९७ व्या घटना दुरुस्तीमुळे नवीन सहकार कायद्यात त्या त्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या स्वातंत्र्यांचा वापर कसा करावयाचा हे सभासदांनी ठरवायचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी येथील प्रबोधन कार्यशाळेत केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सहकार व्यासपीठ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ, जळगाव जिल्हा उपनिबंधक, जळगाव जिल्हा बँक, जळगाव जिल्हा सहकारी मंडळ, यांच्या वतीने जिल्हा सहकारी कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा बँकेच्या नाटय़गृहात झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्य़ातील ७०० सहकार कार्यकर्ते व संस्था पदाधिकारी सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी   रवींद्र पाटील होते. जिल्हा सहकार    मंडळाचे     बापूसाहेब   देशमुख यांनी   प्रास्तविक   केले.     दिनदर्शिका  व पुस्तिकेचे   प्रकाशन   या    वेळी करण्यात आले.
आ. चिमणराव पाटील, मुंबईचे विद्याधर अनास्कर, पुण्याचे प्रभाकर पंडित आदींची भाषणे झाली. मंडळाचे उपाध्यक्ष नारायण चौधरी यांनी आभार मानले. संतोष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.