सद्गुरू संग लाभल्यानं शिष्यांच्या जीवनात पालट झाला आणि त्यांची चरित्रं नुसती वाचूनही हा पालट आपल्या जीवनात घडावा, अशी तळमळ अनेकांना लागते, असं हृदयेंद्र म्हणाला. त्यावर हसून ज्ञानेंद्रनं विचारलं..
ज्ञानेंद्र – पहिली गोष्ट अशी की सद्गुरूंचा संग लाभला एवढय़ानं शिष्याच्या जीवनात नव्वद अंश कोनात पालट होतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैलवानाच्या बाजूला नुसतं बसून जसं पैलवान होता येत नाही, त्याप्रमाणे नुसती त्यांची चरित्रं, त्यांचे अनुभव वाचून तसा पालट कुणात घडणं शक्य आहे का?
हृदयेंद्र – पालटाची ही प्रक्रिया सोपी नसतेच आणि ती अत्यंत दीर्घकाळ चालते.. जितकी तळमळ शुद्ध आणि खरी असेल तितका हा पालट वेगानं घडतो, एवढं मात्र खरं..
ज्ञानेंद्र – म्हणजेच गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा। तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे।। काय सांगों झालें कांहीचिंया बाहीं। पुढें चाली नाहीं आवडीनें।। ही प्रक्रिया वेगानं होत नाही.. आधी तू सांगतोस त्याप्रमाणे सद्गुरू मिळायला हवा, मग तो खरा सद्गुरू हवा, मग त्याच्यावर विश्वास बसायला हवा, मग त्यानं सांगितल्याप्रमाणे वागायला हवं, मग त्याच्याविषयीचा प्रेमतंतू मनात उत्पन्न व्हायला हवा, मग आईला जसे गर्भाच्या आवडीनुसार डोहाळे लागतात तसा तो प्रेमतंतूच मला त्यांच्या आवडीनुसारच्या सवयी आणि आवडी लावील, मग जीवनात पालट घडेल, पूर्वीसारखं जीवन जगणं होणार नाही, उलट ते व्यापक होईल.. हे सगळं एकाच जीवनात होईल की तुझ्या पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार कधीही होईल?
योगेंद्र – गीतेत भगवंत काय सांगतात? कर्म करणं आपल्या हाती आहे, फळ नव्हे! तसंच साधना करणं आपल्या हातात आहे, त्या साधनेचं फळ योग्य वेळी मिळेलच.. आणि भगवंत गीतेत स्पष्ट सांगतात की या जन्मी जी साधना होते ती वाया जात नाही. पुढल्या जन्मी त्या साधनामार्गावर साधक पुढचं पाऊलच टाकतो..
हृदयेंद्र – मला वाटतं, हे सर्व कधी साधेल, याचा विचारच कशाला करावा? हा जन्म साधनेसाठीच आहे, असं मानून साधना करीत राहावं..
ज्ञानेंद्र – म्हणजे एकूण सगळं बोलाचीच कढी बोलाचाच भात आहे!
हृदयेंद्र – असं नाही.. म्हणूनच मी काय म्हटलं? अशी अनेक शिष्यांची चरित्रं आहेत ज्यांच्या जीवनात झालेला पालट त्यात नोंदला गेला आहे..
ज्ञानेंद्र – पण त्यासाठी तो खरा सद्गुरू अनिवार्य आहे..
हृदयेंद्र – निश्चितच.. पणतीत तेल आहे, वात आहे, पण म्हणून ती स्वत:हून तेवू लागत नाही.. आगीनकाडीनं वात पेटवली जाते तेव्हाच पणती प्रकाशदायी होते.. पण हे ही लक्षात घेतलं पाहिजे की वात एकदा पेटवली जाईल, पण पणतीत तेलच नसेल किंवा वात त्या तेलानं नीट भिजली नसेल तरी ते तेवणं क्षणभरापुरतं असेल.. तसा खरा सद्गुरू लाभला तर साधक खऱ्या साधनेला लागेल, पण श्रद्धा, भाव, भक्तीला अनुकूल अशी त्याची चित्तस्थिती नसेल तर काय उपयोग? ती साधनाही क्षणभंगूर होईल..
योगेंद्र – मुख्य गोष्ट ही की खरा सद्गुरू लाभला तरी साधनाही खरी सुरू झाली पाहिजे.. ही खरी साधना आंतरिक आहे.. साधना जितकी खोलवर असेल तितका खोलवर पालट सुरू होईल..
हृदयेंद्र – अगदी बरोबर.. पण बरेचदा आपली साधना वरवरची असते आणि त्यामुळे बदल हाही वरवरचा होतो.. म्हणजे कुणी गळ्यात तुळशीच्या नाहीतर रूद्राक्षाच्या माळा घालतो, कुणी गंध लावतो, कुणी भस्म लावतो, कुणी पेहराव बदलतो.. जोवर साधना खोलवर जात नाही, तोवर पालटही खोलवर होत नाही, योगा तुझा हा मुद्दा अगदी बरोबर आहे..
कर्मेद्र – पण साधना खोलवर जाणं म्हणजे काय? मला हे सगळं फसवं वाटतं.. आम्ही दुर्गम भागांत प्रवास करत होतो.. खूण म्हणून एक मंदिर कुठंय, असं विचारत होतो.. दहा मिनिटं चाललं आणि कुणा गावकऱ्याला विचारलं की तो म्हणे, हे काय आणखी काही पावलं चालत जा, पाच-दहा मिनिटांत येईलच ते देऊळ.. असं करीत करीत तासभर तंगडतोड केली तरी ते पाच-दहा मिनिटांवरचं देऊळ काही येत नसे! तसं कुणी साधना करतोय बिचारा पण काही फरकच पडत नाही, तर म्हणायचं, आणखी साधना खोलवर जाऊ दे, मग बघच! तेव्हा खोलवर साधना म्हणजे काय?
चैतन्य प्रेम