बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगणाऱ्या एका आरोपीला लठ्ठपणामुळे अनेक रोगांनी ग्रासलेले आहे. या त्रासातून मुक्ती मिळविण्यासाठी या आरोपीने स्थूलत्व कमी करणारी शस्त्रक्रिया करून घेण्यास संमती द्यावी, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. आत्माराम डेंगळ असे आरोपीचे नाव असून अहमदनगरमधून २००६ मध्ये त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली होती. कनिष्ठ न्यायालयाने त्याला या गुन्’ााबद्दल जन्मठेप सुनावली तर २०१२ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ती शिक्षा कमी करून आठ वर्षे केली. आत्माराम येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. अवघ्या २७ वर्षांच्या आत्मारामला सध्या लठ्ठपणाच्या समस्येने घेरले आहे. सध्या त्याचे वजन १४५ किलोपेक्षाही अधिक असून दिवसेंदिवस ते वाढतच आहे. परिणामी रक्तदाब, मधुमेह, श्वासाचा त्रास, रक्ताच्या गाठी होणे आदी विकारांनी त्याला जखडले आहे. कैदी म्हणून तुरुंगातील दैनंदिन काम करताना त्याला अनेक अडचणी येतात. या समस्यांना कंटाळून आत्मारामने तुरुंगातही ‘फिट’ राहता यावे, याकरिता स्थूलत्व कमी करणारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांनी त्याला तशी सूचना केली असून ही शस्त्रक्रिया तातडीने केली नाही, तर त्याच्या जीवाला धोका असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळेच आत्मारामने उच्च न्यायालयाशीच पत्रव्यवहार करून आपली ही कैफियत मांडली आहे. या शस्त्रक्रियेसाठी आपली ९० दिवसांच्या तात्पुरत्या जामिनावर सुटका करावी, अशी विनंतीही त्याने न्यायालयाकडे केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने सुरुवातीला आत्मारामच्या विनंतीबाबत आश्चर्य व्यक्त केले. मात्र नंतर येरवडा तुरुंग अधीक्षकांना आत्मारामचा वैद्यकीय अहवाल दोन आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
काय होते प्रकरण!
पैशांचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आत्मारामसह २० आरोपींनी तिच्यावर वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. स्नेहालय या संस्थेने हे प्रकरण उघडकीस आणले. या प्रकरणात स्थानिक पातळीवरील अनेक राजकीय नेते आणि व्यावसायिक गुंतले होते. त्यामुळेच प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात आला.