चित्रपट समीक्षकाचे कधीच पुतळे उभारले जात नाहीत. अनेकांचे सेलिब्रेटीपद घडविणे त्यांच्या हाती असले, तरी ते कधीच सेलिब्रेटीपदी पोहोचू शकत नाहती. चित्रपट कसाही असला  तरी तो पाहणे आणि उत्साह-निरुत्साहाच्या स्थितीतही तटस्थता जपून शब्दविलास साधणे ही अनिवार्यता त्याच्या भाळी कायमची लादलेली असते. एकोणीसशे सत्तरच्या दशकात जागतिक साहित्यांत-चित्रपटांत आणि एकूण कलाप्रांतात जी बंडखोरी निपजली त्यात चौकटींच्या सीमेवर राहून जग पाहणे आणि दाखविणे समीक्षेला गरजेचे वाटू लागले. प्रसिद्ध समीक्षक बॅरी नॉर्मन यांनी मुद्रित माध्यमातून बीबीसीमध्ये झेप घेतली, तेव्हा जागतिक समीक्षापटलावर अमेरिकी पगडा होता. न्यूयॉर्करच्या पॉलिन केल आणि शिकागो सन टाइम्सच्या रॉजर एबर्ट यांचे सिनेसमीक्षणाच्या प्रांतावर अढळ  सम्राज्य होते. पुढे एबीसी वाहिनीवर एबर्ट आणि सिस्केल या जोडीने मोठय़ा प्रमाणावर सिनेपरीक्षणाच्या कार्यक्रमाला मनोरंजनाची धार दिली. ‘थम्ब्स अप’, ‘थम्ब्स डाउन’ या कौतुक-टीकेच्या संकल्पना या टीव्ही शोंमुळे जगभरात पोहोचल्या होत्या. न्यूयॉर्करमध्ये पॉलिन केल यांची दहा-पंधरा पानांची चित्रपटाची सढळ विच्छेदनी समीक्षा नुसत्या चित्रपटासोबत आयुष्य आकलनाच्या कैक गोष्टी सांगत होती.  त्या तगण्याच्या अवघड काळात बॅरी नॉर्मन यांनी आपली समीक्षा रुजविलीच नाही, तर लोकप्रियही केली.

ब्रिटनमधील सुसंस्कृत आणि सुसंपन्न कुटुंबात १९३३ साली जन्मलेल्या नॉर्मन यांनी पदवीनंतर देशात आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये काही वर्षे वृत्तपत्रकारितेमध्ये उमेदवारी केली. आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये परतल्यावर सिनेपत्रकारितेत त्यांनी आपली वाट तयार केली. डेली स्केच, डेली मेल हे पल्ले पार पाडत गार्डियन वृत्तपत्रात समीक्षा करताना स्वत:ची नर्म-विनोदी आणि खुसखुशीत शैली तयार केली. या बळावर त्यांचा बीबीसीमध्ये शिरकाव झाला. १९७२ साली सुरू झालेला त्यांचा सिनेसमीक्षणाचा टीव्ही शो १९९८ पर्यंत अव्याहत सुरू होता. मुद्रित आणि टीव्ही या दोन्ही माध्यमांमध्ये त्यांच्या सिनेसमीक्षणांना वजन होते. ते त्यांनी जराही कमी होऊ दिले नाही. मुलाखतीत तत्कालीन सुपरस्टार रॉबर्ट डिनीरो यांना अडनिडे प्रश्न विचारून त्यांची नॉर्मन यांनी पंचाईत करून टाकली होती. हॉलीवूड ‘दीवा’ (नायिका आणि गायिका) मॅडोनाचे पॉप आणि सिनेमा क्षेत्रात मोकाट प्रसिद्धी गोळा करीत असताना नॉर्मन यांनी एक तास चाळीस मिनिटे उशिरा आली म्हणून मॅडोनाची मुलाखत घेण्यासच चक्क नकार देऊन टाकला. इतकेच नाही, तर वेळोवेळी माज दाखविणाऱ्या तारांकित मंडळींचे गर्वअपहरण करून त्यांना औचित्याचे धडे दिले. सिनेमा या कलेचे पापुद्रे अलगद उलगडत असताना बॅरी नॉर्मन यांनी ब्रिटिश आणि अमेरिकी या दोन्ही सिनेमांमध्ये झालेले आमूलाग्र बदल अभ्यासले. या काळातच कलात्मक आणि व्यायसायिकतेच्या सीमारेषेवर ब्रिटिश-अमेरिकी सिनेमा वावरत होता. प्रचंड प्रयोग चित्रपटांमध्ये होत होते आणि त्याचे मूलस्थान अमेरिका होते. स्टुडिओंचे प्राबल्य कमी होऊन इंडिपेण्डंट सिनेमा बाल्यावस्थेत का होईना तयार होत होते. या काळात नॉर्मन यांनी आपल्या समीक्षेचा विकास केला. बीबीसीच्या चित्रपट समीक्षेचे वृत्तांकनासारखेच कौतुक होऊ लागले, ते नॉर्मन यांच्या समीक्षेमुळे. १९९० नंतर  समालोचन आणि कार्यक्रम सादरीकरणाचे जुने पारंपरिक ठोकताळे बदलले. त्यातही नॉर्मन यांची समीक्षा नवे आयाम शोधू पाहत होती.

आजच्या नेटयुगातील यू-टय़ूब-ट्विटरवरील चित्रपट समीक्षा गांभीर्याने घेत असणाऱ्या काळात नॉर्मन यांच्या निधनाची घटना मोठी झाली आहे, ती त्यांनी करून ठेवलेल्या समीक्षेने. त्यामुळे स्मारक नाही झाले, तरी त्यांचे स्मरण पुढल्या पिढीला कायम राहील.