नाशिक लोकसभा मतदारसंघातील १२८ टंचाईग्रस्त गावे, वाडे, पाडय़ांना पाणी देण्यासाठी खा. समीर भुजबळ यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून या सर्व ठिकाणी विंधनविहिरी आणि हातपंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी टंचाईच्या काळात या गावांना भुजबळ फाऊंडेशनने टँकरने पाणीपुरवठा केला होता. तसेच भूजल सव्‍‌र्हे व विकास यंत्रणा विभागाने सर्वेक्षण केलेली गावे, वाडय़ा, पाडे यांचा त्यात समावेश आहे. विंधन विहीर घेणे व हातपंप बसविण्याची कामे मतदारसंघातील चार तालुक्यांत होणार आहेत. नाशिक २४, त्र्यंबकेश्वर २७, सिन्नर ४७, इगतपुरी ३० याप्रमाणे एकूण १२८ ठिकाणी विंधनविहिरी आणि हातपंप बसविले जाणार आहेत.