अभय टिळक agtilak@gmail.com

इंद्राच्या अंगाला क्षते का पडली..? भस्मसात होण्याची पाळी मदनावर कशामुळे आली..? चंद्राच्या धवल कांतीवर डाग कशामुळे उमटले..? नहुष राजा सर्पयोनीमध्ये का जन्माला आला..?..ही यादी अशीच वाढवतात ज्ञानदेव त्यांच्या एका अभंगात आणि अखेरीस एकाच शब्दात खुलासा करून टाकतात – कर्म ! ‘परियेसी गव्हारा सादर’ असा प्रारंभ असणारा मोठा मननीय आहे ज्ञानदेवांचा तो अभंग. काहीही केले आणि कोणीही असले तरी कर्माशी संग अटळ असतो आणि केलेल्या कर्माचे भलेबुरे फळ सोसणे भाग पडते, हेच सुचवायचे ज्ञानदेवांना त्या अभंगाद्वारे. प्रत्यक्ष भगवान शिवशंकरसुद्धा ज्याची महती मान्य करतात ते कर्म अंगाला चिकटण्यापासून बचावण्याचा एकमात्र निर्वाणीचा मार्ग ‘कर्मातें शंभु मानी आपण । किती पळसिल कर्माभेण। बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । केलीं कर्मे निवारी नारायण’ अशा शब्दांत विशद करतात ज्ञानदेव त्या अभंगाच्या अखेरच्या चरणात. दंडवत घालून विठ्ठलाला सर्वतोपरी शरण गेल्याने कर्मविपाकाचा फेरा विफल होतो असे म्हणणाऱ्या ज्ञानदेवांना नेमके कोणत्या कोटीतील नमन अपेक्षित आहे हे जाणून घ्यायचे झाले तर आपल्याला वळावे लागते ‘अमृताभवा’कडे. ‘शिवशक्ति समावेशे । नमन केले म्या ऐसे । रंभागर्भ आकाशे । रिगाला जैसा’ अशी त्या नमनाची आगळी परी मांडलेली आहे तिथे ज्ञानदेवांनी. सोपटाचे एकावर एक असे थर असतात केळीच्या खुंटावर. सोपटाच्या दोन थरांमधील पोकळीमध्ये वसत असते नितळ आकाश. सोपटाचे थर एकमेकांपासून विलग केले की दोन थरांच्या पोकळीत वसणारे आकाश निमिषार्धात महदाकाशात विलीन होऊ न जाते, तसे ‘नमन’ अभिप्रेत आहे इथे ज्ञानदेवांना. हा सगळांच प्रांत आहे अनुभवाचा. तर्काच्या चिमटीमध्ये नाही पकडता येणार तो आपल्याला. ‘स्व’च्या जाणीवरूपी सोपटांचे थर बाजूला काढून परतत्त्वाशी संपूर्ण सामरस्य म्हणजे ज्ञानदेवांना या संदर्भात अपेक्षित व अभिप्रेत असलेले ‘नमन’. ज्ञानदेवांनीच योजलेल्या उपमा द्यावयाच्या झाल्या तर तरंगाने प्रवाहाच्या पृष्ठभागाशी, सुवर्णमण्याने बावनकशी निराकार सोन्याशी एकरूप होऊन जाण्याचाच हा प्रकार. ‘भगवंत’ आणि ‘भक्त’ ही पृथक अस्तित्वे संभवतच नाहीत त्या एकमय अवस्थेत. मग कर्माचे फळ अथवा परिणाम तिथे चिकटावा कसा आणि कोणाला? ‘प्रारब्ध क्रियमाण। भक्तां संचित नाहीं जाण’ असे त्या प्रगाढ ऐक्याचे शब्दांकन करतात तुकोबाराय. अद्वयतत्त्वाचे हे म्हणजे परम परिणत दर्शन. ‘भक्त’ आणि ‘भगवंत’ या दोन अधिष्ठानांदरम्यान नांदणाऱ्या भावमधुर नात्याची लज्जत चाखण्यासाठी एकच तत्त्व दोन्ही रूपांनी विराजमान होते, असा तो सोहळा. ‘मी तुजमाजी देवा। घेसी माझ्या अंगें सेवा’ हे तुकोबांचे उद्गार साक्ष पुरवितात अद्वयबोधाच्या त्याच अनुभूतीची. उभे अस्तित्वच परतत्त्वमय झालेल्या अशा त्या नि:संग अवस्थेमध्ये कोणतेही कर्म हातातून घडले काय अथवा न घडले काय, त्याच्या उपाधीची काजळी कर्त्यांच्या ठायी उरण्याचा प्रश्न उरतोच कोठे? कर्त्यांची ही अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये त्याच्या हातून साकारणारी कर्मे म्हणजेच समूर्त भागवत धर्म. त्या जीवनरहाटीचे, ‘भागवतधर्मे राहे कर्म। तंव तंव सुखावे पुरुषोत्तम। बाधू न शके कर्माकर्म। भावें परुषोत्तम संतुष्ट’ हे नाथरायकृत वर्णन. तर, ‘देवभक्तपण । तुका ह्मणे नाहीं भिन्न’ ही तुकोक्ती म्हणजे जणू परमोच्च दर्शनच नि:संगपणे केलेल्या नमनाचे!