– अभय टिळक

तसे बघायला गेले तर अर्थशास्त्र आणि परमार्थशास्त्र या दोहोंचा संबंध अतिशय निकटचा आहे. एकतर ‘अर्थ’ हे पद दोन्ही प्रांतात समान आहे. फुकट काहीही  जीवनात मिळत नसते, हा धडा दोन्हीकडे शिकायला लागतो. वाचेने मोल वेचले नाही तर तो विठ्ठलही फुकाफुकी मिळणार नाही असे तुकोबांसारखा व्यवहारी वाणी बजावून सांगतो,ते काय उगाचच? मर्यादित साधने आणि अमर्याद गरजा, हा संघर्ष दोन्हींकडे आहेच. त्यांतही प्रपंच सांभाळून परमार्थ शिखराला न्यायचा, तर करावा लागणारा संघर्ष कमालीचा कडवा शाबीत होतो. मुळात आयुष्यच मोजके  असते त्याला काय करणार?  मागील काळ अज्ञानपणें। सरला स्वभावें त्या गुणें । नेणें आयुष्य जाले उणें।  पुढील येणें अंतरलें,अशी खंत तुकोबा व्यक्त करतात. कारण मोजक्या काळात साधनेचा केवढा पल्ला गाठायचा आहे, याचे प्रगल्भ भान त्यांच्या ठायी पुरेपूर असल्यामुळेच. काळ हा, अर्थशास्त्रात काय वा परमार्थ शास्त्रात काय, असा ‘रिसोर्स’ आहे, की त्याचे पुनर्निर्माण सर्वथा अशक्यच! त्यामुळे हाताशी असलेल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उत्पादक वापर करून घेण्याखेरीज गत्यंतरच नसते. ‘काळ’ नामक या साधनाचा असा सीमित असणारा पुरवठा अचूक हेरून हर क्षण कारणी लावतो तोच खरा विचक्षण अर्थवेत्ता आणि तोच खरा साधक! म्हणूनच आज अर्थशास्त्रात अभ्यासाबाबत सततचा कटाक्ष आवर्जून जपला जातो. सतत शिकेल तोच तरेल, हा येत्या काळातील अर्थकारणाचा बीजमंत्र ठरतो आहे. परमार्थशास्त्राचा अभ्यासक असणाऱ्या साधकालाही आस असते, ती तरून जाण्याचीच. त्यासाठी अभ्यास सतत करत राहावा लागतो, तो शिकण्याचा. अभ्यासाची सवय एकदा का मोडली की पुन्हा घडी बसणे परमार्थात तर महादुष्कर. सतत अभ्यासाचा परिपाठ जोपासावा लागतो, तो त्यासाठीच, हे ज्ञानदेव, श्रीकृष्ण मुखातून  तेणिं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर । लावीं मग शरीर । असो अथवा जावो  इतक्या निर्वाणीच्या भाषेत आपल्या सगळ्यांना बजावतात. साध्य जितके सूक्ष्म आणि अवघड तितका अभ्यासाचा नेट अधिक, हे सूत्र विद्यार्थ्याला मनोभावे जपावे लागते, हे ज्ञानदेव वारंवार सांगताना दिसतात. सतत अभ्यास चालू ठेवण्याचा असा योग ज्याला जीवनात साध्य झाला, त्याला अप्राप्य असे काहीच राहत नाही, असा निर्वाळा वजा दिलासा अगा अभ्यास योगु म्हणिजे। तो हा एकु जाणिजे । येणें काहीं न निपजे। ऐसें नाहीं,  ज्ञानदेव सर्व अभ्यासकांना देतात. निरंतर अभ्यासाच्या बाबतीत ‘शॉर्टकट’ मान्यच नाही संतांना.  ‘केला ढीगभर अभ्यास तरी कशावरून यश मिळेल?’ अशा प्रकारचे संदेह उत्पन्न करणारे संशयजंतू तर ज्ञानदेवांना उबगवाणेच  वाटतात!  हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्तन आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें।  मग नव्हे तरी कोपें, अशा शब्दांत ज्ञानदेव तशा शंकेखोरांची हजेरी घेतात. मन लावून अभ्यास करा आणि त्या उपरही फळ नाहीच पडले हातात, तर मग आदळआपट केलीत तर एकवेळ समजण्यासारखे आहे, इतक्या नितळ शैलीत ज्ञानदेव समजावतात. स्वभावत:च गतिमान असल्याने सतत विकास पावणारे नवतंत्रज्ञान शिकत राहण्यासाठी अभ्यासाची मानसिकता सदैव जोपासणे हाच बेरोजगारीच्या संभाव्य पुरातून तरून जाण्याचा तराफा ठरतो.ज्ञानोबा-तुकोबा त्या तराफ्याकडे केव्हापासून निर्देश करत आहेत!

agtilak@gmail.com