ठाणे महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असून ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडावी यासाठी महापालिकेचा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ३३ प्रभागातील १३१ जागांकरिता ही निवडणूक होणार असून त्यासाठी १२ निवडणूक निर्णय अधिकारी, ३६ साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १७०४ मतदान केंद्र, दहा ते पंधरा मतदान केंद्रांसाठी क्षेत्रीय अधिकारी आणि दहा हजार कर्मचारी अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बहुसदस्य म्हणजेच चार वॉर्डाचा एक प्रभाग या पद्घतीने होणाऱ्या निवडणुकीत मतदान करताना नागरिकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक विभागाने मतदान कसे करावे, यासंबंधी चित्रफितींच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरू केले आहे. याशिवाय, नागरिकांना मतदान करण्यासाठी जवळच्या जवळ मतदान केंद्र उपलब्ध व्हावे म्हणून ७५० मतदारांकरिता एक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. दोन किमीच्या परिघामध्येच ही मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

मतदान जनजागृती अभियान..

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी जेमतेम ५० ते ५५ टक्के इतके मतदान होत असल्याचा आजवरचा निवडणूक विभागाचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून महापालिका निवडणूक विभागाने मतदार जनजागृती अभियान सुरू केले आहे. शहरातील नाक्या-नाक्यावर लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. तसेच मतदान करण्यासंबंधीच्या चित्रफिती आणि पोस्टर्स महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय, प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये आणि त्यांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासंबंधीचा प्रचार आणि प्रसार महापालिका निवडणूक विभागाकडून करण्यात येत असून त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ शहरात सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून महापालिका मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच सोशल माध्यमांवर उमेदवारांची जाहिरात करण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले असून त्याकरिता मुख्यालयात केंद्र उभारण्यात आले आहे.

election-chart

मतदान केंद्रांची व्यवस्था..

ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १७०४ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रे किती आहेत, हे अद्याप निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आलेले नाही. असे असले तरी या सर्वच मतदान केंद्रांमध्ये मतदान यंत्रे पुरविली जाणार असून प्रत्येक ठिकाणी एक कंट्रोल युनिट आणि चार मतदान यंत्रे असणार आहेत. एका यंत्रावर १४ उमेदवारांची नावे असणार आहेत. याशिवाय, मतदान केंद्रामध्ये टेबल, खुर्ची, मंडप अशी व्यवस्था पुरविली जाणार आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये ६९ असे सर्वाधिक तर प्रभाग क्रमांक २९ आणि ३३ मध्ये ३३ अशी सर्वात कमी मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांसाठी सुमारे १० ते १२ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

पक्षनिहाय उमेदवार संख्या..

भाजपचे १२०, शिवसेनेचे ११९, राष्ट्रवादीचे ८५, काँग्रेसचे ५३, मनसेचे ९९  उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीचे १६, लोकजनशक्ती पार्टीचे १, एमआयएमचे २१, अखिल भारतीय सेनेचे २, आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडियाचे ४, इंडियन युनियन मुस्लीम लीगचे ३, धर्मराज्य पक्षाचे ७, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे ३, बहुजन विकास आघाडी २१, भारतीय बहुजन महासंघ १, भारतीय शेतकरी कामगार पक्ष ७, भारिप बहुजन महासंघ ९, राष्ट्रीय समाज पक्ष ५, संभाजी ब्रिगेड १, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया १, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ६, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी ५ आणि अपक्ष १९७ असे एकूण ८०५ उमेदवार आहेत.