अभय टिळक

गाथेमध्ये तुकोबांचा एक विलक्षण गोड अभंग आहे.  निर्गुण-निराकार असा हृदयस्थ परमात्मा आणि गाभाऱ्यात अगर देवळात मूर्तीच्या माध्यमातून प्रतीत होणारे त्याचे साकार रूप यांच्यादरम्यानचे नाते तुकोबा- ‘‘सांटवला राहे हृदयसंपुष्टीं। बाहेर धाकुटी मूर्ति उभा।’’ अशा लाघवी शैलीमध्ये वर्णन करतात. हृदयाकाशाच्या एवढय़ाशा पोकळीमध्ये सामावलेले परमतत्त्व वस्तुत: किती व्यापक आहे, याचे दर्शन तुकोबा अन्य एके ठिकाणी- ‘‘एवढा प्रभु भावें। तेणे संपुष्टीं राहावें।’’ अशा कौतुकभरल्या शब्दांत मांडतात. परमतत्त्वाचे विश्वव्यापकत्व सूचित करण्यासाठी तुकोबांनी योजिलेला ‘एवढा’ हा शब्द कमालीचा आशयघन आहे. परमतत्त्वाचे ते ‘एवढे’पण ज्ञानदेव- ‘‘स्वर्ग जयाची साळोंखा। समुद्रपाळीं पिंड देखा। शेषासारखीं बैसका। जो आधार तिहीं लोकां।’’ इतक्या औरसचौरस विशालपणे उलगडून मांडतात. पिंडीच्या माध्यमातून मोटक्या दिसणाऱ्या-भासणाऱ्या परमशिवाचे दिक्काल व्यापून टाकणारे असीम रूपदर्शन घडवत, एक प्रकारे परमतत्त्वाच्या मूर्तीरूपाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीमध्येच ज्ञानदेव परिवर्तन घडवून आणतात. परमात्म्याचे एखाद्या मूर्तीच्या माध्यमातून घडणारे सान्त दर्शन व भवतालातील अणुरेणूमध्ये प्रतीत होणारे त्याचे अनन्त दर्शन यांतील एकात्मता उमगण्याने घडून येणारा दृष्टिपालट आपल्या मनावर बिंबवणे हा ज्ञानदेवांचा हेतू. आपला अंतस्थ सखा असणाऱ्या परमशिवाला मस्तकी धारण करून पंढरीक्षेत्रामध्ये विटेवर उभ्या असणाऱ्या श्रीविठ्ठलाच्या सान्त आणि अनन्त अशा उभय रूपांचे व त्यांतील आंतरिक सामरस्याचे प्रगटन ज्ञानदेवांनी एके ठिकाणी मोठय़ा खुबीने घडविलेले आहे. खांद्यावर पताका घेऊन नामघोषात रंगून वाटचाल करत पंढरीक्षेत्रामध्ये दाखल होऊन विटेवरील त्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन घडल्यावर होणारी आपली स्थिती, ज्ञानदेव- ‘‘जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवें। पाहतां रूप मनीं आनंद सांठवें।’’ अशा प्रत्ययकारी शब्दांत व्यक्त करतात. परंतु त्याच वेळी, विटेवर उभा ठाकलेला पांडुरंग काही तरी खुणावतो आहे, हेही वास्तव ते- ‘‘बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण। रूप विटेवरी दाविली खुण।’’ अशा शब्दांत सूचित करतात. तो पांडुरंग कोणत्या वास्तवाकडे खुणेने निर्देश करतो आहे, याचे विवरण ज्ञानदेवांनी गोकुळातील एका गवळणीच्या रूपकाद्वारे स्पष्ट केले आहे. योगीजनांनी कितीही ध्यानधारणा केली तरी आकळण्यास कमालीचे दुष्कर असणारे ते परब्रह्म मी प्रत्यक्ष बघितले, असा स्वानुभव निरपवाद प्रगट करणारी ती गवळण त्या दर्शनाने आपली अवस्था- ‘‘देखिला देखिला मायें देवांचा देवो। फिटला संदेहो निमालें दुजेपण।’’ अशी झाल्याचेही कथन करते. दुजेपण का मावळले याचे रहस्यही ती साक्षात्कारी गवळण पुढे- ‘‘अनंतरूपें अनंतवेषें देखिलें म्यां त्यासी। बापरखुमादेविवर खुण बाणली कैसी।’’ अशा शब्दांत सांगून मोकळी होते. कटीवर हात ठेवून विटेवर उभे सान्त चैतन्यच अनन्त रूपवेषांनी नटून जगदाकार प्रगटलेले आहे, ही खूण विठ्ठलदर्शनाने अंत:करणात स्थिर झाल्याचा जो दाखला ज्ञानदेव देतात, त्याचे गमक हेच. आता दुजेपण उरावे ते कसे व कोठे? चैतन्याची उपासना त्याच्या कोणत्या रूपाच्या माध्यमातून करायची हा झाला साधकाच्या रुचिवैचित्र्याचा भाग. परंतु कोणत्याही रूपाची उपासना केली तरी तो परमात्मा पावतोच हे अंतिम सत्य- ‘‘होय भक्तीं केला तैसा। पुरवी धरावी ते इच्छा।’’ अशा मार्मिक शब्दांत तुकोबा सांगून टाकतात, यातच सर्व आले!

agtilak@gmail.com