जागतिक इतिहासात अ‍ॅडॉल्फ हिटलर, फिडेल कॅस्ट्रो, मुअम्मर गडाफी, इदी अमीन, पोल पॉट ते किम जुंग द्वितीय हे हुकूमशहा युद्धखोर म्हणूनही गाजले. यांच्या युद्धखोरीमुळे हजारो लोकांना आपले प्राण त्या त्या काळात गमवावे लागले. पण तत्कालीन सोविएत युनियनचे कर्नल स्तानिस्लाव पेत्रोव्ह यांना जग ओळखते ते अणुयुद्ध टाळणारे योद्धा म्हणून. सुमारे ३४ वर्षांपूर्वी त्यांनी अमेरिकेविरोधातील संभाव्य अणुयुद्ध टाळल्याने मोठा अनर्थ टळला होता.

पेत्रोव्ह यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३९ मध्ये व्लादिवोस्टोक येथे झाला. शालेय शिक्षण सुरू असतानाच वडिलांप्रमाणे त्यांनाही हवाई दलात जाण्याची इच्छा होती. त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात लढाऊ विमानांचे सारथ्य केले होते. हवाई दलाच्याच कीव्ह हायर इंजिनीअरिंग कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवली. नंतर गुणवत्तेवर त्यांना हवाई दलात रुजू करून घेण्यात आले. १९७० च्या दशकात नाटो देशांकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्याची आगाऊ सूचना मिळणारी यंत्रणा सोविएत युनियनने आपल्या संरक्षण दलात आणली होती. त्या यंत्रणेची सर्व जबाबदारी पेत्रोव्ह यांच्यावर टाकण्यात आली होती. त्यांच्यावर सोपवलेले काम महत्त्वाचे आणि तितकेच जोखमीचेही होते.

शीतयुद्धाचा तो काळ तसा सैन्यदलातील अधिकाऱ्यांसाठी नेहमी तणावाचाच होता. १९८३ च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतून दक्षिण कोरियाकडे जाणारे एक प्रवासी विमान सोविएत युनियनने तेव्हा पाडले होते. हे विमान हेरगिरीच्या मोहिमेवर असल्याचा संशय आल्याने सैनिकांनी ते पाडले व त्यातील सुमारे २७० प्रवाशांचा कोळसा झाला. अमेरिका या हल्ल्याने संतप्त झाली व तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून सोविएत युनियनवर आण्विक हल्ला करण्याची तयारी सुरू केली आहे, अशी जोरदार चर्चा जगभरात सुरू झाली. असा हल्ला झालाच तर किती भयंकर विनाश घडेल याचे आडाखे बांधले जाऊ लागले. अमेरिका आणि सोविएत युनियन यांच्यात शाब्दिक खडाजंगी सुरूच होती.

मग उजाडला २६ सप्टेंबर १९८३ चा दिवस. कर्नल पेत्रोव्ह हे तेव्हा मॉस्को येथील ‘सीक्रेट कमांड सेंटर’मध्ये कामावर होते. त्यांची कामाची वेळ संपण्यास थोडाच अवधी उरला असताना अमेरिकेने एक-दोन नव्हे तर पाच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे मॉस्कोच्या दिशेने डागल्याचा संदेश संगणकावर दिसू लागला. पेत्रोव्ह व त्यांचे सहकारी या संदेशामुळे चक्रावून गेले. अमेरिकेच्या या कथित हल्ल्यास अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर देणेच तेव्हा अपेक्षित होते. पण पेत्रोव्ह यांनी शांतपणे थोडा विचार केला व हा संदेश चुकीचा असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले.. नंतर त्यांचे म्हणणे खरेच ठरले. तो संदेश चुकीचाच होता. प्रसंगावधान राखून पेत्रोव्ह यांनी योग्य निर्णय घेतला म्हणूनच जग अणुयुद्धापासून बचावले व मोठी प्राणहानीही टळली..

यातील महत्त्वाचा भाग म्हणजे ही घटना काही तेव्हाच उघडकीस आली नाही. १९८८ मध्ये हवाई दलातील एका अधिकाऱ्याच्या पुस्तक प्रकाशनात या घटनेचा उल्लेख झाला आणि त्यानंतर पेत्रोव्ह यांच्यावर पुरस्कारांचा वर्षांवच झाला. त्यांच्या जीवनावर मग ‘द मॅन हू सेव्ह्ड द वर्ल्ड’ हा माहितीपट निघाला व सबंध जगाला त्यांची थोरवी कळाली. निवृत्तीनंतर पेत्रोव्ह एका छोटय़ाशा गावात एकाकीच राहत होते. सरकारी पेन्शनवर जगत होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना जशी जगाला पाच वर्षांनंतर समजली, तशीच १९ मे रोजी झालेल्या त्यांच्या निधनाची वार्ताही सर्वाना उशिराच- १५ सप्टेंबरनंतर समजली..