मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात रेल्वेखालोखाल अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या ‘बेस्ट’च्या तब्बल १०० गाडय़ांच्या सांगाडय़ांमध्येच बिघाड झाला आहे. या खिळखिळ्या झालेल्या बसगाडय़ा रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांची हाडे मात्र दर दिवशी खिळखिळी होत आहेत. या गाडय़ांची दुरुस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे विचाराधीन आहे. मात्र या प्रस्तावात काही त्रुटी असून बेस्ट प्रशासन सर्वच माहिती समिती सदस्यांपुढे मांडत नसल्याची भूमिका घेत समिती सदस्यांनी अधिक माहितीसह सुधारित प्रस्ताव सादर करण्यास प्रशासनाला सांगितले आहे.
२००४-०५ या वर्षांत मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी)अंतर्गत बेस्टच्या ताफ्यात सुमारे ६०० बसगाडय़ा दाखल झाल्या होत्या. आता दहा वर्षांनी या ६००पैकी १०० बसगाडय़ांचे सांगाडे खिळखिळे झाले असल्याचे बेस्टच्या वाहतूक खात्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे या सांगाडय़ांची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती करण्यासाठीचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे सादर केला आहे. या प्रस्तावाबाबत माहिती देताना बेस्ट प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे या खिळखिळ्या झालेल्या सर्वच्या सर्व बसगाडय़ा सध्या रस्त्यांवर धावत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बेस्टच्या बसमध्ये प्रचंड हिसके, हादरे बसत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. या तक्रारींमागे नादुरुस्त बसगाडय़ाच कारणीभूत असल्याचे समजते. मुंबईतील रस्त्यांची अवस्था आधीच बिकट असताना त्यात भरीस भर म्हणून खिळखिळ्या बसगाडय़ांनी मुंबईकरांचे टाके ढिले होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर केला आहे.
या प्रस्तावात प्रचंड त्रुटी असल्याचे सांगत समिती सदस्य केदार होंबाळकर यांनी त्याची तपशीलवार माहिती प्रशासनाकडे मागितली आहे. सांगाडय़ांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने निविदा मागवल्या होत्या. सुरुवातीला पाच जणांनी निविदा भरल्या असताना त्यातील तिघांना अपात्र ठरवून दोघांची नावे निश्चित करण्यात आली. त्यानंतर ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात आल्या. त्या निविदांमधून दोघांची निवड झाल्याचे प्रशासनाने या प्रस्तावात म्हटले आहे. या निविदांनुसार एका बसगाडीच्या दुरुस्तीसाठी अंदाजे २.४७ लाख रुपये खर्च येणार आहे. म्हणजेच १०० बसगाडय़ांच्या दुरुस्तीसाठी एकूण २.४७ कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
प्रशासनाने नेमक्या कोणत्या मुद्दय़ावर सुरुवातीची निविदा प्रक्रिया रद्द ठरवली, सर्वच्या सर्व बसगाडय़ांना दुरुस्तीसाठी सारखाच खर्च कसा येईल, निविदा भरलेल्या पाच कंपन्यांची नावे काय, याबाबतची कोणतीही माहिती प्रशासनाने प्रस्तावात दिली नाही. त्यामुळे समिती सदस्यांचा दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, असे केदार होंबाळकर म्हणाले. त्यामुळे आता या प्रस्तावात सर्व माहिती उद्धृत करून पुढील बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
बेस्टच्या बसगाडय़ांचे आयुर्मान १५ वर्षे असते. त्यानंतर सर्वच बसगाडय़ा बेस्टच्या ताफ्यातून काढल्या जातात. ‘एमयूटीपी’अंतर्गत आलेल्या या गाडय़ांना दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची डागडुजीची कामे निघाली आहेत. ही कामे मोठी आहेत, मात्र ती न केल्यास १०० नव्या बसगाडय़ा घेण्याचा खर्च करावा लागणार आहे, असे वाहतूक प्रवर्तन विभागाचे उपमहाव्यवस्थापक रविकांत देशपांडे यांनी सांगितले.