जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशी मराठीत म्हण आहे. भाईंदरला राहणाऱ्या सत्यप्रकाश कलवानीच्या बाबतीत ती लागू पडते. पोलिसांना निनावी फोन करून नाहक त्रास देण्याची त्याला जुनी सवय आहे. अनेकदा खोटय़ा सबबी सांगून तो वेळ मारून न्यायचा. यंदा मात्र पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली.

शनिवारी मुंबई पोलिसांच्या एसएमएस तक्रार सेवेच्या मोबाइलवर एक निनावी मेसेज आला होता. मी मुंबईत बॉम्बस्फोट घडविणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ठार मारणार आहे, असा तो मेसेज होता. या मेसेजमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि तपास सुरू झाला. निनावी फोन करणाऱ्यांना शोधण्यात तज्ज्ञ असणाऱ्या गुन्हे शाखा ८ च्या पथकाने लगेच तपास सुरू केला. ज्या मोबाइलवरून फोन आला होता त्याचा माग काढत भाईंदरला पोहोचले आणि सत्यप्रकाश कलवानी या तरुणाला ताब्यात घेतले. मुंबई पोलिसांना त्रास देण्याची त्याला सवय होती. यापूर्वी त्याने तीन वेळा अशा प्रकारे धमकीचे निनावी फोन करून खळबळ उडवून दिली होती.

सत्यप्रकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याने पत्नीसह नवघर येथील एका सराफाला गुंगीचे औषध देऊन फसवले होते. त्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तो बेरोजगार आहे. केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने तो असे धमकीचे निनावी फोन करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे, पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ, सुनील माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील, हनुमंत जोशी आदींच्या पथकाने कारवाई करून त्याला अटक केली.