नवीन शौचालये बांधण्यासाठी जुनी पाडली.. आता गेली दोन वर्षे शौचालयच नाही अशी अवस्था आरे कॉलनीतील वस्त्यांची झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडलेला असला तरी प्रशासकीय उदासीनतेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आरे कॉलनीतील काही वस्त्यांवरील शौचालयांचे बांधकाम पूर्ण न झाल्याने उघडय़ावर प्रात:विधी उरकावा लागत आहे. त्यातच या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्यामुळे येथील रहिवासी धास्तावले असून केवळ १० टक्केकाम उरलेले असतानाही ते तातडीने पूर्ण होत नसल्याने मुंबई महानगरपालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे.
आरे कॉलनीमधील गौतम नगर, दुर्गा नगर आणि प्रजापूर पाडा या वस्त्यांमध्ये सुमारे दोन हजार संरक्षित झोपडय़ासदृश घरे आहेत. पूर्वी या वस्त्यांसाठी तीन ठिकाणी प्रत्येकी २० शौचकूप असलेली पक्क्या शौचालयांची व्यवस्था होती. पालिकेच्या मुंबई स्वच्छ अभियानाअंतर्गत मुंबई मलनिस्सारण प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जुनी शौचालये पाडून तेथे पक्की नवी शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आरे कॉलनी पशू आणि दुग्धव्यवसाय खात्याच्या अखत्यारीत येत असल्यामुळे तीन ठिकाणी शौचालये बांधण्यासाठी या खात्याची रीतसर परवानगी घेण्यात आली. त्यानंतर २०१३ मध्ये ही तिन्ही शौचालये तोडून टाकण्यात आली. मात्र ही शौचालये तोडताना पर्यायी व्यवस्था म्हणून रहिवाशांसाठी कच्च्या स्वरूपाची शौचालये बांधण्यात आली.
जून २०१४ पर्यंत नव्या शौचालयांचे ९० टक्के बांधकाम पूर्णही झाले. त्यामुळे लवकरच नवी दुमजली शौचालये उपलब्ध होतील, असा आशावाद या परिसरातील रहिवाशांना वाटत होता.
मात्र आरेच्या प्रशासनाने या बांधकामास हरकत घेतली आणि जून २०१४ मध्ये शौचालयांचे बांधकाम थांबविण्यात आले. रहिवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या कच्च्या शौचालयांची आता दुर्दशा झाली आहे. दुसरी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसल्याने रहिवाशांवर आता उघडय़ावरच प्रात:विधी उरकण्याची वेळ आली आहे.
गौतम नगर, दुर्गा नगर, प्रजापूर पाडा हा परिसर जंगलसदृश आहे. या परिसरात रात्री-अपरात्री बिबटय़ाचा वावर असतो. त्यामुळे या वस्त्यांमधील रहिवाशांना रात्री जीव मुठीत घेऊन राहावे लागते. नव्या शौचालयांचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे आणि पर्यायी शौचालयांची दुर्दशा झाल्यामुळे रहिवाशांची कुचंबणा होऊ लागली आहे.
बिबटय़ाच्या संचारामुळे पहाटे आणि रात्री अंधारात उघडय़ावर शौचालयाला जाणे जिवावर बेतू शकते. त्यामुळे लवकरात लवकर शौचालये बांधून द्यावीत, अशी मागणी वारंवार रहिवाशांकडून करण्यात येत आहे. परंतु आरे प्रशासनाच्या आक्षेपामुळे गेले नऊ महिने बांधकाम बंद झाले आहे. या विभागातील लोकप्रतिनिधींनीही शासन आणि पालिका दरबारी रहिवाशांचे गाऱ्हाणे पोहोचविले. पण प्रशासनातील ढिम्म अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सुरू आहे.
आरे प्रशासनाने आपली परवानगी न घेताच हे काम सुरू केल्याचा आल्याचा आक्षेप घेतला आहे. मुळात पशू आणि दुग्ध व्यवसाय विभागाने परवानगी दिली असल्याने आरे प्रशासनाने असा आक्षेप घेणे योग्य नाही. गेले नऊ महिने प्रशासकीय अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे बांधकाम बंद पडले आहे. लहान मुले आणि महिलांची प्रचंड कुचंबणा होत असून जंगलात रात्री-अपरात्री शौचालयासाठी जाणे धोकादायक बनले आहे. तब्बल दोन हजार घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांचा प्रश्न तातडीने शौचालयांचे बांधकाम पूर्ण करून सोडवावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक बाळा नर यांनी केली आहे.