वाळू चोरटय़ांचा धुमाकूळ थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून ग्रामीण भागात पसरलेले हे लोण आता शहरापर्यंत पोहोचले आहे. अवैधपणे वाळू वाहतूक करणारी मालमोटार रोखल्यानंतर नाशिकरोड-देवळाली कॅम्प रस्त्यावर दोघा संशयितांनी गस्ती पथकाला दमदाटी करत शिवीगाळ केली. नंतर मालमोटार सोडून संशयितांनी पलायन केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव व येवला परिसरात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. मागील काही दिवसात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावणे, धक्काबुक्की करणे, पकडलेली मालमोटार त्यांच्यासमोर घेऊन जाणे, मालमोटार अंगावर घालणे असे प्रकार घडले आहेत. ग्रामीण भागात दादागिरी करणाऱ्या वाळू माफियांनी शहराच्या हद्दीत हा पवित्रा स्वीकारला आहे. अवैध पध्दतीने वाळूचे उत्खनन आणि वाहतूक जोमात सुरू आहे. वाळू माफियांना अटकाव घालण्यासाठी गस्ती पथके सक्रिय करण्यात आली आहेत. बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नाशिकरोड-देवळाली कॅम्प रस्त्यावर मालमोटारीतून वाळुची वाहतूक होत असल्याचे मंडल अधिकारी प्रवीण गोडामे यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या लक्षात आले. त्यांनी मालमोटार थांबवून कागदपत्रांची मागणी केली असता रामा खंडू विंचू आणि शांताराम यांनी ती दाखविली नाहीत. संबंधितांकडे कागदपत्रे नसल्याचे लक्षात आल्यावर पथकाने मालमोटार जप्त करण्याचा निर्णय घेतला. हे पाहून संतापलेल्या संशयितांनी पथकाला शिवीगाळ केली. मारण्यासाठी अंगावर धावून जिवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पथकाने या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. दरम्यानच्या काळात संशयित पसार झाले. या प्रकरणी मंडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांची वाळूने भरलेली मालमोटार जप्त करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, याआधी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकाविण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडले आहेत. वाळूने भरलेल्या मालमोटारीचा पाठलाग करणाऱ्या तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांच्या अंगावर मालमोटार घालण्याचा प्रयत्न नांदगाव तालुक्यातील अनेकवाडे येथे घडला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चालकासह किशोर व बंटी परदेशी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.
येवला-कोटमगाव रस्त्यावर उपविभागीय अधिकारी वासंती माळी आणि तलाठी प्रतिभा नागलवाड यांी वाळून भरलेला डंपर थांबविल्यावर दमदाटीचा प्रकार घडला होता. डंपर मालक किशोर परदेशी याचा मुलगा बंटीने धमकावत पकडलेली मालमोटार नेली होती.
या घटनेनंतर देवळा तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांच्या वाहन चालकाला वाळूमाफियांनी धमकावत धक्काबुक्की केली. गिरणा पात्रात वाळू काढण्याचा प्रयत्न रोखण्यास गेलेल्या प्रांताधिकारी व त्यांचा वाहन चालकाबाबत हा प्रकार घडला. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदीपात्रातुन अवैध वाळूचे उत्खनन आणि वाहतूक जोमात सुरू आहे. या प्रकारांना पायबंद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना वाळूमाफिया जुमानत नाहीत. नाशिकरोड येथे घडलेल्या प्रकाराने ही बाब पुन्हा अधोरेखीत केली आहे.