सिडको निर्मिती मोडकळीस आलेल्या पाच हजार घरांचा प्रश्न, घनकचरा साफसफाई वाहतूक कंत्राटाचे रखडलेले काम, प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करण्याचा प्रस्ताव, झोपडपट्टीसाठी पुनर्विकास योजना यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काहीही न करता रुग्णालयातील बाह्य़रुग्ण कक्ष (ओपीडी) का सुरू केली यासारख्या प्रश्नावर नवी मुंबई काँग्रेसने सोमवारी आपल्या नौटंकीचे दर्शन घडविले.
भौगोलिकदृष्टय़ा सरळ रेषेत असणाऱ्या नवी मुंबईत नागरी सुविधांची व्यवस्थादेखील प्रत्येक नोडमध्ये वेगळी करावी लागत आहे. काल-परवापर्यंत प्रथम नागरी आरोग्य केंद्र असणारी नेरुळ, ऐरोली, बेलापूर येथील रुग्णालये तोडून त्या ठिकाणी संदर्भ रुग्णालय बांधण्यात आलेली आहेत. या रुग्णालयांची कामे रखडली असून आता अंतर्गत वैद्यकीय सुविधांमुळे ती अधिक लांबणीवर गेलेली आहेत. त्यामुळे स्थापत्य कामे झालेल्या या टोलेजंग इमारतीतील आरोग्य सेवा सुरू करावी, अशी सर्वसामान्यांचंी अपेक्षा आहे. वैद्यकीय सुविधांच्या नावाखाली ही रुग्णालये आणखी सहा महिने उशिराने सुरू होणार असल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यालयाचे घाईघाईत काम आटोपून त्याचे उद्घाटन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे. बेलापूरमधील या मुख्यालयाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या कामाबाबत घाई न करता योग्य वेळी लोकार्पण करण्याचा सल्ला पालिका प्रशासनाने दिला आहे, पण रुग्णालयाच्या तळमजल्यावर बाह्य़रुग्ण कक्ष (ओपीडी) सुरू करावा यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा अट्टहास असून तो त्यांनी मागील दोन दिवसांत पूर्ण केला. या कामाचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली घाई स्थानिक गरीब रुग्णांच्या पथ्यावर पडत आहे. असे असतानाच काँग्रेसने मात्र विरोधात जाण्याचा पवित्रा घेऊन ओपीडीच्या उद्घाटन कार्यक्रमात विरोधी सूर लावला. स्थानिक काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ येथील बाह्य़रुग्ण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ओपीडी सुरू करण्यास मज्जाव करताना संपूर्ण रुग्णालय सुरू करण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी २५ कार्यकर्त्यांना अटक केली आणि नंतर सोडून दिले.