‘भावबंध’ हा वसंत राऊत यांचा कवितासंग्रह आहे. या सबंध कवितासंग्रहात प्रेमजाणीव व प्रेमातील विरहार्तता प्रकट झाली आहे. आयुष्यातील तारुण्यावस्थेपासून प्रेमाची लागण झाल्यानं निवृत्तीनंतरही ही सल कवीमनाला पोखरतच राहिलेली आहे. मराठी कवितेत पतंगापरी दीपशिखेवर झडप घालून प्राण देणारा प्रियकर सांगणारे होनाजी बाळा, प्रेमाचे शाहीर गोविंदाग्रज, अनिल, मर्ढेकर, तर अर्वाचीन मराठी कवितेत ही जाणीव रविकिरण मंडळ, ना.घ. देशपांडे, ना.धों. महानोर, ग्रेस यांच्या कवितेतही निसर्ग जाणिवेतून प्रेमजाणीव प्रकटत गेली आहे. स्त्रीसौंदर्य कवितेचा आत्मा झाला आहे. आजही प्रेमकवितेत अंगार आणि श्रृंगार चितारला जातो, हे लक्षात घ्यावं लागतं. वसंत राऊत यांची कविता अंतर्मनातील भावबंध उलगडताना ती निसर्गातही रममाण होते. प्रेयसी, स्त्री, निसर्ग यात यौवनसुलभ रंगधून त्यांनी उधळली आहे. प्रेमजाणीव प्रकट करताना हा कवी कुठंही बंड करीत नाही, तर विरह काळजात पेरून आयुष्यभर कवितेतून तो सयंतपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रेमभंगाचं खापरही तो कुणावर फोडत नाही, तर त्या दु:खाचा आघात मनावर रेखून त्यातील आर्तता प्रकट करीत जातो. स्वप्नभासात रमणारं मन नकार मिळाल्यानं रक्तबंबाळ होतं. आपल्या प्रेयसीला लग्नमंडपात निरोप देताना स्वत:चा नैतिक पराभवही पत्करतं. आज प्रत्येकाला जिंकावसं वाटत असताना, प्रेम ओरबाडून घ्यावसं वाटताना व क्रौर्यानं समकालीन वास्तव माखलं असताना पुन्हा प्रेमातील तत्त्वज्ञान मांडण्यात कवी राऊत यशस्वी होताना दिसून येतात. वाङ्मयीन मूल्यांकनात ही कविता सुमार आहे. प्रतिमा व प्रतीकांचा वापर त्यांच्या काव्यशैलीत फारसा रमला नाही. प्रांजळपणा व उतरत्या वयातली प्रेमाची ही दुखरी सल कुणाला सांगितली पाहिजे, या भावनेतून हा ‘भावबंध’ प्रकटला आहे. महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमीनं ‘भावबंध’ प्रकाशित केला असून त्यात ५५ कविता आहेत. विद्यावाचस्पती डॉ. चंद्रभान भोयर यांचा अभिप्राय, तर डॉ. रेखा वडिखाये यांची प्रस्तावना लाभलेला हा कवितासंग्रह वाचकांना प्रेमाच्या गावात नेण्यास हातभार लावणारा आहे. प्रफुल्ल बावणे यांचं मुखपृष्ठ असून किमतीचा उल्लेख कुठंही नाही.
दुसरे कवी तात्याजी राखुंडे यांचा ‘काव्यबोध’ ३५ कवितांचा व ३६ पृष्ठसंख्या असलेला काव्यसंग्रह अंकुर साहित्य संघ यवतमाळ येथून प्रकाशित झाला आहे. कवी जिल्हा परिषदेत लिपिक पदावरून निवृत्त झाल्यानं अनेक ओळखीच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक आविष्कार व्यक्त करणाऱ्या पुरवण्या सुरुवातीला जोडल्यानं एकंदरच ‘नाकापेक्षा मोती जड’ झाल्याचं निदर्शनास येतं. कधीकधी ‘काव्यबोध’ हा कवितासंग्रहापेक्षा ‘गौरवकाव्यग्रंथ’च असल्याची शंका येते. राखुंडे यांना काव्यरचनेचा शौक आहे. त्यामुळे कवितासदृश्य काव्य लिहिलं गेलं. त्यात ते मश्गूल आहेत. सांसारिक जीवन जगताना झालेलं आकलन कवीनं साध्या सोप्या शब्दात व्यक्त केलं आहे. आईविषयी कृतज्ञता, गरिबीची झळ, माणसांचा लळा व परमेश्वरप्रेम त्याभोवती कवीची कविता फिरताना दिसते. शिक्षण, स्त्री दशा, महापुरुष, मानवता, सुखदु:ख, जीवनातील नाती, पर्यावरण, वार्धक्य, कन्येचा जन्म, आई, नववधू, ममत्व, व्यसन, क्रांती, तरुण अशा आलबेल स्वरूपाच्या उपदेशपर व प्रसंगपर शब्दांना कडव्यात गुंफलं आहे. ‘पत्त्यांमधला चौकट राजा’ या ओळीनं प्रियकराला ते संबोधताना प्रेमातील विरहात्मकता प्रकट करतात. पराभवानंतर विजय ही जीवनाची खरी रीत आहे, हा जगण्याचा मंत्र सहजच देऊन जातात. बेकारी हा समाजाला शाप आहे, तर गरिबी हे पाप आहे, हा सामाजिक आशयही ते व्यक्त करतात. ‘काव्यबोध’ कुठल्याही वाङ्मयीन निकषांवर उतरत नाही. ती हौसेनं मिरवणारी कविता आहे. अनेक विषय त्यात आहे व ते विषयाचे गारुडच अधिक वाटतं.