अशी व्यक्ती दुसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणुकीतही कोटीहून अधिक जनप्रिय मते मिळवू शकते, ही जगातील अत्यंत मोठय़ा, जुन्या, समृद्ध लोकशाहीची शोकांतिका!

गेली चार वर्षे अमेरिकेत जे धोक्याचे इशारे दिले जात होते ते अखेर खरे ठरले. म्हणून ‘कॅपिटॉल’ या अमेरिकी संसद अर्थात काँग्रेसच्या इमारतीत नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आणि नवनिर्वाचित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या निवडीवरील शिक्कामोर्तबाचे सोपस्कार उरकले जात असताना, विद्यामान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाडोत्री गुंडांनी (त्यांना समर्थक संबोधणे हाच मुळी बालिशपणा) त्या इमारतीवर केलेला हल्ला अभूतपूर्व असला तरी अनपेक्षित नव्हता. जॉर्जिया या अमेरिकी राज्यातील दोन्ही सेनेट-जागांवर डेमोक्रॅट उमेदवारांचा विजय नक्की झाल्यावर लगेच तो चढवला गेला हेही दखलपात्रच. मूळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीइतकेच जॉर्जियातील या निवडणुकीकडे अमेरिकेचे लक्ष लागलेले होते. दोन्ही जागांसाठी निकराची लढत झाली आणि त्या डेमोक्रॅट्सच्या पदरात पडल्या. याचा अर्थ सेनेटमध्ये आता डेमोकॅट्र्स आणि रिपब्लिकन यांचे संख्याबळ ५०-५० असे समसमान झाले आहे. अध्यक्ष डेमोक्रॅट पक्षाचा आणि प्रतिनिधिगृहातही याच पक्षाचे बहुमत. सेनेटमध्ये मतदान झाले आणि ५०-५० अशी कोंडी झाल्यास पीठासीन अधिकाऱ्याचे मत निर्णायक ठरते. सेनेटमध्ये २० जानेवारीनंतर कमला हॅरिस या पीठासीन अधिकारी बनतील. त्यामुळे हे सभागृहही डेमोकॅट्र्सच्या ताब्यात येईल. ही सारी गणिते ठाऊक असल्यामुळेच या संपूर्ण प्रक्रियेत खोडा घालण्याचे प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प अनेक दिवस करत होते. सेनेट आणि प्रतिनिधिगृहाचे सदस्य वॉशिंग्टन डीसीमधील ‘कॅपिटॉल’ इमारतीत बुधवारी, ६ जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी पोहोचत असताना, तेथून जवळच ट्रम्प यांचे समर्थक जमले होते. त्यांना ट्रम्प यांनी जहाल भाषण करून चिथावणी दिलीच होती. एरवी ट्रम्प यांच्या अमदानीत ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’सारखी लोकशाही मार्गाने झालेली जनआंदोलने मोडून काढण्यासाठी जंगी फौजफाटा तैनात केला जात असताना, अमेरिकी काँग्रेससारख्या अत्यंत महत्त्वाच्या इमारतीत संयुक्त अधिवेशनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी मात्र तुरळकच पोलीस व निमलष्करी जवान उपस्थित होते. त्यांचे कवच-कडे भेदून ट्रम्प यांच्या गुंडांनी विविध मार्गानी कॅपिटॉल इमारतीत घुसखोरी केली. धातूतपासणी यंत्रांना बगल देत मुख्य सभागृहांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातील काही सशस्त्र होते आणि त्यांचा हेतू अजिबातच शुद्ध नव्हता. घुसखोरांची संख्या जास्त असती, तर अनवस्था प्रसंग ओढवला असता. कारण घुसखोर कशालाही बधणार नव्हते नि कोणासाठीही थांबणार नव्हते. संधी मिळाली असती, तर त्यांनी हाती लागेल त्या काँग्रेस सदस्याचे बरे-वाईटही केले असते. कारण ‘कॅपिटॉलमधील सत्तापालट प्रक्रिया थांबवा’ असा आदेश त्यांच्या ‘म्होरक्या’नेच दिलेला होता.

अमेरिकी लोकशाहीच्या सर्वोच्च प्रतीकावर झालेला बुधवारचा हल्ला जगाला आणि विशेषत: लोकशाहीवाद्यांना अस्वस्थ करणारा असला, तरी यापेक्षा वेगळे आणि बरे ट्रम्प यांच्याकडून काय अपेक्षित होते? लोकशाही मूल्यांची, लोकशाही प्रथांची यथेच्छ टवाळी करणारे ट्रम्प लोकशाही प्रतीकांविषयी कशाला ममत्व बाळगतील? अशा व्यक्ती लोकशाही मार्गाने निवडून येत असल्या, तरी लोकशाही बळकट करण्यात त्यांना कोणतेही स्वारस्य नसते. उलट आपले हितसंबंध साधण्यासाठी लोकशाही पोकळ करण्यालाच त्यांचे प्राधान्य असते. हे महाशय अशी काहीतरी गडबड करतील याचा सुगावा तेथील बहुतेक प्रमुख प्रसारमाध्यमांना आणि राजकीय विश्लेषकांना लागला होताच. पण अमेरिकेचा मावळता अध्यक्ष या थराला जाईल, याची कल्पना मात्र फारच थोडय़ांना होती. त्यातही उपाध्यक्ष माइक पेन्स आणि प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी निर्धार करून शिक्कामोर्तब अधिवेशनाला काही तासांतच पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे ट्रम्प यांचा अखेरचा डावही हाणून पाडला गेला. दुसरीकडे ट्विटर आणि फेसबुक या दोन्ही प्रमुख समाजमाध्यमांनी ट्रम्प यांची बेताल, बेजबाबदार, चिथावणीखोर भाषणे ‘पुसून’ टाकली, ट्रम्प यांना प्रतिबंधित केले आणि आपल्याला लोकशाहीची बूज आणि लोकशाहीभंजकांविरोधात उभे राहण्याचा कणा असल्याचे दाखवून दिले. फेसबुक वा ट्विटरसारख्या काहीही प्रसिद्ध करू दिले जाणाऱ्या माध्यमांनाही ट्रम्प नकोसे झाले ही तर अवमूल्यनाची परिसीमा. या एका कारणासाठी रिपब्लिकन पक्षाने ट्रम्प यांच्याशी काडीमोड घ्यायला हवा. पण.. हे पुरेसे नाही! याची कारणे अनेक आणि यांतील बहुतेक अस्वस्थ करणारी..

ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पराभवावर बुधवारी मध्यरात्रीनंतर शिक्कामोर्तब झाले. पण आपला विजय होतो तोवर लोकशाहीवर विश्वास आणि लोकशाही मार्गानेच होणारा पराभव दिसू लागल्यावर तिच्या वस्त्राला हात घालायचा ही प्रवृत्ती एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. हे विष आता संस्थात्मक, सामूहिक आणि संघटनात्मक स्वरूप धारण करू लागले आहे. ही अत्यंत धोकादायक बाब. अमेरिकेतील एकाही घटनात्मक संस्थेला, परंपरेला वा उच्चपदस्थ व्यक्तींना ट्रम्प यांनी शिवीगाळ करण्याचे सोडले नाही. राज्या-राज्यांतील निवडणूक कार्यालये व कर्मचारी, पोलीस, निमलष्करी दले, राज्यांचे गव्हर्नर व विधिमंडळे, राज्यांतर्गत न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय, काँग्रेस सदस्य, काँग्रेसमधील पीठासीन अधिकारी, स्वपक्षीय ज्येष्ठ नेते, अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स आणखी बरेच कितीतरी. अत्यंत शिवराळ टिप्पणी करणे, वाट्टेल तसे आरोप करणे, आत्मप्रौढीत मग्न राहणे, कोविड-१९सारख्या महासाथीचा धोका न ओळखणे, प्रतिबंधात्मक उपायांची आणि आरोग्य यंत्रणेची खिल्ली उडवणे असे सगळे प्रकार करणारी व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आहे, हा निव्वळ विनोदाचा भाग ठरू शकत नाही. उलट अशी व्यक्ती दुसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणुकीतही एखाद कोटीहून अधिक जनप्रिय मते मिळवू शकते, ही केवळ अमेरिकेची शोकांतिका नाही. जगातील अत्यंत मोठय़ा, जुन्या, समृद्ध लोकशाहीची ती शोकांतिका आहे. ट्रम्प आणि त्यांचे उनाड समर्थक जगभर इतरत्रही आढळून येऊ लागले आहेत. कारण आज ट्रम्प पराभूत झाले असले, तरी ‘ट्रम्पवाद’ निव्वळ जिवंतच नाही, तर फोफावतही आहे. काय आहे हा ‘ट्रम्पवाद’?
‘ट्रम्पवादा’मध्ये बहुसंख्याकवाद आहे. वर्णद्वेष आहे. वंशद्वेष आहे. लिंगभावद्वेष आहे. स्थलांतरितांविषयी तुच्छता आहे. आत्मप्रौढी आहे. संकटांना न जोखताच त्यांच्यावर विजय मिळवू किंवा विजय मिळवला अशा बढाया बडवण्याची अल्पमती प्रवृत्ती आहे. जुने ते भव्य, असे आधुनिक संसाधने ओरपत ओरडत राहण्याचे अप्पलपोटे प्रतिगामित्व आहे. लोकशाहीविषयी, लोकशाही प्रतीकांविषयी तुच्छता आहे. पराभव न स्वीकारण्याची कोती मनोवृत्ती आहे. सतत स्वत:ला मिरवणे अथवा कोणाची तरी जिरवणे याच कोंडीत बंद झालेले आत्ममग्न, स्वयंकेंद्री मन आहे. ‘ट्रम्पवाद’ अमेरिकेपुरता सीमित नाही. कोविड- १९सारखाच त्याचाही फैलाव जगभर सुरू आहे. ‘कॅपिटॉल’ इमारतीवरील हल्ला ही या फैलावाची नांदी आहे. डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती २०२४मध्ये पुन्हा उभी राहिली आणि निवडून आली (ती शक्यता अजिबात नाकारण्यासारखी नाही!) तर आपल्या अधिकारात कोणाचा तरी जाहीर खूनही घडवून आणू शकेल. तेव्हा कदाचित ‘कॅपिटॉल’च नव्हे, तर इतर देशांतील संसदांवरही हल्ले होऊ शकतील! कामच काय संसदेचे? चालते काय त्या इमारतींमध्ये? अर्थात असे काही इतर देशांमध्ये घडून येण्यासाठी ट्रम्प निवडून येण्याचीही काय गरज? त्यासाठी लोकशाही नकोशी असलेला ‘ट्रम्पवाद’ समाजात मुरलेला असला, तरी पुरेसे आहे. हे होऊ द्यायचे नसेल, तर ट्रम्पवादी अवमूल्यांना तिलांजली द्यावी लागेल. अमेरिकेत याची सुरुवात झालेली आहे. पण ही प्रक्रिया निव्वळ ट्रम्प नव्हे, तर ‘ट्रम्पवाद’ पराभूत झाल्यासच सुफळ संपूर्ण मानावी लागेल. ते मात्र अजून घडलेले नाही. उलट सांप्रतकाळी ट्रम्पवाद हा टरारताना दिसतो. तेव्हा सावध राहिलेले बरे!