परळच्या ‘आर. एम. भट शाळे’च्या १९४७ पासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा नुकताच झालेला ‘पुन्हा एकदा शाळेत’ हा कार्यक्रम स्मृतींना उजाळा देण्याबरोबरच विधायकही ठरणार आहे.
सर्वत्र मराठी शाळांची पीछेहाट होत असली तरी आपली शाळा टिकली पाहिजे, असा निर्धार आर. एम. भटच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. शाळेची रंग उडालेली इमारत, पोपडे धरलेल्या भिंतींना पुन्हा साजरे रूप आणण्याबरोबरच शाळेची विद्यार्थिसंख्या टिकवून ठेवण्यासाठी माजी विद्यार्थी कंबर कसणार आहेत. त्यासाठी प्रत्येक बॅचने एकेका कामाची जबाबदारी घेऊन ते तडीस न्यावे, असे ठरले आहे.
रविवारी (१८ जानेवारी) शाळेत झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात शाळेच्या १९४७ पासूनच्या किमान सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. या सर्व बॅचेसचे ५० ते ६० गट तयार करून त्यांच्यामार्फत शाळेचा विकास करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. या प्रत्येक बॅचने वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालयाची जबाबदारी घेऊन तिचे काम पूर्णत्वाला न्यायचे या वेळी ठरले.
या मेळाव्याच्या निमित्ताने ‘व्हिजन, २०१८प्लस’मध्ये शाळेचा कायापालट कसा करता येईल, याचा एक डिजिटल दस्तावेजच तयार करण्यात आला आहे. मेळाव्याच्या दिवशी तो सर्व माजी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. तो पाहून अनेकांनी तिथल्या तिथेच आर्थिक मदत देऊ केली. परंतु, पैशापेक्षाही विधायक स्वरूपाची मदत आपल्याला हवी आहे. त्यासाठी या कामात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आवाहन या सोहळ्याच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे अजित सावंत यांनी केले.
आपल्या काळात शाळा जशी होती तशीच ती आजही आहे. अगदी प्रत्येक वर्गातला सरस्वतीचा फोटो, बाक, फळा, कचऱ्याचा लाकडी डबादेखील ‘जैसे थे’ तसेच आहेत. हे सर्व बदलण्याची गरज आहे. त्यामुळे, प्रत्येक बॅचने व्हॉट्सअपवर एक ग्रुप तयार करावा. या माध्यमातून शाळेच्या विकासाकरिता काय काय करता येईल, याची चर्चा करावी. एकेका बॅचला एखादी वर्गखोली किंवा प्रयोगशाळा दत्तक घेऊन तिचा विकास करता येईल, अशी सूचना सावंत यांनी केली आहे.