08 April 2020

News Flash

‘आप’धर्माचा विजय!

लोकशाही राष्ट्राच्या इतिहासात अशा काही निवडणुका येतात की ज्यांत जनतेचा राजकीय विवेक पणाला लागलेला असतो.

‘आप’च्या विजयाच्या आकारापेक्षा भाजपच्या पराभवाची भव्यता अधिक लक्षणीय आणि दूरगामी परिणाम करणारी आहे..

दिल्ली विधानसभेचा दर्जा हा मोठय़ा महानगरपालिकेपेक्षा अधिक नाही. पण या निवडणुकीतही भाजपने आपली सर्व ताकद पणास लावली. विवेकास रजा देऊन विखारी प्रचार केला. परंतु मतदारांनी सकारात्मक पर्याय निवडला..

लोकशाही राष्ट्राच्या इतिहासात अशा काही निवडणुका येतात की ज्यांत जनतेचा राजकीय विवेक पणाला लागलेला असतो. दिल्ली विधानसभा निवडणूक ही अशी होती. तीत, सुमारे २७५ खासदार, डझनभर आजी-माजी मुख्यमंत्री, जवळपास संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, यांचे नेतृत्व करायला साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सूत्रसंचालकपदी गृहमंत्री अमित शहा, मदतीला दिल्ली पोलीस आणि कणाहीन निवडणूक आयोग इतके सारे हाताशी असूनही ‘आम आदमी पक्षा’ने मदमस्त भारतीय जनता पक्षाला किरकोळीत धूळ चारली. ही दिल्लीकरांसाठी अभिमानास्पद बाब. निवडणूक प्रचारात प्रचंड विष आणि विखार कालवण्याचा प्रयत्न करूनही दिल्लीतील मतदारांचा विवेक ढळला नाही हे विशेष. ही निवडणूक अनेकार्थानी महत्त्वाची आहे. कोणत्याही निवडणुकीत एखादा पक्ष जिंकतो आणि एखादा हरतो इतक्या मर्यादित अर्थाने भाजपच्या पराभवाची आणि म्हणून आपच्या विजयाची मीमांसा करता येणार नाही. या निवडणुकीतील ‘आप’च्या विजयाच्या आकारापेक्षा भाजपच्या पराभवाची भव्यता अधिक लक्षणीय आणि दूरगामी परिणाम करणारी आहे. म्हणून ती समजून घ्यायला हवी.

याचे कारण मावळते पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षपदाचा सुरुवातीचा काळ वगळता भाजपला एकाही राज्यात निर्वविाद विजय मिळवता आलेला नाही, हे इतकेच नाही. भाजपने आपली सर्व ती ताकद या निवडणुकीत पणास लावली होती आणि तरीही त्या पक्षाचा पराभव झाला हेदेखील नाही. जवळपास प्रत्येक मतदार कुटुंबामागे एक कार्यकर्ता लावून आणि प्रचाराचा कानठळी धडाका करूनही मतदारांनी भाजपकडे दुर्लक्षच केले ही बाबही तितकी महत्त्वाची नाही. हे सर्व मुद्दे खरेच. पण त्यापेक्षाही खरा आणि डोळ्यात भरणारा मुद्दा म्हणजे कोणत्या निवडणुकीत किती ताकद मदानात उतरवायची या आणि लढाईनुसार शस्त्र आणि अस्त्रेही बदलावी लागतात या शहाणपणास भाजपने पूर्णाशाने दिलेली तिलांजली. चकमक, संघर्ष, लढाई, युद्ध आणि महायुद्ध असे काही प्रकार असतात हे भाजपच्या गावीही नाही. त्यामुळे छोटेखानी निवडणुकीतही हा पक्ष बेंबीच्या देठापासून रणदुंदुभी छेडतो. आणि म्हणून अधिकाधिक हास्यास्पद ठरतो. कितीही व्यापक अर्थाने पाहू गेल्यास दिल्ली विधानसभेचा दर्जा हा एखाद्या महानगरपालिकेपेक्षा अधिक नाही. पण या निवडणुकीतही भाजपने आपली सर्व ताकद पणास लावली आणि खुद्द पंतप्रधान मोदी हे शिंगे दुमडून वासरात शिरले. याची गरज नव्हती. तथापि असे करावे लागते यातच भाजपची असहायता दिसून येते. त्या पक्षाच्या हाती एकमेव शस्त्र आणि एकमेवच अस्त्र. लढाई झारखंडची असो की मुंबईची किंवा दिल्लीची. भाजप-हाती दुसरे शस्त्रास्त्रच नाही. अशा वेळी अधिक शहाणपणा दाखवण्याऐवजी हा पक्ष उरला-सुरला विवेकही घालवून बसतो.

आणि अधिकाधिक धर्मवादी आणि अधिकाधिक विखारी होत जातो. दिल्ली विधानसभा निवडणुकांत हेच दिसून आले. देश के गद्दारों को.. पासून शाहीनबागेस विजेचा धक्का देण्याची भाषा करण्यापर्यंत जे जे अभद्र ते ते सारे भाजपने या निवडणुकीत करून पाहिले. त्यामुळे ही निवडणूक या देशातील आतापर्यंतची सर्वात गलिच्छ निवडणूक म्हणून नोंदली जाईल. ही बाब अधिक गंभीर ठरते कारण केंद्रात दणदणीत बहुमताने सत्तेवर असलेल्या पक्षाने हा असा असांसदीय मार्ग अवलंबण्याची गरज नव्हती. हे असे करण्यात खुद्द पंतप्रधान मोदी हेदेखील मागे राहिले नाहीत, ही बाब क्लेशकारक आणि चिंता वाढवणारी. खरे तर बेजबाबदारपणे बरळणाऱ्या आपल्या कनिष्ठांचे कान मोदी यांनी उपटायला हवे होते. ते राहिले बाजूलाच. उलट मोदीच खुद्द या धुळवडीत उतरले. ही बाब दुर्लक्ष करण्याजोगी नाही. याचे कारण त्यातून आपल्या नेत्यांचे लक्ष वेधून घ्यावयाचे असेल तर असेच काही आचरट बोलावे लागते असा संदेश जातो आणि मग स्पर्धा अधिकाधिक बेशरमपणाची होत जाते. अनुराग ठाकूर ते स्वत:चा एक मतदारसंघही निर्माण करू न शकलेले प्रकाश जावडेकर व्हाया परवेश वर्मा यांनी या निवडणुकीत तोडलेले तारे हेच दर्शवतात. ‘या निवडणुकीत आपचा विजय झाला तर शाहीनबाग निदर्शक घराघरांत घुसून महिलांवर अत्याचार करतील’, ‘केजरीवाल हे नटवरलाल’, ‘केजरीवाल यांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत आणि त्याचे पुरावे आमच्या हाती आहेत’ ही वा अशी अनेक विधाने भाजपने विवेकास रजा दिल्याचीच द्योतक ठरतात.

अशा या निवडणुकीत ताठ उभे राहणे हे निश्चितच अरिवद केजरीवाल यांच्या राजकीय शहाणपणाचे दर्शन घडवणारे आहे. समोर अमानुष ताकदीचे प्रच्छन्न प्रदर्शन करणारा स्पर्धक असताना शहाणपणाच्या मार्गावर राहणे अवघड असते. केजरीवाल यांनी हे अवघड आव्हान लीलया पेलले. त्यात त्यांचे राजकीय चातुर्य म्हणजे निवडणुकीस धार्मिक वळण देण्याचे भाजपचे सर्व प्रयत्न त्यांनी अनुल्लेखाने मारले. दिल्लीत शाहीनबागेचे रणकुंड धगधगत असताना आणि त्यात आग ओतण्याचे काम भाजप करीत असताना केजरीवाल यांनी स्वत:स त्याची धग लागू दिली नाही. भाजपचा सर्वतोपरी प्रयत्न होता तो निवडणूक हिंदू विरुद्ध मुसलमान अशा दुभंगावर व्हावी यासाठी. केजरीवाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वत:स भाजपच्या सापळ्यापासून सातत्याने वाचवले. अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मुद्दा असो वा नागरिकत्व चाचणीचा. अशा मुद्दय़ांना हाताळण्याचा आपने दाखवून दिलेला मार्ग काँग्रेसनेही अनुकरण करावा असा आहे. केजरीवाल यांचा सातत्याने प्रयत्न होता तो निवडणूक दिल्ली विकासाच्या मुद्दय़ाभोवतीच फिरावी. त्या आघाडीवर केजरीवाल यांचे यश निश्चितच डोळ्यात भरणारे आहे. मोहल्ला क्लिनिक ते सरकारी शाळा या आघाडीवर केजरीवाल सरकारने निश्चितच नावीन्यपूर्ण प्रयोग केले. त्याची पावती सामान्य दिल्लीकराच्या बोलण्यातून येत असते. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक विकास या मुद्दय़ावर लढणे सोयीचे नव्हते. अशा वेळी खरे तर स्वत:स खरा विकासवादी मानणाऱ्या भाजपने विकासाचा पर्यायी कार्यक्रम आणि नेतृत्व उभे करणे आवश्यक होते. त्या आघाडीवरही भाजपचा नन्नाचाच पाढा. त्यात भाजपचा नेतृत्वाचा स्थानिक चेहरा म्हणावा तर मनोज तिवारी, हा. म्हणजे आनंदच. अशा वेळी कोणताही सकारात्मक निवडणूकमुद्दा हाती नसल्याने भाजप अधिकाधिक धर्मवादी होत गेला. त्या पक्षाचे हे गणित पूर्ण चुकले.

त्याचे ‘श्रेय’ काँग्रेस पक्षासही द्यायला हवे. आपच्या या धुव्वाधार विजयाचे रहस्य काँग्रेसच्या धूळधाणीत आहे. आधीच मुळात काँग्रेस हरवलेली आहे. या निवडणुकीत त्यामुळे तो पक्ष अधिक जोमाने उतरता तर आपचीच मते खाता. भाजपची तीच आशा होती. भाजपने शाहीनबाग आदी मुद्दे तापवले ते काँग्रेसला टवटवी यावी याच उद्देशाने. काँग्रेसने या निवडणुकीत सुरुवात तर जोमात केली. पण मधेच या पक्षाने मान टाकली. इतका शहाणपणा राहुल गांधी यांनी दाखवला हे तसे आश्चर्यच. अर्थात हे ठरवून झाले की काँग्रेसच्या अंगभूत निर्नायकतेमुळे घडले याबाबत संभ्रम असू शकतो. पण ज्या पद्धतीने काँग्रेसने मध्यातून निवडणूक सोडून दिली ते आपच्या पथ्यावर पडले. काँग्रेसने ७०पैकी ६३ मतदारसंघांत आपली अनामतही गमावली, हे ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्या पक्षासाठी उल्लेखनीयच म्हणायचे.

हा निवडणूक निकाल हा आगामी निवडणुकोन्मुख राज्यांसाठी आणखी एक धडा आहे. समोर ठसठशीत पर्याय असेल तर भाजपच्या धर्मवादी भूमिकेचा लीलया पराभव करता येऊ शकतो, हा तो धडा. जम्मू-काश्मीरचा अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत प्राधान्याने ‘फौजी’ हरयाणा भाजपच्या बाजूने गेला नाही. महाराष्ट्र, झारखंड आदी राज्येही भाजपच्या हातून गेली. आता घोडामदान आहे ते बिहारचे. दिल्लीतील दारुण पराभवामुळे भाजपस बिहारात नितीशकुमार यांच्यासमोर कान पाडून बसावे लागेल. नंतर आहेत पश्चिम बंगाल, तमिळनाडू आदी विधानसभा निवडणुका. दिल्लीपासून भाजपने काही बोध घेतला नाही तर आगामी निवडणुकांचे निकालही असेच काहीसे लागू शकतात.

स्वधर्मावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी अन्य धर्मीयांचा द्वेष करायची गरज नसते, हा या निवडणुकीचा महत्त्वाचा अर्थ. ‘आप’ला मतदान म्हणजे जणू राष्ट्रद्रोह्य़ांस मतदान अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. दिल्लीतील प्रौढ मतदारांनी तो हाणून पाडला. नागरिकत्व वगरे मुद्दे किती ताणायचे याचाही विचार भाजपला करावा लागेल. गृहमंत्री अमित शहा यांच्या साहसवादी राजकारणामुळे काही भले होते काय याचे परीक्षण भाजपला मनातल्या मनात तरी करावे लागेल. दिल्लीतील ‘आप’धर्माचा विजय आता तरी त्या पक्षास शहाणपण शिकवेल ही आशा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 12:05 am

Web Title: editorial page aam aadmi party delhi vidhan sabha election wining party bp congress entire union cabinet prime minister narendra modi akp 94
Next Stories
1 लहान माझी बाहुली..
2 द्विराष्ट्रवादाचे मढे!
3 पुरुषार्थाचा अर्थ
Just Now!
X