25 September 2020

News Flash

पाळीत विश्रांती घ्याच

काही दिवसांपूर्वी एक स्त्री रुग्ण आमच्या चिकित्सालयात आली होती,

काही दिवसांपूर्वी एक स्त्री रुग्ण आमच्या चिकित्सालयात आली होती, मुलीची परीक्षा येऊ घातल्याने मासिक पाळीची तारीख पुढे ढकलता येईल का? किंवा लवकर पाळी येण्यासाठी काय करावे लागेल? हा त्यांचा प्रश्न. असे का करायचे आहे हे विचारलं तर म्हणे परीक्षेच्या काळात पॅड बदलण्यात फार वेळ जातो. मासिक पाळीच्या काळात हिची कंबर व पाठ फारच दुखत असल्याने हिचे अभ्यासातही लक्ष लागत नाही. हल्लीच्या मुलींना मासिक पाळी म्हणजे एक प्रॉब्लेम वाटतो, त्यामुळे बऱ्याच मुली याला प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेम गेला असेच म्हणतात. पण यांना पाळीत बदल करणाऱ्या होर्मोन्सच्या गोळ्या घेतल्याने भविष्यात किती त्रास होतात हे कोण समजावून सांगणार?

रशियाच्या एका दौऱ्यात माझ्याकडे एक दिवस सलग १० ते १२ पाळीच्या तक्रारीचेच रुग्ण आले. त्यात कोणाला पीसीओडीचा त्रास तर कोणाला वजन वाढणे, अंगावरून अधिक प्रमाणात जाणे, मधेच पांढरे जाणे, पाळीच्या काळात मांडय़ांच्या ठिकाणी वेदना होणे, पाठ, कंबर ओटीपोट दुखणे, अनावश्यक केस, लव चेहऱ्यावर वाढू लागणे अशा अनेक समस्या होत्या. बदलत्या जीवनशैली बरोबरच मला त्यांच्यामध्ये सापडलेले आणखी एक कारण अगदी वेगळे व आपणास थक्क करणारे होते. कारण काही रुग्णांमध्ये बहुतांशी लक्षणे ‘‘रजो अवरोधजन्य’’ जाणवत होती. म्हणजे मासिक पाळीच्या स्रावात अडथळा येत आहे असे वाटत होते. म्हणून त्यातील काही जणींना मी पाळीच्या वेळी काय वापरता? असे विचारले. तर जवळपास सर्वानी आम्ही ‘‘पेसरी सॅनिटरी नॅपकिन’’ (टॅम्पून) वापरतो असे सांगितले. थोडक्यात सांगायचे तर त्या एक सुती कापडासारख्या विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या गुंडाळीस योनी मार्गात पाळीच्या काळात दिवसभर घालून ठेवत असत, मग सायंकाळी घरी आल्या की टॉयलेटमध्ये जाऊन ती गुंडाळी काढली की एकदम सर्व रज बाहेर जात असे. म्हणजे दिवसभर ते अडवून ठेवले जात असे. असेच रात्रभर. किती हा रजावरोध? यामुळे त्यांना अनेक पाळीच्या तक्रारी मागे लागत. आपल्याकडेही आजकाल तसाच ट्रेंड येत चालला आहे. त्यामुळे आपल्याकडेही पाळीच्या तक्रारींचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे टी.व्ही. वरील जाहिराती. जणू काही पाळी तर नेहमीच येते असे म्हणत अगदी ट्रेकिंग अथवा कष्टाची कामे करताना मुलींना सहज दाखवतात. खरंतर मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचा व स्वच्छतेचा निकष सोडला तर त्या स्त्रीने त्या काळात जास्तीत जास्त विश्रांती घेणे गरजेचे असते. प्रत्येक पाळीच्या काळात ३० ते ४० मि.ली. रक्तस्राव पकडला तरी साधारण वर्षांला ३६० ते ४८० मि.ली. होईल व ३५ वर्ष पाळी असेल तर १२ ते १६ लिटर एवढा रक्तस्राव होत असतो व प्रत्येक महिन्याला किमान ५ दिवस विश्रांती मिळाली तर वर्षांला ६० दिवस व ३५ वर्षांत ७० महिने म्हणजे ५ ते ६ वर्ष एवढी विश्रांती मिळेल. म्हणजेच मासिक पाळीत विश्रांती घेणाऱ्या स्त्रीचे आरोग्यही उत्तम राहणार व आयुष्य किमान १० वर्षांनी वाढणार. त्यामुळे पाळीच्या काळात शक्य तेवढी विश्रांती घेतली पाहिजे म्हणजे होणारा रक्तस्राव भरून निघतो.

त्याचबरोबर आहारात गूळ-खोबऱ्याचे प्रमाण वाढविले पाहिजे. पूर्वीच्या काळी स्त्रियांची ओटीसुद्धा गूळ, खारीक-खोबरे, तांदूळ देऊन भरली जायची. त्यामुळे तिला पोषक आहार मिळत असे. आजकाल आपण चांगला आहार करत असलो तरी तो पोषक नाही. त्यामुळे स्त्रियांमध्ये पाळीच्या काळात कंबर व पाठ दुखीचे प्रमाण फार वाढले आहे. रक्त वाढवणारा, हाडांना बळकटी देणारा आहार महत्त्वाचा. त्यामुळे स्त्रियांनी खजूर, बदाम, मनुके, गूळ, खोबरे, साजूक तूप, दूध नियमित आहारात ठेवावे. पौष्टिक लाडू, मुगाचा लाडू खावा. रोज आंघोळी पूर्वी सर्वागास तेल लाऊन चोळावे. पाळीच्या काळात फार कंबर दुखत असल्यास अर्धा चमचा सुंठीचा काढा करून दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावा. याने तत्काळ शूल थांबतो व पाळी सुखकारक जाते. लक्षात ठेवा पाळी ही नियमित व नसíगकच आली पाहिजे, येत नसेल तर आपले काहीतरी चुकत आहे, असे समजावे. तिच्या तारखा औषधांनी पुढे मागे करू नयेत.

– वैद्य हरीश पाटणकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:04 am

Web Title: take rest in periods time
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 पायांच्या भेगा
2 दही
3 तृष्णा
Just Now!
X