सरबजित सिंग हत्येच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान आसिफअली झरदारी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शिवाजी चौकात सरणावर तिरडी ठेवून दहन करण्यात आली.    
पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याचा मृत्यू झाला. ही पाकिस्तानने केलेली हत्या आहे, असा आरोप करून मनसेने शुक्रवारी शहरात आंदोलन केले. पाकिस्तानचे पंतप्रधान झरदारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी बनविण्यात आली. भवानी मंडपातून निघालेली अंत्ययात्रा शिवाजी चौकात पोहचली. तेथे शेणी, लाकूड रचून सरण बनविण्यात आले होते. त्यावरच तिरडी ठेवून तिचे दहन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानाच्या नावाने शंखध्वनी केला.    
झरदारी यांना दहशतवादी घोषित करावे, भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी कैद्यांना फासावर चढवावे, सरबजित सिंगचा शहीद म्हणून केंद्र शासनाने गौरव करावा अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात संपर्क प्रमुख यशवंत किल्लेदार, जिल्हाप्रमुख अभिजित साळोखे, शहरप्रमुख राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील, उमेश घोरपडे, नीलेश लाड, रणजित वरेकर, नीलेश धुमाळ, मनजित सराटे, राजू समर्थ, विशाल पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.