‘सनवार् दुपार् किरकेट् मॅच्. भरोसा धरला.. काई भेव् नोको यूएई अना भारत मॅच. मुहून् मीई झुंझर् का र्ध ना उगामुगा गदोगदो कामा केलू. आता तुमीच् सांगा वर्ल्ड कप च्यार् सालातून येक् गन् येते. मंग् ते कोनी पाहावाची सोडंल् का? कामा सपा वूना आंगनात् आलू त् माजं पोर् गी हास्त् कसी मन्ते, मॅच हेड् ना भारत. wc01नय् कतच गदोगदो केलू. भारताने यूएईला थोडा वेळतरी आणखी खेळू द्यायला हवे होते. इतक्या कमी वेळेत मॅच संपल्याने पहाटेपासून उगाचच कामाची पळापळ करून मॅच पाहायला बंडोपंत घरी पोहोचले. पण तोपर्यंत मॅचच संपल्याचे त्यांना खूप दु:ख झाले.
‘‘मग् का लाव् ल आप् ला घनाना? तुमीच् सांगा आपना टीम् तं अरगाई खेती परगाई मारा’’ भारताची टीम म्हणजे बेभरवशाची टीम. आपण आपल्या वकुबाप्रमाणे न खेळता यूएईबरोबर चऱ्हाट लावत बसलो असतो तरी आपण नावंच ठेवलं असतं असं सुखदेवचं पक्कं मत होतं. ‘‘उबा तवरिक सोबा.. शिर सलामत तो पगडी पचास. मांज्रीच्या दैवाना सिका टुटुला त मंग् मनाल्.. मोट्याघरी पल्ली ना पोतासाटी अल्ली’’ आणि असं त्यांना खेळवत राहणं पण धोक्याचं असतं. गडबड झाली आणि उलटे आपणच हरलो असतो तर? यूएईचा संघ आणि आर्यलडचा संघ यात उल्हास भेदभाव करीत नव्हता. उगाच घेण्याचं देणं होण्यापेक्षा आणि मॅच जबरदस्तीनं रंगतदार करण्याच्या नादात पराभवाला कोण अक्सेदा देईल? याबाबतीत उल्हास आणि सुखदेवचं एकमत झालं. ‘सोल्ला त् परते, धरला त् चावते’ असे दोघांनाही भेव् वाटत होतं. ‘गरा कापला, खोकला गेला’ हेच त्याच्या दृष्टीने बरोबर होतं.
गोंदिया जिल्ह्यातील खळगंधा तलावाजवळची मोतीराम हलमारे याची टपरी म्हणजे खुशालराव कुरसुंगे, बंडोपंत खुणे, उल्हास कापगते, पवन गराठे, सुखदेव भेलावे या यारदोस्तांच्या गप्पांचा अड्डा.
‘‘लाक्या भारत मॅच करंल तं फाक्या यूएई का करंल?’’ मी बोल् लू तं माजा टोंड् दिस्ते. चुलील् आवतन् रावना.’’ िलबूटिंबू संघांना अशा दादा लोकांविरुद्ध खेळवणं म्हणजे या दादा लोकांना आयते सुग्रास जेवणाचेच निमंत्रण अशी पवन गराठेची खात्री. तेव्हा या छोटय़ा संघांना वर्ल्ड कप खेळू देण्याला त्याचा विरोध होता.
‘‘सचिन तेंडुलकर का मनाल्? तू मन्ना ध्यानी मनी धर्. किर् केटाचा येल्या जावो अबारालं’’ क्रिकेटचा वेल सर्वदूर पसरायचा असेल तर छोटय़ा छोटय़ा संघांना पण आपण प्रोत्साहन द्यायला हवे. ‘‘सोता उस्ट्या हाताना काव् रा नाई मारं.’’ सुखदेव पवनला समजावू लागला.
‘‘मदानात् यूएईच्या इत्ल्या लोकाईत स्वप्निल पाटील का मालं तं सास् लाग् ना.’’ मोतीरामला एक भारतीय व्यक्ती यूएई संघातून खेळतोय यावर विश्वासच बसत नव्हता. ‘‘दुश्मन् संघात काहालं जावाचा?’’ त्याला खासगीत घेत बंडोपंत म्हणाले, ‘‘उंर्ब फोडून् सांगू?’’ मूळचा केरळचा असलेला कृष्णा चंद्रनसुद्धा यूएई संघातून खेळतोय, ही गोष्ट त्याने मोतीरामला सांगितली. तसा मोतीराम चिंताग्रस्त झाला. ‘‘या यूएईन् का लाव् लन्?’’ तुमीच् सांगा. मालं येक् भेव् वाटाय्लं का माला सोता युवराज सिंगची ठुक् ठुक् लाग् ते.. त्याय्ला घेऊन् नोको जाहावाला यूएई. का भरोसा? मोतीराम हेलमारेने उपस्थित केलेली ही भीती सर्वाच्याच मनात बसली. असं झालं तर फार भयानक होईल. सेहवाग, गंभीर, युवराज असे वर्ल्ड कप टीमबाहेर बसवलेले आपले दिग्गज यूएई संघातून खेळू लागलेत असं भीतिदायक चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर आलं. आपल्या भारतीय टीमला ‘नोको लागो डीट्..’ असं म्हणत ते खळगंधा तलावाजवळच्या देवाकडे मागणे मागू लागले.