‘लघू व मध्यम उद्योगांकरिता नवीन संधी’ या विषयावर गुरुवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संघटनेच्या पश्चिम विभागातर्फे हॉटेल अजिंठा अॅम्बेसेडर येथे ही कार्यशाळा होणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, सीएमआयए या उद्योजकांच्या संघटनांनी या कार्यशाळेला सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
लघू व मध्यम उद्योग देशाच्या औद्योगिक क्षेत्राचा कणा आहे. सर्वाधिक उत्पन्न याच गटातून होते. निर्यातीतही लघू आणि मध्यम उद्योग आघाडीवर आहेत. रोजगार निर्मितीही याच क्षेत्रात होते. अशा उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरिता भांडवल उभारणीचा प्रश्न सोडविता यावा म्हणून शासनाने नवीन तरतुदी केल्या आहेत. अशा कंपन्यांना बाजारपेठेत रोखे उभारून भांडवल उभारणी शक्य होणार आहे. बीएसई तसेच एनएसईमध्ये नोंदणी करून कंपन्या त्यांचे रोखे बाजारात आणू शकतात. लहान उद्योगांना बिनव्याजी भांडवल उपलब्ध होऊन त्यांची क्षमता वाढू शकेल, यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. लघु-मध्यम उद्योगाच्या प्रवेशामुळे कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाऊंटंट तसेच कॉस्ट अकाऊंटंट या व्यावसायिकांनाही मोठय़ा प्रमाणावर काम उपलब्ध होणार आहे. मराठवाडय़ात लहान व मध्यम उद्योग मोठय़ा प्रमाणावर आहेत. व्यवसाय वृद्धीसाठी या कार्यशाळेचा त्यांना उपयोग होऊ शकतो. मराठवाडय़ाच्या गरजांचा विचार करून या कार्यशाळेत चर्चा होणार आहे. शेअर बाजारात आयपीओ आणण्याची पात्रता, त्या विषयीची तांत्रिक माहिती, त्यासाठीच्या तरतुदी व इतर तांत्रिक बाबींवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आशिष चव्हाण, आयसीएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस. एन. अनंत सुब्रमण्यम, पश्चिम विभागीय अध्यक्ष महावीर लुणावत व इतर अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आशिष गुप्ता (९४२३१४७९१७) यांच्याशी अथवा २४५११२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष महेश सिंघी यांनी केले.