News Flash

नाण्याची तिसरी बाजू ..

एकाकी आईबाप आणि माणुसकीशून्य मुले या दोन बाजूंखेरीज काही सुखी कुटुंबेही दिसतात..

नाण्याची तिसरी बाजू ..

एकाकी आईबाप आणि माणुसकीशून्य मुले या दोन बाजूंखेरीज काही सुखी कुटुंबेही दिसतात..

‘वंशवेल’ विस्तारत जावी, त्यावर बहरलेल्या फुलांनी आपल्या कर्तृत्वाचा सुगंध आसमंतात उधळून वंशाचे नाव उज्ज्वल करावे अशी अनेक जन्मदात्यांची पहिली इच्छा असते. त्यासाठी ते मुलांना त्यांच्या जन्मापासून घडवू लागतात आणि मुलांच्या ‘मोठे होण्याच्या’ प्रक्रियेतील प्रत्येक क्षणाचा आनंद अनुभवत दिवसागणिक सुखावत असतात. एका अर्थाने हे कुटुंबव्यवस्थेचे आदर्श लक्षण आहे. पशुपक्षीदेखील काहीसे असेच करतात. पण ते पिल्लांना कवटाळून राहत नाहीत. पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्याला झेप घेण्यास, किंवा अथांग आकाशात भरारी घेण्यास शिकवावे, ते बळ त्याच्या पंजात किंवा पंखात आले, की त्याला त्याच्या भविष्याच्या भरवशावर सोडून द्यावे आणि आपण आपले उरलेले जगणे जगावे ही पशुपक्ष्यांची जीवननीती असते. यामुळेच मानवी कुटुंबव्यवस्थेच्या वंशवेलीसारख्या कल्पनांच्या जंजाळात ते गुरफटून राहत नाहीत. माणसाचा असा भावनिक गुंता योग्य की अयोग्य हा प्रश्न बाजूला ठेवला, तरी कुटुंबव्यवस्था आणि वंशवेलीचा विस्तार, त्याचा आनंददायी बहर यांसारख्या कल्पनांमुळे अलीकडच्या काळात काही प्रश्न प्रकर्षांने अधोरेखित होऊ लागले आहेत. हे प्रश्न आज अचानक उद्भवलेले नाहीत. जग जवळ येण्याच्या प्रक्रियेला हुरळून जाऊन जेव्हापासून माणसाने प्रगत जगाच्या अवकाशात स्वत:ला झोकून देण्याचे आव्हान स्वीकारण्याची तयारी सुरू केली, तेव्हाच खरे म्हणजे हे प्रश्न तयार होऊ लागले होते. पण कधी कधी, आव्हानांना सामोरे जाण्याची रग एवढी प्रबळ असते, की त्यातून उद्भवू पाहणाऱ्या प्रश्नांचे सावटदेखील त्या वेळी विचारावर दाटतच नाही. पण म्हणून ते प्रश्न पुसले गेलेले नसतात. त्यांनी केवळ दडी मारलेली असते आणि डोके वर काढण्याची वाट पाहत ते तात्पुरते स्वस्थ असतात. त्यांच्या अंगी तेवढी सहनशक्ती असते, कारण आपल्याला वर येण्याची संधी मिळणार आहे याची त्यांना खात्रीही असते.

कालांतराने तसेच घडते. कदाचित हा काळ वेगवेगळा असतो, पण ते प्रश्न अनेकांच्या आयुष्यात डोकी वर काढतातच. आणि पुन्हा या भावनिक गुंत्यात गुरफटणे योग्य की अयोग्य यावर खल सुरू होतो. अशा गुंत्यात गुरफटलेल्यांच्या आयुष्याकडे माणुसकीच्या भावनेने पाहणारी हृदये कळवळून उठतात, आणि गुरफटलेल्यांविषयी सहानुभूतीचे महापूरही सुरू होतात. अशा वेळी दुसरी बाजूदेखील लक्षात घेतली जात नाही आणि दोषांची बीजे पेरली जातात, कोणता तरी एक वर्ग दोषांचा धनी होतो आणि वंशविस्तार आणि कर्तृत्वाला खतपाणी घालण्याच्या उमेदीचाच पश्चात्ताप करीत एक वर्ग होरपळू लागतो. अशा प्रकारे, दडून बसलेले ते प्रश्न केवळ डोकेच वर काढत नाहीत, तर उसळी मारून आनंदोत्सवच साजरे करू लागतात आणि समस्येचे जंजाळ अधिकाधिक गहिरे होऊन जाते.

वंशाचे नाव मोठे व्हावे या ईर्ष्येपायी मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन गुणवत्तेच्या स्पर्धेत उतरण्याची क्षमता त्यांच्या अंगी निर्माण करण्याच्या सोज्ज्वळ हेतूने आपल्या आयुष्याचा मोठा भाग त्यासाठी ‘समर्पित’ करणाऱ्या आईबापांच्या आजकालच्या कहाण्यांचा बराचसा भाग अशा समस्यांच्या केविलवाण्या ओळींनी व्यापलेला दिसतो. मुलाच्या जन्मापासूनच त्याचे भवितव्य घडविण्याची स्वप्ने पाहत त्याच्या आयुष्याला आकार देण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या आईबापांना एका क्षणी त्या स्वप्नपूर्तीचा आनंद होतो, त्या आनंदात ते मश्गूल असतानाच, कधी काळी लपून बसलेले ते प्रश्न नेमके डोके वर काढू लागतात. इथून पुढे या सुखी कहाणीला कारुण्याची किनार सुरू होते. उत्तरायुष्यातील एकाकीपण हा यापैकी बऱ्याचशा कहाण्यांचा शेवट असतो आणि एका आयुष्याला घडविण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावल्याचा पश्चात्ताप ही त्या कहाणीची अखेरची ओळ ठरते. गेल्या काही वर्षांत या कहाण्यांच्या उत्तररंगाला सुरुवात झाली आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी जगाची दारे सर्वाना खुली झाली आणि त्यानंतर त्या दरवाजातून आत गेलेल्या अनेकांना आपल्या घराचाच विसर पडला. पैसे कमावणे हाच समृद्धीचा, परवलीचा शब्द बनला, परदेशात गेलेल्या आणि तेथेच स्थायिक होऊन पैशाच्या राशींवर लोळणाऱ्या अनेक मुलांना मूळ घरटय़ाच्या भावनांचा स्पर्श जाणवेनासाच झाला आणि एकाकी आईबाप ही नवी समस्या निर्माण झाली. इतकी की, आई वा वडिलांच्या अंत्येष्टीलाही येणे मुलांना जड वाटावे.

परदेशात स्थायिक झालेल्या मुलांच्या प्रत्येक कुटुंबात असेच घडते असे नाही, पण काही केविलवाण्या कहाण्यांपुढे अशी सुखी कुटुंबे नाहक झाकोळूनही जातात.

माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने, समाजात रमतो, पण त्याआधी त्याकरिता त्याला कौटुंबिक स्वास्थ्याची गरज असते. कुटुंबात स्वास्थ्य असले की तो समाजात अधिक मोकळेपणाने रमतो. परदेशी स्थायिक झालेल्या मुलांशी भावनिक नाळ तुटल्याच्या वैफल्याने ते कौटुंबिक स्वास्थ्य हरवू लागते आणि विमनस्कपणा वाढू लागला की समाजात मन रमेनासे होते. एका बाजूला अशी मानसिक अवस्था आणि दुसरीकडे वाढते, उत्तररंगाकडे झुकणारे वय व त्यानुसार उद्भवू पाहणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची चिंता अशा कात्रीत सापडलेला हा वर्ग अधिकच एकलकोंडा होऊ लागतो. मग आसपासच्या समाजाकडे तो आधारासाठी आशाळभूतपणे पाहू लागतो आणि त्यातून निराशा आली, की जगण्याची उमेदही संपून जाते. आजकाल, वृद्धाश्रम नावाची एक व्यवस्था समाजात फोफावू लागल्यापासून, परदेशात पशांच्या राशीत लोळणाऱ्या मुलांची अशा जन्मदात्यांच्या उत्तरायुष्याची चिंता काहीशी कमी होऊ लागली आहे. दक्षिणेकडील काही राज्यांत, शिक्षण पूर्ण होताच पैशासाठी परदेश गाठण्याची परंपराच सुरू झाल्याने, एकाकी वृद्धांच्या समस्येवर तोडगा म्हणून वृद्धाश्रमांची गरज वाढू लागली आहे, तर कुटुंबाने नाकारल्यामुळे एकाकीपण आलेल्या असंख्य महिला वृंदावनसारख्या तीर्थक्षेत्रात चार भिंतींआड सक्तीच्या कृष्णभक्तीत आपले उर्वरित आयुष्य संपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.

असे चित्र गडद झाले, की साहजिकच, ज्यांच्या पदरात त्याची केविलवाणी फळे पडू लागतात, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटू लागते. पुढच्या पिढीच्या अव्हेरलेपणामुळे एकाकी झालेल्यांची कीव आणि अव्हेरणाऱ्यांविषयी संताप अशा संमिश्र भावना उमटू लागतात आणि पुढच्या पिढीतील अनेक जण कुटुंबव्यवस्थेतील खलनायक ठरू लागतात. त्यांच्यावर माणुसकीशून्यतेचा ठपका बसून जातो आणि बऱ्याचदा, या समस्येची अदृश्य असलेली तिसरी बाजू पुढे येतच नाही. या नाण्याला, एकाकी आईबाप आणि माणुसकीशून्य मुले एवढय़ा दोनच बाजू नाहीत, हे कदाचित अनेकांना माहीतही असते, पण ती तिसरी बाजू दुर्लक्षिलीच जाते. अशा परिस्थितीमुळे एकाकी आईबापांचा तर अखेरची आशा असलेल्या आपल्या पुढच्या पिढीचा आधार अधिकच तुटत जातो, आणि काही नाती कायमची हरवून जातात. बदलत्या काळाची आव्हाने सक्षमपणे पेलण्याची क्षमता मुलांच्या अंगी यावी या ईर्ष्येने झपाटलेले असताना, हीच क्षमता आपणही मिळवायला हवी याचा त्या क्षणी विसर पडलेला असतो, हे जन्मदात्या पिढीच्या लक्षातच येत नाही आणि पिढय़ांमधील अंतराची सार्वत्रिक समस्या उग्र होते.

मुंबईसारख्या महानगरांतील एकाकीपणाची समस्या अशाच एखाद्या प्रसंगातून अधोरेखित होते, तेव्हा नाण्याच्या दोनच बाजूंची चर्चा होते. मुंबईच्या फोर्ट भागातील एका एकाकी वृद्धाच्या मृत्यूनंतर परदेशातील त्याच्या मुलाने नाकारलेल्या नात्याची सध्या अशीच चर्चा सुरू आहे. नाती नाकारण्यामागील कारणांमध्ये अशी तिसरी बाजू लपलेली असू शकते. ज्या पंखांमध्ये भरारीचे बळ भरण्यासाठी खस्ता खाल्लेल्या असतात, ते पंख भरारी मारणारच हे वास्तव स्वीकारण्याची तयारी असणे ही ती तिसरी बाजू! नाण्याच्या दोन बाजू पाहण्याची सवय कधी तरी बदलायला हवी, हेही खरेच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 2:29 am

Web Title: articles in marathi on lineage tradition
Next Stories
1 पटेल – न पटेल
2 आभास आणि वास्तव
3 जन्मदिन की स्मृतिदिन?
Just Now!
X