‘सत्य कटू असते’ हा लोकमानसातील एक लाडका व प्रस्थापित सिद्धान्त. इथे अंतर्भूत आहेत दोन बाबी. एक म्हणजे गैरसोयीचे असणारे आणि म्हणूनच ऐकण्यास अप्रिय वाटणारे वास्तवदर्शी बोल कानांना कटूच लागतात. बोचणारे कटुत्व शब्दांपेक्षाही इथे मुख्यत: गुणवाचक ठरते ते वास्तवाचे. अगदी गोड, कानांना मृदुमुलायम वाटणाऱ्या भाषेत जरी त्याचा उच्चार केला तरी ते वाटणार कटूच. सत्यदेखील मवाळ भाषाशैलीत प्रकट करावे असे ज्ञानदेव जे म्हणतात त्याचा रोख नेमका आहे तो यावरच. पण मुळातच कडवट असणारे वास्तव तीक्ष्ण, कर्णकटू रीतीने प्रकट केले तर होणारे क्लेश अधिकच झोंबतात. समाजशिक्षक संत साधत असतात या दोहोंचा सुवर्णमध्य. शिक्षकाबरोबरच ते निभावतात कुशल डॉक्टरची भूमिका. निष्णात डॉक्टरने दिलेले इंजेक्शन दुखरे नसते. आपण म्हणतो, ‘डॉक्टरचा हात हलका आहे बरे का!’ इंजेक्शनची सुई टोचल्याबरोबर वेदना होतातच, परंतु त्याला कारणीभूत असतो सुईचा अंगभूत टोकदार कठीणपणा. सुई टोचणाऱ्या डॉक्टरचा हात हलका असेल तर इंजेक्शन ठसठसत नाही. तुकोबांसारख्या मनस्वी समाजशिक्षकाच्या मुखातून प्रसंगवशात उमटणाऱ्या कडक उद्गारांची जातकुळी असते नेमकी अशीच. रोगी ठणठणीत बरा व्हावा या शुद्ध हेतूनेच डॉक्टर हलक्या हाताने अणुकुचीदार सुई दंडात सरकवत असतो. त्याच न्यायाने समाजाचे अंतिमत: हितच व्हावे या निरामय उद्देशाने तुकोबा तळमळून बोलतात तेव्हा त्यांचे शब्द भासतात टोकदार सुईसारखेच. खुद्द तुकोबाही ते अमान्य करत नाहीत. ‘देतों तीक्ष्ण उत्तरें। पुढें व्हावयासी बरें’ हे त्यांचे उद्गार यासंदर्भात पुरेसे स्पष्ट आहेत. आपण ध्यानात घ्यावयाचा तो तुकोबांच्या मनीचा भाव. शब्दांमधून पाझरत असतो ते शब्द उच्चारणाऱ्याच्या अंत:करणातील भाव. तो भाव टिपण्यात कसोटी लागते ती श्रोत्याची. शास्त्रीय संगीतासाठी ज्याप्रमाणे कान ‘तयार’ करावे लागतात, तसेच काहीसे इथेही आहे. इथे सवाल असतो तो ऐकणाऱ्याचे मन कितपत संवेदनशील आहे, हा. ‘पुढां स्नेह पाझरे। मागां चालती अक्षरें। शब्द पाठीं अवतरे। कृपा आधी’ या ‘ज्ञानेश्वरी’च्या १३ व्या अध्यायातील ओवीमध्ये ज्ञानदेवांना जे अपेक्षित आहे, ते हेच. शब्दांच्याही आधी प्रतीत होणारा वक्त्याच्या मनातील भाव टिपण्यासाठी श्रोत्याचे मनही तितकेच कोवळे हवे. किती कोवळे? तर चकोर पक्षाच्या नुकत्याच जन्मलेल्या पिलाइतके! शरद ऋतूतील कोवळ्या चंद्रकिरणांतून पाझरणारे अमृतकण चकोराची ‘तलगे’- म्हणजे तान्ही पिल्ले जितक्या कोवळिकीने पितात, तितक्या हळुवार, कोमल मनोभूमिकेत स्थिर होऊन तुम्ही माझे गीताख्यान ऐका, असे ज्ञानदेवांचे आवाहन आहे. ‘तियापरी श्रोता। अनुभवावी हे कथा। अति हळुवारपण चित्ता। आणुनियां’ हे ज्ञानदेवांचे सांगणे अंत:करणात रुजण्याइतपत ऋजुता आपल्या ठायी आहे की नाही, हे तपासायचे कोणी? अर्थातच आपण! ‘अहो अर्जुनाचिये पांती। जे परिसणया योग्य होती। तिहीं कृपा करोनि संतीं। अवधान दीजें’ असा पराकोटीचा मार्मिक इशारा ‘ज्ञानेश्वरी’च्या अगदी पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानदेव देतात, तो काय उगीच? अर्जुनासारख्या ऋजू मनाच्या श्रोत्याच्या पंगतीस बसण्याइतपत पात्रता आहे का कमावलेली आम्ही?

– अभय टिळक

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

agtilak@gmail.com