15 January 2021

News Flash

पोकळ प्रगती

जगातील सर्वच विवेकवाद्यांच्या पीछेहाटीचाच हा काळ, याची खूण जर्मनीतील राजकारण पाहिले असता पटते..

ब्यूनस आयर्स येथे आयोजित जी २० राष्ट्रांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्कल यांचे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

जगातील सर्वच विवेकवाद्यांच्या पीछेहाटीचाच हा काळ, याची खूण जर्मनीतील राजकारण पाहिले असता पटते..

‘‘सामान्य जर्मन नागरिक आपल्या सरकारविरोधात उभा राहात असून वाढती गुन्हेगारी, ढासळती कायदा व सुव्यवस्था याला तो कंटाळला आहे. त्या देशातील वाढते स्थलांतर या सगळ्याच्या मुळाशी आहे’’. वरवर पाहता एखाद्यास ही टीका जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांच्या कोणा राजकीय विरोधकाने केली असे वाटू शकेल. पण वास्तव तसे नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा ट्वीट. मर्केल यांचे सरकार स्थलांतरितांच्या मुद्दय़ावर कोसळणार असे दिसत असताना अत्यानंदात त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ती अस्थानी ठरली. ट्रम्प आणि मर्केल यांच्यातील तणावपूर्ण संबंध हा जागतिक राजकारणात उघड चच्रेचा विषय झाला असून मर्केल यांचे खमकेपण ट्रम्प यांच्या अर्निबध आचरट राजकारणाच्या वाटेतील महत्त्वाचा अडसर बनून राहिले आहे. मर्केल यांच्या सत्तात्यागात ट्रम्प यांना रस. वास्तविक हा त्यांचा ट्वीट म्हणजे सरळ सरळ दुसऱ्या देशाच्या कारभारात केलेला हस्तक्षेप आहे. असे करणे अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षास शोभत नाही. ट्रम्प हे विवेकवादी राजकारणासाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. परंतु आता ते अधिकाधिक अविवेकी होत असून मर्केल यांच्या संभाव्य गच्छन्तीबाबत असे मत व्यक्त करणे हा त्याचाच एक भाग. ट्रम्प यांचा हा ट्वीट वाया गेला. त्यांची इच्छा होती त्या प्रमाणे मर्केल यांचे सरकार पडले नाही. बाईंनी ते पाडण्याची धमकी देणाऱ्या आपल्या सहयोगी पक्षाशी समझोता केला आणि सरकार वाचवले. हे असे करणे हा संधिसाधूपणा झाला वगरे आपल्याला परिचित अशी टीका त्याबाबत होऊ शकते. पण ती अयोग्य ठरते.

याचे कारण मर्केल यांनी हाती घेतलेले मुद्दे. पश्चिम आशियाच्या वाळवंटातील सीरिया या देशात अनागोंदी माजल्यानंतर अनेकांनी आपापला जीव वाचवण्यासाठी देशत्याग करणे पसंत गेले. हा सीरिया, अफ्रिकेतील लिबिया आदी देश म्हणजे निव्वळ बजबजपुरी आहेत. त्या देशांतील नागरिक केवळ मरण येत नाही म्हणून जिवंत आहेत. ज्यांचे हातपाय धडधाकट आहेत ते जिवावर उदार होतात आणि एखादी होडी पकडून भूमध्य समुद्रात स्वतस झोकून देतात. इटली, ग्रीस, स्पेन अशा एखाद्या देशाच्या किनाऱ्यावर या होडय़ा धडकतात. तिकडे सीरियातील स्थलांतरित शेजारच्या तुर्कीमाग्रे पलीकडच्या बल्गेरिया आदी देशांत घुसून युरोपात प्रवेश मिळवतात. या भूमध्य समुद्री देशांच्या नौदलांना या अशा निर्वासितांच्या होडय़ा वाचवणे हे एक कामच होऊन बसले आहे. एकदा का एखाद्या युरोपीय देशात या विस्थापितांना चंचुप्रवेश मिळाला की युरोपीय संघातील कोणत्याही देशात ते घुसतात. युरोपीय देशांसमोर ही नवीन डोकेदुखी. ती कशी हाताळायची याबाबत या संघातील अनेक देशांत एकमत नाही. बहुतेकांना ही निर्वासितांची ब्याद नको असून अत्यंत निर्दयपणे त्यांना त्यामुळे हाकलून दिले जाते. यातील बहुतेक इस्लाम धर्मीय आहेत. हंगेरी, ऑस्ट्रिया, इटली अशा देशांनी तर त्यामुळे कडकडीत धर्मवादी भूमिका घेतली असून या निर्वासितांना थारा देण्यास बिलकूल नकार दिला आहे. यामुळे युरोपातील अनेक देशांत वंशवादास नव्याने उकळी फुटू लागली असून अनेक देशांनी आपापल्या सीमारेषा आणि किनाऱ्यांवरील बंदोबस्तात कमालीची वाढ केली आहे. हा युरोपीय महासंघाच्या सामाईक बाजारपेठ, परस्परांतील खुल्या सीमा अशा कल्पनांना निर्माण झालेला धोका.

तो दूर करण्याची राजकीय विचारशक्ती आणि आर्थिक ताकद आजमितीस एकच व्यक्ती आणि देश यांनी दाखवली. अँगेला मर्केल ही ती व्यक्ती आणि जर्मनी हा तो देश. मर्केल यांनी संपूर्ण युरोपीय महासंघाचा डोलारा आपल्या एकटय़ाच्या खांद्यावर तोलून धरला. जर्मनीच्या सर्वोच्च सत्तापदी निवडून येण्याची त्यांची ही चौथी खेप. परंतु ती आधीच्या तीन सत्ताकालाप्रमाणे निर्वेध नाही. मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षास स्वच्छ बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना अन्य दोन पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. ख्रिश्चन सोशल युनियन आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी हे त्यांचे दोन आघाडी सदस्य. यातील पहिला हा कडवा उजवा असून दुसरा डावीकडून मार्गक्रमण करण्यासाठी ओळखला जातो. या दोन्हीही पक्षांचे सदस्य मर्केल मंत्रिमंडळात आहेत. यातील ख्रिश्चन सोशल युनियनचे नेते आणि मर्केल मंत्रिमंडळातील देशांतर्गत कारभाराचे मंत्री होर्स्ट सीहोफर यांना मर्केलबाईंचा खुला सीमावाद मंजूर नाही. देशात येणाऱ्या स्थलांतरितांना थांबवण्याचा निर्णय घेतला नाही तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ आणि सरकारातून बाहेर पडू असा इशारा त्यांनी दिल्यानंतर मर्केल यांचे सरकार संकटात आले. चच्रेच्या अनेक फेऱ्यांनंतरही सीहोफर यांनी आपला इशारा मागे घेतला नाही. शेवटी सरकार वाचवण्यासाठी मर्केल एक पाऊल मागे गेल्या आणि मधला मार्ग म्हणून जर्मनीच्या सीमेवर स्थलांतरितांच्या तपासणी आदींसाठी स्वतंत्र छावण्या उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सर्व बाजूंनी या स्थलांतरितांची तपासणी, चौकशी होईपर्यंत त्यांना या छावण्यांतूनच मुक्काम करावा लागेल आणि देशात प्रवेश दिला जाणार नाही. या चौकशीचा निष्कर्ष अनुकूल नसेल त्यांना पुन्हा हाकलून दिले जाईल. मर्केलबाईंनी हा निर्णय घेतला. पण त्यामुळे दुसऱ्या बाजूचे सोशल डेमोक्रॅट्स बिथरले. या पक्षाचे धोरण स्थलांतरितांना सामावून घेण्याचे. काही प्रमाणात मर्केल यांच्या पक्षाशी जुळणारे. परंतु सत्ता टिकवण्यासाठी आपल्या धोरणांस त्यांना मुरड घालावी लागणार. हा प्रश्न इतक्यापुरताच मर्यादित नाही. जर्मनीच्या बव्हेरिया प्रांतात स्थानिक निवडणुका ऑक्टोबरच्या मध्यास अपेक्षित आहेत. जर्मनीच्या काही नितांतसुंदर प्रदेशांपकी हा एक. ऑस्ट्रिया या देशाच्या सीमेलगत असणाऱ्या या प्रांतात नवनाझीवादी आणि कडवे उजवे मोठय़ा प्रमाणावर वाढू लागले असून त्यांचाही स्थलांतरितांना देशात येऊ देण्यास विरोध आहे. आल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी असा नवा एक पक्ष या प्रांतात जम बसवू लागला असून त्याची ध्येयधोरणे प्रतिगामी म्हणता येतील अशीच आहेत. तरीही या पक्षाचा दिवसागणिक वाढणारा पाठिंबा ही बाब सगळ्यांचीच चिंता वाढवणारी ठरते. हे असे टोकाचे मागास आणि जोडीला नवनाझीवादी हे मिश्रण पुरसे स्फोटक म्हणावे लागेल.

ख्रिश्चन सोशल युनियन या पक्षाची काळजी आहे ती या नव्याने आणि वेगाने विस्तारणाऱ्या पक्षामुळे. एकदा एकाने टोकाची भूमिका घेतली की त्याच मताच्या दुसऱ्यास आपल्या लोकप्रियतेची पातळी राखण्यासाठी आणखी टोक गाठावे लागते. हे सर्वत्र होते. कारण विवेकाचे बोट सोडले की किती अविवेकीपणा करावा यास काहीही धरबंध राहात नाही. म्हणूनच लोकानुनयाच्या खेळात अडकणाऱ्याने पहिले पाऊल टाकण्यापूर्वीच विचार करावा लागतो. जर्मनीतील संबंधितांनी तो केला नाही. परिणामी आता हे दोन पक्ष आपल्याच खेळात अडकले असून मर्केल यांना सत्ता टिकवण्यासाठी संतुलन साधत राहण्याखेरीज पर्याय नाही. तूर्त ते त्यांनी साधले आहे. परंतु त्याच्या स्थिरतेची हमी नाही.

तसे पाहू गेल्यास हा प्रश्न फक्त जर्मनी वा मर्केल यांच्यापुरताच उरलेला नाही. जगातील सर्वच विवेकवाद्यांच्या पीछेहाटीचाच हा काळ असून आधुनिक अशा एकविसाव्या शतकातही जगातील एका मोठय़ा समूहास उभे राहू देईल अशी भूमीच नाही, ही यातील खरी शोकांतिका आहे. या निर्वासितांचा धर्म कोणता यावर त्यांना जगू द्यावयाचे की नाही हे ठरणार असेल तर मानवाने साध्य केलेली प्रगती किती पोकळ आहे हे दिसून येते. मर्केल यांचे सरकार हे केवळ निमित्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 2:17 am

Web Title: angela merkel chancellor of germany donald trump
Next Stories
1 शिवयोग..  शिवारातला
2 कुबडय़ांचे आरोग्य
3 वस्तू व सेवा कर : अर्थ आणि अनर्थ
Just Now!
X