अतुल सुलाखे

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे।

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे।

न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥ ९ ॥

–  समर्थ रामदास, ‘मनाचे श्लोक’

अध्यात्मामधे, त्या परम-तत्त्वाला सर्वस्व अर्पण करून, त्याच्याशी नम्रपणे एकरूप होणे याला अत्यंत महत्त्व आहे. विनोबांनी हा विचार नित्य व्यवहाराला लागू केला. यासाठी त्यांनी शब्दयोजना केली – ‘मालकीचे विसर्जन’! ईशावास्य उपनिषदातील पहिलाच मंत्र त्यांनी आधार म्हणून निवडला.

ईशावास्यमिदं र्सव यित्कच जगत्यां जगत्।

तेन त्यक्तेन भुञ्ज्ीथा: मा गृध: कस्य स्विद धनम्।।

हे जग ईश्वरमय आहे आणि त्याला समर्पण करून मगच सर्व गोष्टींचा उपभोग घेतला पाहिजे. दुसऱ्याच्या धनाची लालसा बाळगू नये.

जगातील कोणत्याही शास्त्रात यापेक्षा अधिक चांगला संदेश आढळत नाही. यातील ईश्वर आणि दान ही तत्त्वे वगळली तर साम्यवादही हीच भूमिका घेतो. विनोबांची ही मांडणी पुरेशी स्पष्ट आहे. संपत्तीच्या संचयापेक्षा तिचा विनियोग महत्त्वाचा मानला पाहिजे. समाजातील धनवंतांना ही जाणीव करून देतानाही विनोबांनी वरील मंत्राचा आधार घेतल्याचे दिसते.

ईशावास्य उपनिषदाची-  विशेषत: या मंत्राची – अनेकांनी वाखाणणी केली; तथापि त्यावर समाजाची रचना झाली पाहिजे असा आग्रह कुणी धरला नाही.

‘‘परधनाची लालसा नको’ हा व्यक्तीसाठीचा सद्गुण संपूर्ण समाजाने धारण करावा’ ही विनोबांची दृष्टी लक्षणीय आहे. आजच्या समाजात वैयक्तिक मालकी हक्काला मान्यता मिळालेली आहे. सरकार आणि कायदा यांचा हाच आधार आहे तथापि विनोबांना ही रचना मान्य नाही. त्यांना मालकीचे विसर्जन हवे आहे.

प्रथम समाजात हा बदल घडावा आणि त्यानंतर व्यक्तीच्या पातळीवरील मालकी नष्ट व्हावी. समाजरचनेचा हा शॉर्टकटही त्यांना अमान्य आहे. शरीरश्रमासाठी जे तत्त्व आहे तेच मालकी हक्काच्या विसर्जनातही आहे. शरीर परिश्रम व्रत प्रत्येकाला लागू असेल तर मालकीचे विसर्जनही तसेच असायला हवे. विनोबा यासाठी दोन व्रतांवर जोर देतात. ‘अस्तेय’ आणि ‘अपरिग्रह’. चोरी करायची नाही आणि साठवण नाकारायची. अभंग व्रतांमधे या दोहोंना कळीचे स्थान आहे. गांधीजी आणि विनोबा या दोहोंनी आश्रम आणि बाहेरचे जग दोन्ही ठिकाणी हे तत्त्वज्ञान पोहोचवले. गीता प्रवचनांची समाप्ती संत दादू यांच्या रचनेने झाली आहे. विनोबांनी तिथे त्या दोह्याचे विवेचन केले आहे. मूळ दोहाही सुंदर आहे.

बकरी जो मैं-मैं  करती है।  वह गले छुरी चलवाती है।

जब धुनिया रुई को धुनता है। तब तू-ही तू-ही चिल्लाती है।

समर्थ, अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे पापाची खाण असल्याचा इशारा देतात. साम्यसूत्रांची समाप्तीही ‘अहंमुक्ति: शब्दात् अहंमुक्ति: शब्दात्।’ अशी आहे. जिवंतपणीच ‘तू-हि तू-हि’ करा, हा संत दादूंचा संदेश आहे. सारांश पारलौकिक आणि लौकिक जगात अहंमुक्तीला पर्याय नाही. ईशावास्य, गीता, गीताई, दोहावली आणि अंतिमत: भूदान यांची शिकवण अहंमुक्तीची आहे.

jayjagat24@gmail.com