शाहिद आफ्रिदीला चर्चेत राहायला खूप आवडते. ‘बूम बूम आफ्रिदी’ या टोपणनावाने पाकिस्तानी नव्हे, तर अखंड क्रिकेट जगताला आपल्या अष्टपैलू आणि अद्वितीय खेळाने मोहिनी घालणाऱ्या आफ्रिदीच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कुणालाच आश्चर्य वाटले नाही. तसे आफ्रिदीचे वय वष्रे छत्तीस आणि क्रिकेट कारकीर्द ही २१ वर्षांची. त्यामुळे निवृत्ती ही अपेक्षितच, परंतु मागील दहा वर्षांत चार वेळा त्याने निवृत्ती जाहीर करून नंतर पुनरागमन केल्याचे क्रिकेटविश्वाने अनुभवल्यामुळे आफ्रिदीच्या ताज्या निवृत्ती-घोषणेकडे ‘आता तरी नक्की ना..?’ अशाच पद्धतीने सध्या तरी पाहिले जात आहे. पाकिस्तानी क्रिकेट हे अविश्वसनीय विजयांसाठी ओळखले जाते. तसेच इम्रान खान, जावेद मियाँदाद, वसिम अक्रम यांच्यासारख्या लढवय्या शिलेदारांसाठी. या पंक्तीत आफ्रिदीचेही नाव घेतल्यास वावगे ठरणार नाही. कारण पराभवाच्या खाईतून विजयाचे शिखर सर करण्यात तो माहीर होता.

खबर खिंडीत पठाणी आफ्रिदी जमात मोठय़ा प्रमाणात वास्तव्य करते. आफ्रिदीचे वडील आणि आजोबा हे या वस्तीतील म्होरके होते. शाहिदच्या कुटुंबातील बहुतेकांनी लष्कराची वाट धरली तर काहींनी स्वत:चा उद्योगधंदा टाकला. शाहिदचा मोठा भाऊ तारिकचे क्रिकेट दुखापतीमुळे संपुष्टात आले. १९८०ला आफ्रिदीच्या कुटुंबातील काही जणांनी कराचीत स्थलांतर केले. अभ्यासाची आवड नसल्यामुळे शाहिदने क्रिकेटचा ध्यास जपला. पण शाहिदच्या वडिलांना हे मंजूर नव्हते. दिवसभर उन्हात उभे राहून तू काय मिळवतोस, अशा शब्दांत शाहिदवर ते शिव्यांची लाखोली वाहत. पण शाहिदने मात्र क्रिकेट हा एकच वसा घेतला होता. त्यामुळेच १६ वष्रे २१६ दिवस या वयोमानाच्या क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम दाखविला. ‘पिंच हिटर’ ही नवी संज्ञा क्रिकेटमध्ये त्याने रूढ केली.

शाहिदने २००३च्या विश्वचषकानंतर संघातील वादामुळे चक्क पाकिस्तान सोडले आणि दक्षिण आफ्रिकेत स्थानिक क्रिकेटही खेळायला सुरुवात केली. बॉब वूल्मर पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदी आले तेव्हा त्यांना या संघात आफ्रिदी दिसेना. मग वूल्मर यांनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन शाहिदची मनधरणी केली आणि त्याला पुन्हा पाकिस्तानच्या संघात आणले. त्याने गमावलेला आत्मविश्वास त्याला पुन्हा मिळवून दिला. ऑक्टोबर १९९६पासून शाहिद पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळतोय. या कालखंडात पाकिस्तानमध्ये राजकीय आणि क्रिकेटमधील बरीच स्थित्यंतरे झाली. क्रिकेट मंडळ बदलले, कर्णधार बदलले, वूल्मर यांचा संशयास्पद मृत्यू, मॅच फिक्सिंग, उत्तेजक सेवन अशा अनेक घटना घडल्या. पण शाहिदचे तेज काही कमी झाले नाही. २००९मध्ये पाकिस्तानला ट्वेन्टी-२० क्रिकेटचे विश्वविजेतेपद मिळवून देण्यात शाहिदचा सिंहाचा वाटा होता.

शाहिद हा गुन्हेगार आहे, असे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार अ‍ॅलन बोर्डर म्हणाले होते. याचे कारण म्हणजे शाहिदने क्रिकेटच्या मैदानावर वारंवार गैरकृत्ये, गैरवर्तने केली. कधी चेंडू कुरतडणे, कधी प्रेक्षकाला मारहाण तर कधी खेळपट्टीचे नुकसान अशा गुन्ह्य़ांखाली त्याने शिक्षा भोगली आहे. २०१४मध्ये त्याने शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची निर्मिती केली. देशातील नागरिकांचे आरोग्य आणि शिक्षण पुरवण्याचे कार्य ही संस्था करते. ‘युनिसेफ’प्रमाणेच अनेक जागतिक संस्थांच्या पोलिओ उपक्रमात आफ्रिदीचा सहभाग आहे. स्वभावातील बिनधास्तपणा मैदानावरसुद्धा उत्कटपणे दाखवणाऱ्या शाहिदवर म्हणूनच पाकिस्तानीच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटरसिकांचे निस्सीम प्रेम आहे.