जगासमोर स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मूल्ये आली त्याआधी आपले बरे होते.. बळी तो कान पिळी, या साध्या तत्त्वाने जगता येत होते..

फ्रान्समधील साँ पिएर डि’ओलेराँ या गावी येणाऱ्या पर्यटकांच्या मागणीशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. या अत्यंत शांत ग्रामी पर्यटक येतात ते सध्या अत्यंत दुर्मीळ झालेल्या शांततेच्या शोधात. ती या ग्रामी ठासून भरलेली असल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. तथापि त्यास तडा जातो तो मॉरीस यांच्यासारख्या नतद्रष्टांच्या आवाजाने. तेव्हा या मॉरीस यांच्यासारख्यांची या गावातून हकालपट्टी करावी अथवा त्यांची मुंडी मुरगाळून कायमचाच त्यांचा आवाज बंद करून टाकला जावा अशी मागणी पर्यटकांनी केली. त्यामुळे गावकरी विरुद्ध पर्यटक असा नवा संघर्ष फ्रान्समधे सुरू झाला असून प्रकरण पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईल अशी चिन्हे आहेत. इतकेच नव्हे तर मॉरीस याच्या बाजूने फ्रान्समध्ये स्वाक्षरी मोहीमदेखील सुरू झाल्याचे दिसून येते. तरीही आमचा पाठिंबा मॉरीस विरोधात भूमिका घेणाऱ्यांना असून बहुमताचे वारेदेखील त्याच बाजूने वाहताना दिसतात. अलीकडे बहुमताची तळी उचलून धरण्यात किती शहाणपण आहे हे आम्हाला कळून चुकले आहे. त्यामुळे मॉरीस विरोधातील भूमिकेत बदल करण्याची गरज आम्हास वाटत नाही.

दुसरे असे की मॉरीसने मुळात ओरडण्याची गरजच काय, हा त्या पर्यटकांचा मूळ प्रश्न, आम्हाला अत्यंत सयुक्तिक वाटतो. मॉरीसने बांग दिली नाही, म्हणून उजाडायचे थोडेच राहणार आहे. तेव्हा मूळ मुद्दा हा की मॉरीसने आरवण्याची गरजच काय? कोंबडा असला म्हणून काय झाले, मॉरीसने बदलत्या काळानुसार बदलायला नको? आपल्या आरवण्याने आपल्या गावी येणाऱ्या पर्यटकांची झोपमोड होते, हे मॉरीस यास नव्हे तरी निदान त्याच्या मालकांना कळायला हवे. याची जाणीव त्यांनाही नसणे हे आधुनिक काळातील केवढे पाप. मुळात कोंबडे आजकाल कोणी पाळावेच का? काय उपयोग असतो या सदैव केकाटणाऱ्या जिवाचा? आता आपल्या ओरडण्याची गरज नाही, हे कोंबडय़ांनी लक्षात घ्यायलाच हवे. आपण ओरडलो अथवा नाही तरी सूर्य उगवणे थांबणारे नाही, हेदेखील कोंबडय़ांना कळू नये, यास काय म्हणावे? एक काळ होता जेव्हा त्यांच्या आरवण्याचे म्हणून महत्त्व होते. पण नंतर काळ बदलला. घडय़ाळे आली, नवनवी साधने आली.. मोबाइल फोनही आले. आणि आता तर वायफाय आले. तेही मोफत. एक वेळ नळास पाणी नसेल. पण आमच्या मोबाइलांत ते वायफायचे आडवे कंस कसे भरलेले असतात. त्यामुळे मुंबईत राहून कोकणात गजर लावण्याची सोय झाली. अशा वेळी कोणाला हवे ते कोंबडय़ाचे पारंपरिक कर्णकटू असे केकाटणे? तेव्हा ते पर्यटक म्हणतात तेच बरोबर. कोंबडय़ांचे आरवणे बंदच व्हायला हवे.

त्याचे दुसरे कारण म्हणजे आपल्या आरवण्यामुळेच सूर्य उगवतो असे अलीकडे कोंबडय़ांना वाटू लागले आहे. बैलगाडीखालून चालणाऱ्या सुण्यास ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावरची बैलगाडी आपल्यामुळे चालत असल्याचा भास होऊ लागतो तद्वत या कोंबडय़ांचे वर्तन असते. नाही ओरडले कोंबडे एखाद दिवस तर सूर्य उगवणार नाही, असे होईल की काय? अजिबात नाही. खरे तर आपल्या आरवण्याने काही घडते असे वाटून घेणाऱ्या समाजातील काही घटकांचे प्रतिनिधित्व या कोंबडय़ा करतात. या अशा घटकांनाही कोंबडय़ांसारखेच वाटत असते. म्हणून हे घटकही उगाचच आरवत असतात. आता त्यांनाही कळायला नको की आपण बोंब ठोकली नाही तरी समाजाचे काही बिघडत नाही. आणि अशी बोंब ठोकण्यापेक्षा मौन पाळणे अधिक फलदायी असते हे यांनी लक्षात घ्यायलाच हवे. मौनं सर्वार्थ साधनम् असे आपल्याही संस्कृतीत सांगितलेले आहेच. फ्रेंच कोंबडय़ास कदाचित हे माहीत नसेल. पण भारतीय कुक्कुटांनापण याची जाणीव नसावी, या कर्मास काय म्हणावे बरे?

पण त्या फ्रेंचांची कमाल म्हणायची. त्यांनी कोंबडय़ांच्या आरवण्याच्या हक्क रक्षणार्थ स्वाक्षरी मोहीमच हाती घेतली. काय तर म्हणे आरवणे हा कोंबडय़ांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही राखणारच. आरवणे हे कोंबडय़ाचे व्यक्त होणे आहे आणि त्याच्याही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण व्हायला हवे असे फ्रेंच मानतात. हा कसला खुळेपणा? कोंबडय़ांचा कसला जन्मसिद्ध हक्क? तसा तो असतो असे मानणाऱ्यांनी भारतातील कोणत्याही शहर अथवा गावात भल्या पहाटे फेरी मारावी. मिळेल त्या वाहनांस एकसमयावच्छेदे शीर्षांसनावस्थेत जिवंतपणी टांगून त्यांना मोक्षासाठी लीलया नेले जात असते. कशा सुतासारख्या सरळ झालेल्या असतात या कोंबडय़ा. आरवणे नाही की कलकलाट नाही. मुकाट लटकत राहतात. त्यांचे कसले आलेत जगण्याचे हक्क, हे या फ्रेंचांना कळायला हवे. अर्थात असे काही कळून घेण्याची कुवत नसल्यानेच त्यांना फ्रेंच राज्यक्रांती आदी कटकटी सहन कराव्या लागल्या. त्यामुळेच तर जगासमोर स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी कटकटमूल्ये आली. त्याआधी आपले बरे होते. बळी तो कान पिळी, या साध्या तत्त्वाने जगता येत होते. दुसऱ्याचा कान पिरगळता येईल, इतके बळ तरी कमवायचे आणि ते न जमल्यास आपले कान पिळून घ्यायचे, असा सोपा मामला. उगाच कोणाच्या.. आणि त्यातही कोंबडय़ांसारख्या क्षुद्र जिवांच्या.. मूलभूत हक्कांचे रक्षण वगैरे करण्याची उठाठेव करायला सांगितलीये कोणी?

आणि हे मूलभूत अधिकार वगैरे सर्व काही थोतांड असते हे या फ्रेंचांना सांगण्याचीदेखील गरज दिसते. माणसांची संख्या अधिक की कोंबडय़ांची? उत्तर साधे आहे : माणसांची. म्हणजे माणसे बहुमतात असा त्याचा अर्थ. म्हणजेच जे कोणी अल्पमतात आहेत त्यांनी मान खाली घालून जगायचे. तेव्हा बहुसंख्यांना जर वाटत असेल की कोंबडय़ांनी आरवून आपली झोपमोड करू नये तर अल्पसंख्य कोंबडय़ांना ते ऐकायलाच हवे. मग भले अशी मागणी त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी का असेना. बहुसंख्याकांची इच्छा हाच अल्पसंख्याकांसाठी कायदा. तेव्हा उगाच कोंबडय़ांनी आपल्या हक्कांवर गदा वगैरे भाषा करण्याची गरज नाही. ती खरे तर कोंबडय़ांकडून केली जात नाही. क्वॅक क्वॅक किंवा तत्सम आवाज करण्यापलीकडे त्यांना येते काय? ही भाषा केली जात आहे ती कोंबडय़ांचा पत्कर घेणाऱ्या माणसांकडून. हा मानवी दुटप्पीपणा झाला. कोंबडय़ा आपल्या माना मुरगाळून घेण्यास तयार असताना त्यांना उगाच हक्कबिक्क अशा फालतू गोष्टींची जाणीव करून देण्याची गरजच काय? या आणि अशा बदचालींची सवय कोंबडय़ांनाही लागल्यास त्यांच्यात वैचारिक प्रदूषणाचा धोका संभवतो. हे फार म्हणजे फारच भयानक. एक वेळ हवापाण्याचे प्रदूषण परवडले. त्याने केवळ जीव जातो. इतके नवे जीव पदा होत असताना असा कोणाचा जीव गेल्याने काही आकाश कोसळत नाही. पण वैचारिक प्रदूषणाने मात्र पिढय़ाच्या पिढय़ा बरबाद होतात. तसे झाल्यास या अल्पसंख्याक कोंबडय़ांनी माना मुरगाळून घेण्यास नकार दिला तर केवढी अडचण होईल समस्त मानव जातीची? याचा काही विचार त्या फ्रेंचांनी केलेला दिसत नाही.

तेव्हा ते मानवी हक्क वगैरे भोंगळ चर्चा करण्याचे काहीही कारण नाही. ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, आधुनिक पसायदानात चेतना चिंतामणींच्या गावी शांतता उपभोगायची असेल तर हे कल्पकुक्कुटांचे आरव बंदच व्हायला हवेत. कोंबडय़ांचा आरवण्याचा हक्क काढून घ्यायलाच हवा. त्यासाठी प्रसंगी आवश्यक ती घटनादुरुस्ती फ्रेंचांनी करावी, आमचा तीस पाठिंबाच राहील.. आमच्या पाठिंब्याने अथवा विरोधाने काहीही फरक पडणार नाही हे माहीत असले तरीही!