टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शोज्च्या कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहिल्यावर हे प्रेक्षक नेमके येतात तरी कुठून हा प्रश्न पडतो. यांना खास या कार्यक्रमांसाठी वेळ कसा मिळतो हाही प्रश्नच असतो. थोडं आश्चर्य वाटेल पण खास हे प्रेक्षक आणण्यासाठी काही ठरावीक माणसं काम करीत असतात. या प्रेक्षकांना शूटिंगच्या दिवसाचे मानधन तर मिळतेच; वर जेवणाची सोयही केली जाते.
पूर्वी मर्यादित रिअ‍ॅलिटी शोमुळे प्रेक्षकांची संख्याही थोडीच असे. परंतु आता रिअ‍ॅलिटी शोंची संख्या भरमसाठ वाढली आहे. सर्वच चॅनेलवर रिअ‍ॅलिटी शो चालू आहेत. परंतु या शोमध्ये प्रेक्षक म्हणून जरी चमकायचे असले तरी तुम्ही ‘ग्लॅमरस’ असणे आवश्यक आहे, असा निकष नव्याने तयार होऊ लागला आहे.
स्वाभाविकच अशा प्रेक्षकांसाठी कॉलेजला युवकांचीच निवड केली जाते. आता ही निवड करतानाही तुम्ही किती ग्लॅमरस आहात व कॅमेराला कसे सामोरे जाल हे लक्षात घेतले जाते. त्यामुळेच आता प्रेक्षक जमविणाऱ्या ‘कोऑर्डिनेटर्स’ची भंबेरी उडू लागली आहे. आजवर कोऑर्डिनेटर्स प्रेक्षक आणताना या गोष्टी विचारात घेत नव्हते. परंतु आता मात्र प्रेक्षकाचं वय, त्याच दिसणं आणि त्याचं ग्लॅमरस असणं या सर्व गोष्टी विचारात घ्याव्या लागत आहेत.  खासकरून हिंदी चॅनलवर दिसणारे प्रेक्षक बहुभाषिक आणि ग्लॅमरस असावेत अशी मागणी करण्यात येत आहे. ‘झलक दिखला जा’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून तरूण मुलीच असायला हव्यात, अशी मागणी करण्यात येत असल्याचेही समजते. या मुली आकर्षकही असायला हव्यात, असाही आग्रह असतो.

असे असते प्रेक्षकांचे मानधन
मराठी प्रेक्षकांचे मानधन- ४०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत.  
हिंदी प्रेक्षकांचे मानधन- १००० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत.
कामाचे तास- शूटिंग सुरू असेपर्यंत. सकाळी ८ ते रात्री १० किंवा त्यापेक्षा जास्त वेळ.