यावर आम्ही लक्ष केंद्रित केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.