जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि प्रामुख्याने धान्य वितरण व्यवस्थेशी संबंधित तीन संगणक व एक प्रिंटर पुन्हा एकदा चोरटय़ांनी गायब करून प्रशासनाला आव्हान दिले आहे. मागील दोन ते तीन वर्षांत जिल्हाधिकारी कार्यालयातून संगणक चोरीला जाण्याची ही पाचवी घटना आहे. सेतू कार्यालयाकडून वितरित झालेल्या बनावट शिधापत्रिकांच्या चौकशीचे काम सध्या सुरू असताना संगणक चोरीला गेल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी होणे ही काही नवीन घटना नाही. ज्या ज्या वेळी एखाद्या विभागाच्या कारभाराची चर्चा होऊ लागते, चौकशी सुरू होते, त्या त्या वेळी याआधीही संगणक कार्यालयातून चोरीला गेले आहेत. त्या प्रकरणांचे पुढे काय झाले हे अनुत्तरित असताना पुन्हा एकदा संगणक गायब होण्याची घटना घडली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कोषागार भवनच्या लगत धान्य वितरण अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी तीन संगणक व एक प्रिंटर गायब केले. दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटय़ांनी आतमध्ये प्रवेश केला. मुख्य प्रवेशद्वारालगत असणाऱ्या कार्यालयातील या घटनेची गंधवार्ता सुरक्षारक्षकांना नव्हती. सकाळी हा प्रकार उघड झाला. कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी संबंधित कार्यालयात भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकास पोहोचण्यास उशीर झाला. दरम्यानच्या काळात ठसेतज्ज्ञांनी संशयितांच्या हाताचे ठसे घेण्यासाठी पावडर टाकली. यामुळे जेव्हा श्वान पथक कार्यालयात पोहोचले, तेव्हा त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही.
शहरातील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणाचे काम या कार्यालयातून चालते. त्याच्याशी संबंधित माहिती संगणकांमध्ये समाविष्ट असल्याचे सांगितले जाते. जिल्हा पुरवठा विभागाच्या अखत्यारीतील कार्यालयातून संगणक चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे. मागील तीन वर्षांत वन कायदा विभाग, तहसीलदार कार्यालयातील रोजगार हमी विभाग, निवडणूक शाखा यातील संगणक चोरटय़ांनी गायब केले होते. काही महिन्यांपूर्वी सेतू कार्यालयातून हजारो बनावट शिधापत्रिका वितरित झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून चौकशीचे काम सुरू आहे. या घडामोडींचा संगणक चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे काय यावर चर्चा सुरू असली तरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्यात तथ्य नसल्याचे सांगितले. सेतू कार्यालयातील बनावट शिधापत्रिकांची माहिती धान्य वितरण अधिकारी कार्यालयातील संगणकात असण्याचे काही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या चोरीप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या कार्यालयातून संगणक गायब झाले, त्यालगत राष्ट्रीयीकृत बँक असून तिथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत, परंतु इमारतीतील अंतर्गत दिवे बंद असल्याने त्यात काही चित्रण झाल्याची शक्यता नसल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयातून सातत्याने होणाऱ्या संगणकाच्या चोरीने कायदा व सुव्यववस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.