19 April 2019

News Flash

एका वेदनेचा अंत!

जयललिता यांना ना चित्रपट कलाकार व्हायचे होते ना राजकारणी

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता. (संग्रहित छायाचित्र)

मनाविरुद्ध वाटय़ास आलेली लढाईदेखील कशी आपखुशीने लढावी याचे जिवंत उदाहरण जयललितांच्या मृत्यूमुळे संपले..

राजकारणी म्हणून त्या प्रसंगी क्रूर वाटाव्यात इतक्या चाणाक्ष होत्या. त्यांनी कोणालाही स्वत:ला गृहीत धरण्याची मोकळीक दिली नाही आणि सत्ताही सोडली नाही..

विकृत पुरुषी वर्चस्वाच्या दोन विश्वांवर एकाच आयुष्यात स्वामित्व गाजवणे आणि भर विधानसभेत साडी फाडण्यापर्यंत विरोधकांची मजल जात असताना खचून न जाता त्याच पुरुषी अहंकाराचा फणा आपल्या कर्तृत्वाने ठेचणे यांस प्रचंड आत्मिक ताकद लागते. जयललिता जयरामन या स्त्रीकडे ती होती. निधनसमयी त्यांची व्यावहारिक ओळख तामिळनाडूच्या मुख्यमंत्री अशी केली जात असली तरी त्यांच्या परिचयासाठी ही उपाधी अगदीच लहान ठरते. याचे कारण राजकारणी म्हणून त्या अन्य राजकारण्यांपेक्षा फार काही वेगळ्या होत्या, असे नाही. अन्य अनेक राजकारण्यांप्रमाणे त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे मुबलक आरोप झाले, वैध-अवैध मार्गानी गोळा केलेल्या संपत्तीने अनेक प्रश्न निर्माण केले, मैत्रिणीच्या मुलाहाती त्यांनी दिलेल्या अनावश्यक अधिकारांमुळे अनेकदा वादळ उठले आणि त्यांच्या बेभरवशाच्या राजकारणाने अनेकांना अंधारात गाठले. व्यवस्थाशून्यतेच्या अभावी खेळल्या जाणाऱ्या भारतीय राजकारण नावाच्या खेळास या सगळ्याचा शाप आहेच. परंतु जयललिता या सगळ्याच्या वर दशांगुळे उरत गेल्या. त्यांचे हे असे उरणे त्यांना अन्य राजकारण्यांपासून विलग करते. म्हणून त्यांचे जाणे हे केवळ एका मुख्यमंत्र्याचे निधन नाही. ते  मनाविरुद्ध वाटय़ास आलेली लढाईदेखील कशी आपखुशीने लढावी याचे जिवंत उदाहरण ठरते. संकटांवर मात कशी करायची याचे लाखो रुपये देऊन शिक्षण देणाऱ्या व्यवस्थापन महाविद्यालयांनाही अचंबित करेल, असा त्यांचा जीवनसंघर्ष. तो दखलपात्र ठरतो तो यामुळे.

जयललिता यांना ना चित्रपट कलाकार व्हायचे होते ना राजकारणी. परंतु त्यांना स्वत:चा जगण्याचा मार्ग स्वत: ठरवण्याची चैन मिळाली नाही. शालेय अभ्यासात उत्तम प्रगती असलेल्या, इंग्रजीवर सनातनी इंग्रजांसारखीच हुकमत आणि शिक्षणाची आवड या जोरावर आपण आयुष्यात फली नरिमन यांच्याइतके घटनातज्ज्ञ किंवा ते नाही जमले तर निदान राम जेठमलानी यांच्यासारखे उत्तम वकील व्हावे ही त्यांची मनीषा. ही इच्छा त्यांना वडील जयराम यांच्याकडून मिळाली असावी. ते वकील होते. पण जयललिता दोन वर्षांच्या असतानाच त्यांचे निधन झाले. आई वेदवल्ली आयकर खात्यात होती. पण अभिनयाची आवड. त्यातूनच त्यांनी अचानक नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात झोकून देण्याचा निर्णय घेतला. हे क्षेत्र म्हणजे अळवावरचे पाणी. स्थिर राहील याची काही शाश्वती नाही. तसेच वेदवल्ली यांच्याबाबतही घडले आणि परिस्थितीने घेतलेल्या हलाखीच्या वळणामुळे त्यांना आपली कन्या जयललिता हिच्या तोंडाला रंग फासण्याचा आग्रह धरावा लागला. दुसरा काही पर्याय नव्हता. अभ्यासाची आवड आणि गती असलेल्या जयललिता हिला अखेर परिस्थितीपुढे मान तुकवावी लागली. ‘वेन्निरा अडाई’ नावाच्या चित्रपटात वेदवल्ली काम करीत असताना दिग्दर्शक बी आर पंथुलु यांनी तरुण जयललितेस ‘आयिराथिल ओरूवन’ या दुसऱ्या एका चित्रपटासाठी करारबद्ध केले. या चित्रपटाचा नायक हा जयललिता यांच्यापेक्षा तब्बल ३५ वर्षांनी मोठा होता. त्याचे नाव एम जी रामचंद्रन. रामचंद्रन हे त्या वेळी तामिळ सिनेमाचे बादशहा होते आणि त्यांच्यासमवेत पडद्यावर काम करावयास मिळणे हा मोठाच गौरव मानला जात होता. परंतु या कामात जयललिता यांना काडीचाही रस नव्हता. आपल्याला सिनेमात काम करावे लागणार या कल्पनेनेच त्यांनी घर डोक्यावर घेतले. पण काहीही उपयोग झाला नाही. जयललिता यांना तसे करावे लागणे अपरिहार्य होते.

ही अपरिहार्यता एकदा स्पष्ट झाल्यावर मात्र जयललिता यांनी मागे वळून पाहिले नाही. या क्षेत्रात जणू आपण स्वखुशीनेच आलो आहोत असे वाटावे इतके त्यांचे या क्षेत्रातील वावरणे सहज होते. पुढे जयललिता आणि एमजीआर ही जोडी विशेष नावाजली गेली. या दोघांनी एकत्र २८ सिनेमे केले. यासाठी पहिली पावले टाकणारे अर्थातच एमजीआर होते. तरुण जयललितेची मिनतवारी करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. आपल्या प्रत्येक चित्रपटात जयललिता हव्यातच असा त्यांचा आग्रह असे आणि ते तो मोडणाऱ्याच्या नाकीनऊ आणत. हे अर्थातच ते जयललिता यांच्या प्रेमात पडल्याचे निदर्शक होते. उपलब्ध माहितीवरून दिसते ते असे की हे प्रेम काही काळ तरी एकतर्फी असावे. तरुण जयललितेने एमजीआर यांच्यासाठी वेगळे काही केल्याचे दाखले फारसे नाहीत. उलट राजस्थानच्या वाळवंटात भर उन्हात जयललिता यांना अनवाणी चालावे लागते हे पाहिल्यावर एमजीआर यांनी आपले सगळे मोठेपण बाजूला ठेवून जयललिता यांना शब्दश: मोटारीत उचलून ठेवल्याचा प्रसंग जयललिता यांच्या चरित्रात नमूद केलेला आहे. पुढे चित्रपटासाठी वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत जयललिता एकदा आपल्याच घरात चक्कर येऊन पडल्या असता त्यांच्या स्वीय सहायकाने घरातल्या दोन आत्यांकडे दुर्लक्ष करून ही बाब एमजीआर यांच्या कानावर घातली. त्यानंतर ते स्वत: आले आणि जयललिता यांना रुग्णालयात घेऊन गेले. त्या वेळी जयललिता यांच्या दोन आत्या भांडत होत्या जयललिता रुग्णालयात असताना घराची आणि तिजोरीची चावी कोणाकडे असावी, यावरून. त्या दोघींच्या देखत एमजीआर यांनी ती चावी काढून घेतली आणि शुद्धीवर आल्यावर जयललिता यांच्या हाती दिली. हा प्रसंग घडला तेव्हा जयललिता यांच्या आईचे निधन झाले होते आणि प्रसिद्धी शिखरावर चढणाऱ्या या नायिकेवरील स्वामित्व हक्कांवरून त्यांच्या नातेवाईकांत वाद सुरू होते. ते पाहून जयललिता यांनी सगळ्यांशीच संबंध तोडले. तेव्हापासून आलेले त्यांचे एकटेपण त्यांच्यासमवेत मृत्यूपर्यंत होते. त्या काळात त्यांना आधार होता तो फक्त एमजीआर यांचाच.

पण नंतर जयललिता यांना तोही नकोसा वाटू लागला. कारण एमजीआर त्यांच्यावर मालकी गाजवू लागले. जयललिता उत्तम शास्त्रीय नृत्यांगना होत्या. त्याच्या कार्यक्रमासाठी त्यांना जगातून निमंत्रणे येत. ती स्वीकारल्यावरून त्यांचा आणि एमजीआर यांचा एकदा वाद झाला. या दौऱ्यात जयललिता यांनी आपल्यासमवेत असावे, असा एमजीआर यांचा आग्रह होता. त्या वेळी जयललिता इतक्या संतापल्या की त्यांनी हा दौराच रद्द केला आणि आगाऊ घेतलेले पैसेही परत केले. परंतु एमजीआर यांचे त्यांनी ऐकले नाही. या काळात एमजीआर हे द्रमुकचे खजिनदारही होते आणि पक्षाचे संस्थापक अण्णादुराई यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे करुणानिधी यांच्या हाती यावीत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्यात ते यशस्वी झाले. एमजीआर यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की पक्ष त्यांच्या विरोधात जाऊ शकला नाही. परंतु एमजीआर यांची हीच लोकप्रियता आपल्याला अडचण ठरेल हे करुणानिधी यांनी वेळीच ताडले आणि सत्ता मिळाल्यावर एमजीआर यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवले. तथापि आपल्या चिरंजीवास उत्तराधिकारी म्हणून पुढे करण्याच्या करुणानिधी यांच्या प्रयत्नांमुळे या दोघांत वितुष्ट येऊ लागले आणि त्याची परिणती एमजीआर यांनी द्रमुकमधून फुटून अण्णाद्रमुक काढण्यात झाली. या काळात जयललिता या एमजीआर यांच्यापासून दूर गेल्या होत्या. १९७७ साली अण्णाद्रमुकला सत्ता मिळाली असता जयललिता यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यांस त्यांनी अखेर होकार दिला. त्या पक्षाच्या सदस्य बनल्या. त्या वेळी केलेल्या त्यांच्या पहिल्या राजकीय भाषणाचा विषय होता पेन्निन पेरुमई. म्हणजे महिलेचे महानपण. पुढे १९८४ साली त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या. अशा तऱ्हेने चित्रपटाप्रमाणेच त्या राजकारणातही ढकलल्या गेल्या आणि एकदा आल्यावर चित्रपटसृष्टीत जशा त्या जातिवंत अभिनेत्याप्रमाणे वागल्या तितक्याच सहजतेने त्यांनी राजकारणासही आहे तसे स्वीकारले.

पुढचा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. एमजीआर पक्षाघाताने लुळेपुळे झाल्यावर आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मुख्यमंत्रिपद आपणास मिळावे असा जयललिता यांचा प्रयत्न होता. परंतु त्या वेळी एमजीआर यांच्या धर्मपत्नी जानकी यांनी उचल खाल्ली आणि सभापती पंडियन यांच्या साह्य़ाने स्वत:वरचा विश्वासदर्शक ठराव त्यांनी मंजूर करवून घेतला. परंतु पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे सरकारच बरखास्त केले. नंतरच्या निवडणुकांत जयललिता विरोधी पक्षनेत्या बनल्या. तामिळनाडूत एका महिलेकडे हे पद पहिल्यांदाच आले. परंतु त्या वेळच्या एका ऐतिहासिक प्रसंगात भर विधानसभेत मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यादेखत त्यांच्या पक्ष सदस्यांनी जयललिता यांच्यावर हल्ला केला. त्यांची साडी फाडली. त्या वेळी तशा फाटक्या साडीनिशी माध्यमांच्या देखत सभागृहातून बाहेर पडताना जयललिता यांनी गर्जना केली, आता सभागृहात येईन ती मुख्यमंत्री बनूनच.

पुढच्या आयुष्यात एकदाच नव्हे तर चार वेळा त्यांनी ही प्रतिज्ञा खरी करून दाखवली. राजकारणी म्हणून त्या प्रसंगी क्रूर वाटाव्यात इतक्या चाणाक्ष होत्या. त्यांनी कोणालाही स्वत:ला गृहीत धरण्याची मोकळीक दिली नाही. अगदी पंतप्रधानपदी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांच्यामुळे सत्ता सोडावी लागली. आयुष्यात सतत कटू प्रसंगास सामोरे जावे लागलेल्या व्यक्तीच्या स्वभावात एक प्रकारे कडवटपणा येतो. जयललिता यांच्या मनात तसा तो होता. पुरुषांविषयी त्यांना एक प्रकारे अढी होती. त्याचमुळे आपल्यापुढे लवलवून वाकणारे, मुजरा करणारे पुरुष त्यांना मनोमन सुखावत असावेत. या वागण्यातूनच त्यांनी जाणूनबुजून स्वत:चे दैवतीकरण होऊ दिले. त्यांना आतून जाणीव होती की सत्ता आहे तोपर्यंत समोरचे आहेत. सत्ता काय करू शकते आणि सत्तेचे काय करता येते हे त्यांनी अनुभवले होते आणि अम्मा मालिकेतील उत्पादनांवरून त्यांनी ते तामिळ जनतेसही दाखवून दिले होते. म्हणून त्यांनी सत्ता कधीही सोडली नाही आणि महत्त्वाचा योगायोग हा की या सत्तेनेही कधी त्यांना अंतर दिले नाही. त्यांना मरण आले ते सत्तेवर असतानाच. त्यांच्या अंत्यविधीस देशभरातील समग्र सत्ता एकवटली हेदेखील त्यांना साजेसेच झाले. जगताना त्यांनी भोगलेल्या वेदनांचा अशा तऱ्हेने सत्तासाक्षीनेच अंत झाला.

First Published on December 7, 2016 3:54 am

Web Title: jayalalithaa died at 11 30 pm