‘ऑक्टोबर हीट’च्या तडाख्यात प्रचार करताना उमेदवार व नेत्यांची अक्षरश: दमछाक होत असली तरी आता केवळ चार दिवसांचा अवधी राहिल्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात प्रचार सभांचा एकच धुराळा उडविण्यास सारेच सरसावले आहेत. टळटळीत उन्हाच्या चटक्यांची पर्वा न करता काही नेत्यांनी तर एकाच दिवशी सलग चार ते पाच सभांचा धडाका लावण्याची व्यूहरचना केली आहे. अखेरच्या टप्प्यात शुक्रवार या एकाच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अशा दिग्गज नेत्यांच्या सभा होत असल्याने वातावरण ढवळून निघण्याच्या मार्गावर आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर रिंगणात उतरल्यामुळे प्रत्येकाचा कस लागला आहे. त्यात ऐन ऑक्टोबर महिन्यात प्रचार करावा लागत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते व नेतेमंडळींची तारांबळ उडाली आहे. नाशिकमध्ये मध्यंतरी ढगाळ वातावरण होते. दोन ते तीन दिवस पाऊसही बरसला. त्याचा फटका एकदा नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला बसला. रद्द होऊन पुन्हा आयोजिलेल्या सभेवेळी पावसाने हजेरी लावली. मात्र, तेव्हा त्याच स्थितीत ही सभा घेण्यात आली. पाऊस वा ढगाळ हवामानाचे मळभ काहीसे बाजूला सारले गेले असून टळटळीत उन्हाची अनुभूती पुन्हा येऊ लागली आहे. नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार भागात तापमानाचा पारा सध्या ३० ते ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. या वातावरणात भेटीगाठी, प्रचार रॅली, चौक सभा आदी माध्यमांतून उमेदवारांनी दररोज प्रचार चालवला असला तरी आपल्या मतदारसंघात किमान एखादी जाहीर सभा व्हावी, अशी प्रत्येकाची मनीशा आहे. परंतु, प्रचारास मिळालेला अल्प कालावधी आणि संपूर्ण राज्यातील दौरे यामुळे प्रत्येक ठिकाणी सभा होईलच, याची शाश्वती देण्यास कोणताही पक्ष तयार नाही. त्यावर काही राजकीय पक्षांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांची फौज प्रचारात उतरवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
प्रचारसभांचा धडाका लावण्यासाठी भाजपने पंतप्रधानांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात धाडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यासह माकप व बसपानेही शक्य तितक्या जाहीर सभा घेण्याकडे लक्ष केंद्रित केले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीतर्फे माजी कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे तर शिवसेनेच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम, शिवसेनेचे खा. संजय राऊत आदी नेते मंडळींच्या सभा पार पडल्या आहेत. अखेरच्या टप्प्यात अधिकाधिक सभा घेऊन वातावरण अनुकूल बनविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. यामुळे शुक्रवार ते जाहीर प्रचाराचा अंतिम दिवस म्हणजे सोमवापर्यंत जिल्ह्यात विविध पक्षांतील नेतेमंडळींच्या सभांची मांदियाळी राहणार आहे.
अंतिम टप्प्यात सर्वपक्षीयांच्या प्रचार तोफा धडाडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत जाहीर सभा घेणार आहेत. सकाळी अकरा वाजता सटाणा, दुपारी साडेबारा वाजता दिंडोरी, तीन वाजता चांदवड, सायंकाळी पाच वाजता मनमाड आणि सायंकाळी पावणेआठ वाजता पवार यांची जाहीर सभा नाशिकरोड येथे होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी दुपारी बारा वाजता वणी येथे सभा होणार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा याच दिवशी सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. डावी लोकशाही समिती पुरस्कृत उमेदवाराच्या प्रचारार्थ माकपचे राष्ट्रीय सचिव शमीम फैजी यांची सभा दुपारी दोन वाजता चांदवडच्या बाजारतळ येथे तर सायंकाळी सहा वाजता नांदगावच्या महात्मा फुले चौकात होईल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेसाठी शनिवारचा दिवस निवडला आहे. गंगापूर रस्त्यावरील शिवसत्य मैदान, सिडकोतील संभाजी स्टेडिअम तसेच जेलरोड येथील लोखंडे मळा मैदान या ठिकाणी राज यांची सभा होईल. काँग्रेसतर्फे पुढील चार दिवसात नारायण राणे, बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभांचे आयोजन केले जाणार आहे.