खडकपुरा, वंजारवाडा या भागात दूषित पाणी व घाणीचे साम्राज्य पसरल्याच्या कारणावरून हिंगोली नगरपालिका कार्यालयात  शुक्रवारी सकाळी शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी तोडफोड केली. नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य अधिकारी भरत राठोड यांच्या दालनांसह खिडक्या व दरवाजांच्या काचा फोडल्या. या तोडफोडीमुळे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार पालिकेतील शिपाई लक्ष्मण चवरे यांनी शहर पोलिसांकडे केली. या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख अशोक नाईक यास अटक करण्यात आली. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेसंबंधी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक, भाजपाचे नगरसेवक गणेश बांगर (पहेलवान) तसेच गोपाल अग्रवाल व इतर ६ ते ७ जणांनी नगरपालिका कार्यालयात प्रवेश करून पालिकेतील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कक्षासमोरील प्रवेशद्वार, झाडांच्या कुंडय़ा, खिडक्यांवरील काचा, पंखे, अग्निशामकची टाकी, टय़ूबलाईटची तोडफोड केली. पालिकेतील संकीर्ण विभाग, शहरी रोजगार विभाग, नागरी सुविधा केंद्र आदी  कक्षांच्या खिडक्यांवरील काचाची व खिडक्यांची तोडफोड केली.
माहिती मिळताच पोलीस उपाअधीक्षक सुनील लांजेवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पालिका कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख अशोक नाईक यास पोलिसांनी अटक केली आहे.