17 December 2017

News Flash

जो जे वांछील तो ते लाहो

विचार वाढले की श्वास वाढतात आणि विचार कमी झाले की श्वास कमी होतात.

ayurvedic treatment, Marathi news, Marathi news paper, Marathi, Marathi news online, Marathi paper, News online, Loksatta news paper,News, Marathi political News, chaturang | Updated: January 1, 2017 8:26 PM

आजच्या या सदराच्या शेवटच्या भागात आपण अनेक आजारांना कारणीभूत असणाऱ्या मनाची शक्ती कशी वाढवायची आणि आजारांतून मुक्ती कशी मिळवायची हे जाणून घेऊ यात. खरंतर आपल्या प्रत्येकाच्याच मनात रोज असंख्य विचार येत असतात आणि विचार कमी करा असे सांगून हे विचार कमी होत नाहीत. उलट असे केल्यास विचार अधिकच येतात आणि आपल्याला त्रास देऊ लागतात. म्हणून तर विचारांपेक्षा श्वासाचे नियंत्रण करा, असे आपले ग्रंथ आपल्याला शिकवतात. विचार वाढले की श्वास वाढतात आणि विचार कमी झाले की श्वास कमी होतात. म्हणून श्वास जाणीवपूर्वक नियंत्रित घेतले की विचार आपोआप कमी होतात. चिंतन करणे, मनन करणे, विचार करणे, ऊहापोह करणे, संकल्प करणे ही मनाची कार्ये सांगितली आहेत. वेदना ही नेहमीच सापेक्ष असते. म्हणून ‘अनुकूल वेदनियम सुखं व प्रतिकूल वेदनियम दुख:म’ असे म्हटले आहे. त्यामुळे काही वेदना या आपल्याला सुख देत असतात तर काही वेदना या दु:ख देत असतात. एकाच प्रकारच्या घटनेने एकाला सुख तर दुसऱ्याला दु:ख होऊ  शकते. म्हणजे पुन्हा मानलं तर सुख नाहीतर दु:ख अशी मनाची अवस्था होते. काही लोक एखाद्या छोटय़ा आजाराचाही मोठा त्रास करुन घेतात तर काही लोक मोठय़ा आजाराला सुद्धा धैर्याने सामोरे जातात. म्हणून आपण आपल्या आजाराचे गांभीर्य पाहता मनालाही त्याची कल्पना दिली पाहिजे आणि वास्तव स्वीकारून मनाला आजारांना सामोरे जाण्यास तयार केले पाहिजे. रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड असेल तर आयुष्यभर औषध घ्यायचे आहे असे लोक जणू स्वत:च्या मनाला सांगून ठेवत असतात. त्यामुळे आपली या आजारांपासून मुक्ती होऊ  शकते असे त्यांना वाटतच नाही. पण थोडे प्रयत्न केले अन्य उपचार पद्धती समजून घेतल्या की आपण या आजारांपासून सुद्धा मुक्त होऊ  शकतो. योग्य जीवनशैली, प्राणायाम, योगासने, नियमित व्यायाम, सकारात्मक विचार आपल्याला हा आजार बरा करायला मदत करतात. जे आजार ताण-तणावाने निर्माण होत आहेत म्हणजेच ज्या आजारांचे कारणच मुळी मन आहे. त्यांची चिकित्सा ही मनाच्या नियंत्रणाशिवाय होऊच शकत नाही. मनाचे श्लोक, गायत्री मंत्र, सूर्यनमस्कार, त्राटक, ध्यानधारणा इत्यादी अनेक गोष्टींचा नियमित केलेला अभ्यास आपल्याला मनाच्या विकारांपासून दूर ठेवतो. मात्र आजकाल शिशुगटांपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत मनाचे सामथ्र्य कसे वाढवायचे हेच नेमके शिकवले जात नाही. साधा ताप आला तरी माणसाचे शरीराबरोबरच मनही तापू लागते. म्हणूनच मन:संताप हे तापाचे प्रमुख लक्षण आयुर्वेदात सांगितले आहे. सर्दी, खोकला आजारांमध्ये सुद्धा माणूस त्या आजारापेक्षा मानसिक त्रासानेच जास्त ग्रासला जातो. कोड या आजारामध्ये त्या रुग्णाचे मन प्रथम खचलेले असते. कर्करोग झाल्यावर कित्येक दिवस त्या रुग्णाला काही होत नाही मात्र जेव्हा त्यास समजते की आपल्याला कर्करोग झाला आहे तेव्हा ते आधी मनाने खचून जातात मग शरीरानेही खचतात. उन्माद, अपस्मार इत्यादी मनोविकार तर पूर्णपणे माणसांची मानसिकताच बदलून टाकतात. सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, भीती इत्यादी भाव माणूस मनाच्या सहाय्याने प्रकट करत असतो. आयुर्वेदात सगळेच व्याधी हे प्रज्ञापराधाने म्हणजे मनाचे व इंद्रियांच्या हीन, मिथ्या, अतियोगाने होतात असे म्हटले आहे. याचाच अर्थ असा की माणूस जोपर्यंत प्रज्ञापराध करणार नाही तोपर्यंत त्यास व्याधी होणार नाही. पण माणूस त्याच्या स्वभावानुसार जोपर्यंत तो अपथ्य करू शकत आहे तोपर्यंत तो ‘काही होत नाही रे’ असे म्हणत त्याला हवे ते अपथ्य करत असतो व एकदा का आजाराने ग्रासला गेला की ‘काहीही करा, तुम्ही सांगाल ते पथ्य पाळायला तयार आहे, पण मला बरे करा’ असे म्हणत असतो. या मनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जसे मंत्र, व्यायाम आदी उपचार आहेत त्याचप्रमाणे चांगले विचार, सत्संग व औषधी उपचारही आहेत. काही औषधी घेतल्यानंतर माणसाचे मन ताळ्यावर येते व आपण त्याकडून पुन्हा हवे ते काम करून घेऊ  शकतो. मनाची अस्वस्थता, अमनस्कत्व स्थिती म्हणजेच मन ताळ्यावर नसणे, उद्विग्नता  यांमध्ये आपण औषधी उपचारांच्या सहाय्याने मनाला पटकन ताळ्यावर आणू शकतो. पूर्वीच्या काळी वेखंड, लेकुरवाळे हळकुंड दंडाला बांधणे, वचा चूर्ण हात पायांना चोळणे, ब्राह्मी, शंखपुष्पी अशा वनस्पती अथवा सारस्वतारिष्टासारखी औषधे मनावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिली जात असत. कोणतीही कृती ज्याप्रमाणे आधी मनात उत्पन्न होते व नंतर ती प्रत्यक्षात उतरते त्याचप्रमाणे कोणताही आजार हा प्रथम मनात तयार होतो व नंतर शरीरात होतो. मन खचले की माणूस खचतो. म्हणून झाले गेले सरत्या वर्षांप्रमाणे विसरून जा व नव वर्षांला आनंदाने सामोरे जा. तुम्ही या विश्वाकडे जे मागणे मागणार तेच तुम्हाला मिळणार आहे. म्हणून संत ज्ञानेश्वरसुद्धा पसायदानात वैश्विक मागणे मागताना मनाचे महत्त्वच पटवून देतात. शेवटी काय ‘जो जे वांछील तो ते लाहो.’ हाच तर खरा सृष्टीचा नियम आहे.

harishpatankar@yahoo.co.in

(सदर समाप्त)

First Published on December 31, 2016 12:38 am

Web Title: ayurvedic treatment