नव्या पिढीच्या नव्या संकल्पांपैकी सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या आणि आरोपप्रत्यारोपांच्या वादात अडकणारा एक विषय म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’. दीर्घकाळ लग्न न करताही एकत्र राहणाऱ्या या जोडप्यांना वैवाहिक दाम्पत्यांचा दर्जा देण्यात येऊ शकतो, असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. इतकेच नव्हे तर, जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्ता, संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा अधिकारही त्यांना मिळतो असेही न्यायालयाने या वेळी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची चर्चा कॉलेज कट्टय़ापासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र गाजली. एकीकडे ही ‘नव्या पिढीची थेरं’ असल्याची मते मांडली जात असताना तरुणाई मात्र वैवाहिक जोडप्यांप्रमाणेच या जोडप्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याच्या आपल्या मतावर ठाम असल्याचे चित्र आहे. 

मुंबईच्या शुभांकर जाधवने, समाजाच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. बदलत्या काळाप्रमाणे आपण पेहरावापासून ते संवादापर्यंत विविध माध्यमांमध्ये बदल आणले. पूर्वी पत्रांनी संवाद साधणारी पिढी आज मोबाइलवर संपर्क करू लागली आहे. अशा वेळी स्त्री-पुरुषांच्या नात्याच्या व्याख्यांमध्येही बदल करण्याची गरज आजच्या समजाला आहे. तरच आपण बदलत्या काळाप्रमाणे स्वत:ला बदलू शकतो, असे त्याचे म्हणणे होते.
पुण्याचा एकोणतीस वर्षांचा नीरज गोगाटे स्वत: गेली काही वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाला त्याचा पूर्णपणे पाठिंबा आहे. लग्नाप्रमाणेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये एक अलिखित करार असतो. या नात्यामध्ये गुंतण्यापुर्वी त्याच्याबद्दल पूर्ण विचार त्यांनी केलेला असतो. त्यामुळे एखाद्या वैवाहिक जोडप्याप्रमाणेच तेही त्यांच्या नात्याबद्दल गंभीर असतात. केवळ लग्नाचे विधी झाले नाहीत, त्यामूळे त्यांच्या आर्थिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा हक्क त्यांच्या नातेवाईक आणि समाजाला नसतो असे त्याचे मत आहे.
लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी त्यांच्या नात्याचा अधिक गंभीरपणे विचार करतात. कारण, त्यांना त्यांच्या निर्णयामुळे समाजाच्या रोषालाही समोरे जायचे असते. अशा वेळी त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दलचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार समाजाने दिले पाहिजेत असे या तरुणांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे जेव्हा एखादे जोडपे दीर्घकाळासाठी एकत्र राहत असते, तेव्हा जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा अधिकार त्याच्या जोडीदाराला मिळालाच पाहिजे असे मुंबईची अनिशा खारकर सांगते. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या या जोडप्यांचे नाते त्यांच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी स्वीकारलेले असते. लग्न केले नसले, तरी वैवाहिक जोडप्याप्रमाणेच ही जोडपीही एकमेकांच्या सर्व जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडतात. त्यामूळे ज्याप्रमाणे लग्नानंतर नवरा-बायकोला जोडीदाराच्या संपत्तीत वाटा मिळणे हा अलिखित नियम असतो, त्याप्रमाणेच लिव्ह इन जोडप्यांनाही हे अधिकार मिळालेच पाहिजेत असे तिचे मत आहे.