एक काळ होता ज्या काळात ‘मला लागली कुणाची उचकी..’ हे गाणं फार प्रसिद्ध झालं होतं, आजही आपल्याला फार उचक्या लागू लागल्या की लगेच विचारतो, ‘कोण आठवण काढत आहे?’ खरंच काही नातं असेल का या समजुतीच्या पाठीमागे? आणि बऱ्याचदा ही उचकी कशी काय थांबते? याचे नेमके शास्त्रीय कारण काय? यासाठी प्रथम आपण ‘उचकी’ म्हणजे काय ते समजून घेऊ.
आयुर्वेद शास्त्रात उचकीचे ५ प्रकार सांगितले आहेत. अन्नाजा, यमाला, क्षुद्रा, गंभीरा व महती. पण बऱ्याचदा काही आजारामुळे उचकी लागली आहे हे फार कमी प्रमाणात आढळते. मात्र आहारातील बदलाने लागलेली अन्नाजा ही उचकी प्रमाणात: जरा जास्तच आढळते. आधुनिक शास्त्रानुसार श्वास घेताना अथवा अन्न ग्रहण करताना आपल्या फुप्फुसांच्या खाली जो ‘डायफ्राम’ असतो तो श्वसनाला मदत करत असतो. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे श्वसन होत असते. त्याच्या दोन्ही पंखांच्या हालचालीत अनियमितता आली की उचकी लागते. तर आयुर्वेदानुसार उदान व प्राणवायू यांच्या कार्यातील बिघाडामुळे उचकी लागते.
थोडक्यात, दोन्ही शास्त्रांनुसार श्वास वा अन्न घेताना काही ताल, लय बदलल्यास अथवा अडथळा आल्यास उचकी लागणार हे निश्चित. मग हा लय सुधारणे ही झाली त्याची चिकित्सा. त्यामुळे डोळे बंद करून तीन वेळा दीर्घ श्वास घेतला की बहुतांशी वेळा उचकी लगेच थांबते. कोणाची तरी आठवण काढून पाहा, आठवण्याची प्रक्रियाच मुळी दीर्घ श्वास घेण्याची आहे. परीक्षेतसुद्धा आपण दीर्घ श्वास घेत डोक्याला हात लावून उत्तर आठवत बसतो. थोडक्यात आठवण काढताना आपण दीर्घ श्वास घेतो. व काही काळ आठवण काढण्याच्या नादात आपण उचकी लागली आहे हेही विसरून जातो. याला आयुर्वेदात ‘विस्मयकारक चिकित्सा’ असेही म्हणतात. दीर्घ श्वास घेतल्याने ‘डायफ्राम’ला एका क्षणाची विश्रांती मिळते व त्याची हालचालसुद्धा पुन्हा एकदा नव्याने पूर्ववत सुरू होते. त्यामुळे उचकी लगेच थांबते.
मात्र काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा फोन आला होता, तिच्या आजोबांना सायंकाळी अचानक उचकीचा त्रास सुरू झाला. बराच वेळ गरम पाणी पिणे, सर्वाची आठवण काढणे, दीर्घ श्वास घेणे असे अनेक उपचार करून झाले. मात्र उचकी काही केल्या थांबेना. सर्वाना काळजी वाटायला लागली. एवढय़ाशा छोटय़ा कारणासाठी हॉस्पिटलला घेऊन जाणे शक्य नव्हते. काहीतरी घरगुती औषध सांगा म्हणाली. मग काय मीसुद्धा आज्जीबाईच्या बटव्यातील औषध सांगितलं आणि अवघ्या १० मिनिटांच्या आतच उचकी थांबली. हीच तर आयुर्वेदाची जादू आहे. आयुर्वेदात आत्यायिक चिकित्सासुद्धा आहे आणि तीही अगदी सोपी. आपल्या घरात मसाल्याच्या डब्यात वेलची असते.. साधारण वेलचीच्या अख्ख्या दहा-बारा कुडय़ा घ्या व तव्यावर परतायला सुरुवात करा. चांगल्या परतल्यानंतर पोळपाट-लाटणं घेऊन त्या बारीक करून त्याची मशी तयार करा. मशी म्हणजे काळी पूड. पूर्वी बायका मशेरी भाजतात ना अगदी तसे करा. मग ती वेलचीची मशी दर दोन दोन मिनिटांनी मधासोबत चाटवा. मग बघा कशी दहा मिनिटात उचकी थांबते ते. अशाच सलग दोन दोन वेळा लागणाऱ्या उचक्या, एखाद्या आजारामुळे लागणाऱ्या उचक्यासुद्धा आयुर्वेदातील वैद्याच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास लगेच थांबतात. मात्र घरगुती उपचारात तुम्ही सुंठी चूर्ण, वेलचीची मशी, मक्याच्या कणसाच्या केसांची मशी अशा प्रकारे तात्काळ उचकी थांबविण्यासाठी वापरू शकता. आयुर्वेद सर्वासाठी आहे. छोटय़ा छोटय़ा गोष्टींनीसुद्धा आपण कित्येक वेळा मोठमोठी कामे करू शकतो. गरज आहे ती फक्त लगेच घाबरून न जाता आज्जीबाईच्या बटव्याला उघडून प्रथमोपचार करण्याची.

वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

indian chess players performance in candidates chess
ऐतिहासिक सांगतेकडे..
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….