‘मी दिल्लीतील एका विवाह समारंभाला गेलो होतो. बडय़ा- वलयांकित व्यक्तीच्या कुटुंबातील विवाह असल्याने थाटमाट तर होताच, मी तटस्थपणे सगळे बघत होतो. दहा हजार लोकांना निमंत्रण होते व किमान ३५ प्रकारच्या खाद्यपद्धतींतील, तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ तेथे पाहुण्यांसाठी ठेवले होते. या एवढय़ा अन्नाचे नेमके काय होते हे मला बघायचे होते. नंतरचा प्रकार पाहून धक्काच बसला. अनेक लोकांनी अर्धवट खाऊन टाकलेल्या ताटल्यांमधील अन्नाचे ढीग कचऱ्यात पडत गेले. त्या अन्नात किमान दहा हजार जण त्या रात्री जेवून सुखाने झोपी गेले असते, पण माझी मात्र झोपच उडाली. जागतिक कंपनीतील चांगली नोकरी सोडून मी लोकांची भूक मिटवण्याच्या कल्पनेचा ध्यास घेतला..’ अंकित कवात्रा या पंचविशीतील अन्नदात्याची ही सत्यकथा आहे. त्यांना अलीकडेच ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बकिंगहॅम पॅलेस येथे ‘तरुण नेतृत्व पुरस्कारा’ने सन्मानित केले.

यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी दिला जाणारा ‘संयुक्त राष्ट्रे तरुण नेतृत्व पुरस्कार’ त्याला मिळाला होता. एकंदर १८ हजार अर्जातून त्याची त्या वेळी निवड झाली होती. जागतिक कंपनीतील ऐषारामाची नोकरी त्याला मिळाली होती, पण संवेदनशील मनाने त्याच्यातील मानवतेला साद घातली, त्यातूनच भुकेल्या लोकांची क्षुधाशांती करण्यासाठी ‘फीडिंग इंडिया’ ही संस्था त्याने स्थापन केली आहे. ही स्वयंसेवी संस्था आता भारतातील ४३ शहरांत ४५०० स्वयंसेवकांमार्फत १३.५० कोटी लोकांना जेवण पुरवते.

आपल्याकडे वाया जाणाऱ्या अन्नाची किंमतच ३.७५ कोटी आहे. त्यामुळे एका परीने मानव सेवा करताना अंकित अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहे. एकीकडे श्रीमंतीचे ओंगळ दर्शन, तर दुसरीकडे उपासमारी व कुपोषण अशी टोके आपल्याला याच समाजात दिसतात. अन्नाचे फेरवाटप करून भुकेच्या प्रश्नाशी ते दोन हात करीत आहेत. एड्स, मलेरिया व क्षयाने जेवढे लोक मरत नाहीत, तेवढे उपासमारीने मरतात. कुपोषणाने दर वर्षी देशात ३१ लाख मुले मरतात, तर जगात ही संख्या १६.१ कोटी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते जगात नऊपैकी एक मृत्यू हा कुपोषणाने होत असतो. कवात्रा यांनी गेल्या दोन वर्षांत अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यापैकी ‘द मॅजिक ट्रक’ या २४ तास वातानुकूलित असलेल्या वाहनात शहरातील दान केलेले अन्न गोळा केले जाते. अनेक अन्नदान केंद्रे व मुलांसाठी आश्रमशाळा त्यांनी सुरू केल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पाच जणांच्या मदतीने स्थापलेल्या संस्थेचा पसारा वाढला आहे. लंडनमधील वास्तव्यात त्यांची अनेक मानवतावादी दानशूर व उद्योगधुरीणांशी भेट झाली, त्यामुळे त्यांच्या या चळवळीला बळ येणार यात शंका नाही. अंकितची ही चळवळ आता स्थानिक पातळीवर पोहोचते आहे. शेफ रितू दालिमया व मनजित गील, टीव्हीवरील ‘हायवे ऑन माय प्लेट’चे मयूर शर्मा, अनेक फूड ब्लॉगर्स, हॉटेल्स यांनी त्यांच्यापाठीमागे शक्ती उभी केली आहे.

जगातील ४० टक्के अन्नापैकी किमान १३ अब्ज टन अन्न वाया जात असते. आपण एकीकडे अन्नधान्य उत्पादनासाठी खते व इतर पद्धती वापरू न त्याचे प्रमाण वाढवायचे अन् दुसरीकडे अन्नाची नासाडी हा वेगळा विरोधाभास आहे. अन्न वाया घालवू नका, ते गरजूंना द्या, हा संदेश हळूहळू लोकांच्या ‘पचनी’ पडू लागला आहे, अर्थात यात अंकितसारख्या तरुण वयात मोठी समज असलेल्यांचे श्रेय आहे, यात शंका नाही.