‘सौ का चार.बोलो..सौ का चार..’ मुंबईच्या कुठल्याही गजबजलेल्या रेल्वेस्थानकांवर संध्याकाळच्या दरम्यान ही आरोळी ऐकू येते. टी-शर्ट्स आणि शर्ट्सचा ढीगासमोर एखादा पोरगा मोठय़ाने ओरडत असतो. इतक्या स्वस्त किंमतीमध्ये टी-शर्ट्स किंवा शर्ट्स मिळत आहेत म्हणून लोकांचीसुद्धा झुंबड उडाली असते. एकीकडे महागाई वाढली आहे, छोटय़ा दुकानांमध्येसुद्धा कपडय़ांचे भाव २५० ते ३०० रुपयांच्या खाली नसतात, मग या फेरीवाल्यांना इतक्या स्वस्तामध्ये कपडे विकणे परवडते तरी कसे, हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही.
हा चोरीचा माल तर नाही किंवा कुणी वापरून टाकलेल्या कपडय़ांना खपवण्याचा उद्योग तर नाही, असा प्रश्नही पडतो. त्यात तो पोरगा ‘मॅडमजी एक्स्पोर्ट का माल है’ असेही सांगत असतो. या सर्व कपडय़ांचे मूळ असते अमेरिकेसारख्या देशांमध्ये. अमेरिका – युरोपातील अनेक देशांमध्ये लाँड्रीमध्ये जाऊन कपडे धुण्याच्या खर्चापेक्षा नवीन कपडे घेणे स्वस्ताचे असते.  प्रत्येक दुकानांमध्ये या जुन्या कपडय़ांचा साठा वेगळा करून ठेवला जातो आणि आफ्रिकन देशांमध्ये देणगीच्या स्वरुपात पाठवला जातो. प्रत्यक्षात हे सर्व कपडे आफ्रिकेतील गरीब जनतेला मिळण्याऐवजी आशियातील भारत, बांगलादेश, पाकिस्तान अशा देशांमध्ये पाठवले जातात. तेथे हे कपडे ‘एक्स्पोर्ट क्वालिटी’ कपडय़ांच्या रुपाने विकले जातात.
‘मुबंईमध्ये न्हावाशेवा बंदरावर अशा कपडय़ांचे कंटेनर्स येत असतात. प्रत्येक कंटेनरमध्ये साधारणपणे ४० ते ५० हजार कपडे असतात. यात प्रामुख्याने टी-शर्ट्स आणि शर्ट्सचा साठा असतो. घाऊक व्यापारी हे कंटेनर्स एका टी-शर्टमागे साधारणपणे ५ रुपये या हिशेबाने २ ते ३ लाखांमध्ये खरेदी करतात,’ अशी माहिती एका स्थानिक कपडे व्यावसायिकाने दिली. पुढे शिवडी, रे रोड येथे कपडे धुवून, त्यांचे पॅकिंग केले जाते आणि नंतर हे कपडे बाजारात विकायला आणले जातात, असेही त्यांनी सांगितले. हे सर्व सोपस्कार करण्यासाठी प्रत्येक टी-शर्टमागे व्यापाराला १० ते १५ रुपये खर्च येतो. व्यापाऱ्याला हा माल आपल्याकडे साठवून ठेवण्यात रस नसतो. त्यामुळे तो मिळेल त्या भावात हे कपडे विकण्यास प्राधान्य देतो. त्यामुळे फेरीवाल्यांना हेच कपडे २० ते ३० रुपयांना मिळतात. यावर तीन ते पाच रुपयांचा नफा जोडून ग्राहकांना हे कपडे विकले जातात, असे एका सूत्राने सांगितले.
कित्येकदा व्यापारी कपडे धुण्याची किंवा पॅकिंगची तसदीही घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा खर्चही वाचतो. अशा प्रकारे हे कपडे आपल्यापर्यंत साधारणपणे २५ ते ३५ रुपयांपर्यंत उपलब्ध होतात. म्हणूनच स्टेशनवर १०० ते २०० रुपयांना चार या भावाने हे कपडे विकणे फेरीवाल्यांना परवडते. तसेच काही छोटय़ा दुकानांमध्ये वार्षिक किंवा सहामाही सेलच्या वेळी हा माल स्वस्त दरात विकायला काढला जातो आणि एक्स्पोर्टचा माल म्हणून आपल्या माथी मारला जातो. या कपडय़ांना मध्यमवर्गीय कुटुंबामधून मागणी असतेच, पण महाविद्यालयांत जाणारी तरुण मंडळी सुद्धा ‘स्वस्त आणि मस्त’ म्हणून हे कपडे विकत घेण्यास प्राधान्य देतात.त्यामुळे पुढच्यावेळी स्वस्त कपडे खरेदी करताना नक्की ते आले कुठून आले, याचा विचार करायला विसरु नका.