विको उद्योग समूहाचे अध्वर्यू गजानन पेंढरकर यांचे निधन उद्यमक्षेत्रातील मराठी जगतासाठी मोठी हानी आहे. मुंबईत जन्मलेले पण उद्योगविस्ताराची पायाभरणी नागपुरातून करणारे पेंढरकर यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षण, संस्कार आणि संस्कृतीचा सुंदर मिलाफ होते. ज्या काळात आयुर्वेदाकडे सारे जग उपहासाने बघत होते त्या काळात पेंढरकरांचे वडील केशवरावांनी मुंबईजवळच्या डोंबिवलीत विकोची उत्पादने तयार करून घरोघरी विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
अहमदाबादहून बी.फार्म.ची पदवी प्रावीण्य श्रेणीत मिळवणाऱ्या गजाननरावांनी नोकरी न करता हाच व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. तो किती दूरदर्शी होता, हे विकोचा चाळीस देशांमधील विक्रीविस्तार बघून लक्षात येते. देशात उद्योगासाठी अनुकूल वातावरण नसताना अनेकदा कडवटपणा सहन करत पेंढरकरांनी विकोची उत्पादने घरोघरी पोहोचवली. मात्र, हा कडवटपणा त्यांच्या स्वभावात कधी उतरला नाही. आता दंतमंजन व सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रात अनेक कंपन्या बाजारात आल्या असल्या तरी विकोने सामान्यांच्या मनात जो विश्वास आजही संपादन करून ठेवला त्याचे श्रेय पेंढरकरांच्या सौजन्यशील कृतिशीलतेत सामावले आहे.
प्रतिस्पर्धी कंपन्यांनी विकोची उत्पादने सौंदर्यप्रसाधनेच आहेत, तेव्हा त्यांच्यावरही कर हवा, असा दबाव सरकारवर आणला. त्यातून कर लादला गेला, पण पेंढरकरांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन यश मिळवले व ही आयुर्वेदिक उत्पादने आहेत, हे सरकारला मान्य करायला भाग पाडले. उद्योगविश्वात मराठी माणसे कमीच, हे लक्षात घेऊन पेंढरकरांनी नागपुरात ‘सारथी’ या संस्थेची स्थापना केली व अनेक मराठी तरुणांना उद्योग क्षेत्रात स्थिरावण्यास मदत केली. विनयशीलता हा पेंढरकरांचा खास गुण. विकोला उत्पादनासाठी हळदीची गरज सर्वाधिक भासते. त्यामुळे हळदीचा वापर करूनही पेंढरकर कुटुंबीय अध्र्या हळकुंडात कधी पिवळे झाले नाहीत, असे गमतीने म्हटले जायचे. ते खरेच होते.
दूरचित्रवाणीचा काळ सुरू झाल्यावर मराठी मालिकांना कुणी प्रायोजक मिळत नव्हते त्या काळात पेंढरकर कलाक्षेत्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. अनेक त्यांच्या सक्रिय योगदानामुळेच मालिका पडदा पाहू शकल्या. केवळ नफा मिळवणे, हे पेंढरकरांचे उद्दिष्ट कधीच नव्हते. त्यांनी त्यातला बराच वाटा अनेक संस्थांना देऊ केला. इंदूरची कर्करोग संशोधन संस्था त्यापैकी एक. सौजन्यशील वागणुकीने उद्योग जगतात आदर्श निर्माण करणाऱ्या पेंढरकरांचे ‘कर्म चाले संगती’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहेच, ते नव्या उद्योजकांना प्रेरणा देणारेही आहे.

land, industrial development, Kolhapur,
कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत
kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Barty, Sarathi
बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार