ओडिशासारख्या राज्यातील आजच्या कलावंतांनी पारंपरिक कलांचाच अभिमान बाळगायचा की आजचे आणि ‘आपले’ कामही करायचे, या प्रश्नाला डॉ. दीनानाथ पथी सर्वागांनी भिडले. सोमवारी त्यांची निधनवार्ता आली. मात्र, परंपरा आणि नवता याबद्दलच्या प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे म्हणजे उडिया भाषेतील त्यांच्या कादंबऱ्या, तसेच इंग्रजीत ओडिशाच्या कलेतिहासाबद्दल त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि या राज्यात १९५० ते २००० या काळात झालेल्या चित्र/ शिल्प उन्मेषांचा वेध घेणारे ‘लेट अ थाउजंड फ्लॉवर्स ब्लूम’ हे त्यांनी संपादित केलेले पुस्तक- त्यांच्या जाण्यानंतरही आपल्यासह असतील. ‘‘हल्ली प्रत्येक राज्यातली चित्रे एकसारखीच वाटतात.. हे खपते, म्हणून सारे एकाच प्रकारची चित्रे करतात. चित्रकलेतला हा ‘बॉलीवूड सिंड्रोम’च म्हणायचा!’’ अशी त्यांची आग्रही, पण मार्मिक निरीक्षणे आता ऐकू येणार नाहीत; पण आग्रहीपणेच कॅनव्हासऐवजी रेशमी कापडावर त्यांनी काढलेली चित्रे यापुढेही पाहता येतील.

चित्र, नाटय़, नृत्य या कलांचा वारसा १९४२ साली जन्मलेल्या दीनानाथ यांना घरातूनच मिळाला. स्वातंत्र्योत्तर काळात भावाने ‘शिल्पी कला मंदिर’ नावाची नाटय़संस्था काढली, तेथे पडदे रंगवण्यापासून रंगभूषाकारापर्यंतची अनेक कामे बालवयात त्यांनी केली. हेच दीनानाथ पुढे भुवनेश्वर विद्यापीठातून इतिहासात; तर शांतिनिकेतन येथून कला-इतिहासाची पीएच.डी. मिळवून ओरिसाच्या राज्य कला संग्रहालयात कला-कारागिरी विभागचे क्युरेटर (१९७२-७९) झाले. मग ओरिसा पर्यटन विभागात विभागीय संचालक (१९७९-८४) झाले. याच काळात ओरिसातील आधुनिक कलेचे एक अध्वर्यू म्हणून त्यांचे नाव होत होते. भुवनेश्वरमध्ये ‘चित्रम’ हे कला महाविद्यालय स्थापण्यातही त्यांचा पुढाकार होता. भुवनेश्वरलाच सरकारी कला महाविद्यालयाची स्थापना १९८४ मध्ये झाली, तेव्हापासून त्या संस्थेचे प्राचार्यपद त्यांनी दशकभर भूषविले. दिल्लीतील (केंद्रीय) ललित कला अकादमीचे सचिव म्हणून १९९४ ते ९६ ही दोन वर्षे काम केल्यावर पुढली दोन वर्षे ते ‘नेहरू फेलो’ होते. या काळात त्यांनी जर्मनभाषक कलेतिहासकार एबऱ्हार्ड फिशर यांच्यासह तसेच स्वतंत्रपणे, ओरिसाच्या कला-परंपरांबद्दल १० पुस्तके लिहिली. ‘वर्किंग आर्टिस्ट्स असोसिएशन ऑफ ओरिसा’ या संस्थेशी स्थापनेपासून संबंधित असणाऱ्या दीनानाथ यांचा आणखीही अनेक संस्थांशी संबंध आला. स्वत:च्या एका कादंबरीला ‘धर्मपाल पुरस्कार’ हा उडिया भाषेतील सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार मिळाला नाही, त्यावरही ‘दिने ना दाकिबु धर्मा बोली’ ही उपरोधिक लघू कादंबरीच त्यांनी लिहिली.

देशाला, पर्यायाने जगाला ओदिशातील कला-परंपरांची आणि राज्याला त्याच्या नव्या उन्मेषांची जाणीव करून देणारा अभ्यासक-कार्यकर्ता डॉ. दीनानाथ पथी यांच्या निधनाने हरपला आहे. अशी माणसे जिवंतपणी कुणाला संधिसाधू किंवा अहंमन्य वाटली, तरी त्यांच्या कामामुळे कला क्षेत्राचे भलेच होत असते.

((  दीनानाथ पथी  ())