असुरक्षितता, अस्वच्छता आणि अव्यवस्था ही तीन नकारात्मक वैशिष्टय़े लक्षात ठेवूनच महिलाच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पाय ठेवावा लागतो.
एकतर मुंबईतील झाडून सर्व स्वच्छतागृहांबाहेर पान, लॉटरी इ. केवळ पुरूष गिऱ्हाइकांचा राबता असलेल्या टपऱ्या हमखास असतात. त्यामुळे ‘अडलेल्या’ बाईला कायम या टपऱ्यांवरच्या नजरा चुकवूनच आत पाय ठेवावा लागतो. त्यातून बहुतेक सर्वच ठिकाणी महिला कर्मचारी नसल्याने एकटय़ादुकटय़ा महिलेला सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये पाय ठेवण्याची भीतीच वाटावी.
या कारणांमुळे बोरिवली स्थानकाबाहेरील पालिकेच्या शौचालयात महिला येतात त्या अभावानेच. या ठिकाणी दिवसभरात केवळ १५ ते २० महिला येतात. यापैकी बहुतांश स्त्रिया भीक मागणाऱ्या तरी असतात किंवा रस्त्यावरच फुटकळ वस्तू विकून पोट भरणाऱ्या फेरीवाल्या तरी असतात. एखादी नोकदार महिला शौचालयात येताना अभावानेच आढळते. या ठिकाणी महिला कर्मचारीच नाही आहे. पण, पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने आत जाऊ की नये असा प्रश्न पडतो, असे बोरिवलीच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या विनीता मेहता सांगतात. सांताक्रुझ स्थानकाबाहेरील महिला स्वच्छतागृहाचीही हीच गत आहे. इथे सायंकाळी पुरेसे पाणी नसल्याने स्वच्छतेची बोंब असते.
अस्वच्छतेमुळे बहुतांश महिला अत्यंत गरज असतानाही सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे फिरकत नाहीत. अस्वच्छ शौचकुप्या, गलिच्छ वातावरण यामुळे स्वच्छतागृहांमध्ये जाणे नकोसे वाटते, असे गोरेगावमध्ये राहणाऱ्या रूपाली कुलकर्णी सांगतात. अर्थात स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वे प्लॅटफॉर्मवरील महिला स्वच्छतागृहांपेक्षा पालिकेची स्वच्छतागृहे बरी असतात. पण, ती आणखी स्वच्छ असायला हवी, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
स्वच्छतागृहांच्या खूप कमी असल्याचा फटका महिलांना बसतो. कारण, बहुतेक स्वच्छतागृहांमध्ये एकाच छताखाली महिला व पुरुषांसाठी सोय केलेली आढळते. पुरुषांसाठी चार किंवा त्याहून अधिक शौचकुप्यांची सोय असते. पण, महिलांची स्वच्छतागृहे एक किंवा दोनच. यामुळे मालाड स्थानकाबाहेरील एकुलते एक महिला स्वच्छतागृह सकाळच्या किंवा सायंकाळच्या वेळेस होणाऱ्या महिलांच्या गर्दीच्या वेळेस अपुरे पडते, असे या परिसरातील दुकांनामध्ये साफसफाईची कामे करणाऱ्या सोनाली परमार सांगतात.