देशातील अंतर्गत सुरक्षिततेचे प्रश्न दिवसागणिक गंभीर स्वरूप धारण करीत असताना ते हाताळण्याची मुख्य जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदाची धुरा राजीव राय भटनागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. छत्तीसगड येथील नक्षलवादी हल्ल्यात या दलाचे २६ जवान शहीद झाले. जवळपास दोन महिने केंद्रीय राखीव पोलीस दल पूर्णवेळ कर्णधाराविना कार्यरत होते. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या दलाच्या महासंचालकपदी स्थायी स्वरूपात नियुक्ती केली. देशातील विद्यमान स्थिती लक्षात घेतल्यास भटनागर यांच्यासमोरील आव्हानांची सहजपणे कल्पना येईल.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती होण्याआधी ते अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. भारतीय पोलीस सेवेतील १९८३ च्या तुकडीतील ते वरिष्ठ अधिकारी. उत्तर प्रदेश संवर्गातून ते सेवेत दाखल झाले. ३० डिसेंबर १९५९ रोजी भटनागर यांचा जन्म झाला. विज्ञान शाखेची पदवी आणि तत्त्वज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेतले. मद्रास विद्यापीठात ‘संरक्षण व सामरिक शास्त्र’ या विषयात एम. फिल केले. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, आग्रा, कानपूर, गोरखपूर परिक्षेत्रात काम केले. गृह विभागाचे विशेष सचिव, उत्तर प्रदेश पोलीस भरती मंडळ, गुप्तचर यंत्रणा, गुन्हे शोध, तांत्रिक सेवा अशा महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारी सांभाळली. १९९५-९९ या कालावधीत मॉरिशस सरकारचे ‘पोलीस सल्लागार’ म्हणून त्यांनी काम केले. २००३ ते २००८ या काळात भारत-तिबेट सीमा पोलीस दलात प्रतिनियुक्तीवर विशेष महानिरीक्षकपदाची धुरा सांभाळली. राष्ट्रीय पोलीस मोहिमेचे ते पहिले संचालक होते. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भटनागर यांना भारतीय पोलीस पदक, राष्ट्रपती पोलीस पदकासह गुणवत्ता पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. ७७ वर्षांच्या गौरवशाली इतिहास लाभलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे दल प्रदीर्घ काळापासून बंडखोरांविरुद्ध लढा देत आहे. २४० बटालियनचा अंतर्भाव असणारे देशातील हे सर्वात मोठे निमलष्करी दल. त्यामध्ये शीघ्र कृती दल (आरएएफ), कोब्रा, सिग्नल, संसद सुरक्षा यांसह महिलांच्या बटालियनचाही अंतर्भाव आहे.

दलात तब्बल तीन लाखांहून अधिक अधिकारी व जवान कार्यरत आहेत. जम्मू-काश्मीरसह नक्षल प्रभावित क्षेत्रात कार्यरत दलास साहित्य व उपकरणांच्या तुटवडय़ाला तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निराकरण भटनागर यांना करावे लागणार आहे. नक्षलग्रस्त भागात ठप्प होणारी विकास प्रक्रिया हा देखील चिंतेचा विषय. नक्षलवादी गटांनी उत्तर-पूर्व भागातील विप्लववादी घटकांशी संपर्क प्रस्थापित करून प्रभाव वाढविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. उत्तर-पूर्व राज्यांमध्ये विप्लववादी घटक कार्यप्रवण आहेत. या सर्व आव्हानांचा सामना करताना केंद्रीय राखीव पोलीस दलास भटनागर यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा नक्कीच उपयोग होईल, हे निश्चित.