03 June 2020

News Flash

नोबेलमागची गरिबी

आता सरकारने अभिजित बॅनर्जी यांच्या संशोधनाचीही मदत घ्यायला हवी..

आता सरकारने अभिजित बॅनर्जी यांच्या संशोधनाचीही मदत घ्यायला हवी..

विद्यार्थी आंदोलनात तिहार तुरुंगवास सहन करावा लागलेल्यास नोबेल मिळू शकते हे सप्रमाण सिद्ध केल्याबद्दल देशातील तमाम विद्यार्थीगण अभिजित बॅनर्जी यांचे आभार मानतील. तथापि ते का, याची चर्चा करण्याआधी त्यांचे नोबेल का आणि कशासाठी हे समजून घ्यावे लागेल.

अर्धपोटी गरिबांच्या हाती चार पैसे अधिक टेकवले तर ते काय करतील या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर ‘पोटभर जेवतील’ असे असेल. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. रोजच्या पोटभर अन्नास मोताद असलेले हाती पैसे आल्यावर ते छानछोकी किंवा मनोरंजनावर खर्च का करतात? रस्त्यावर वर्षांनुवर्षे वडापाव विकणाऱ्याच्या आयुष्यात बदल का होत नाही? किंवा सरपंचपदी महिला निवडली की गावच्या प्राधान्यक्रमात काय बदल होतो? अशा वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन गरिबीनिर्मूलनासाठी काय करावे लागेल याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न अभिजित बॅनर्जी, ईस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांनी केला. या पथदर्शक अभ्यासासाठी या तिघांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. याबद्दल या तिघांचे अभिनंदन. या अभिनंदनास एका वेदनेची किनार आहे. यातील दोघांचे.. बॅनर्जी आणि डफ्लो.. संशोधन हे प्रामुख्याने भारतातील आहे आणि क्रेमर यांचे अफ्रिकेतील. वैद्यकीच्या शिक्षणावस्थेत आपल्याकडील सरकारी रुग्णालयात काम करणे शिकाऊ डॉक्टरांना आवडते. कारण इतके एकगठ्ठा विविध व्याधिग्रस्त रुग्ण अन्यत्र सापडणे अवघड. आपल्याकडील या ओसंडून जाणाऱ्या रुग्णालयांत शिकून अनेक वैद्यकांनी देशापरदेशात नाव काढले. पण आपले आजारपण काही संपले नाही. तद्वत आपल्या गरिबीच्या अभ्यासावर अनेक ज्ञानश्रीमंत झाले. पण आपली गरिबी आहे तशीच. एखाद्या गरीब कुटुंबाच्या अवस्थेत वर्षांनुवर्षे का बदल होत नाही आणि अशा कुटुंबीयांचा समुच्चय असलेल्या देशांची परिस्थितीही बराच काळ का तशीच राहते या आणि अशा प्रश्नांचे उत्तर हे नोबेल विजेते संशोधनात मिळते. म्हणून यांच्या पारितोषिकाचे कवतिक अधिक.

कारण तो अभ्यास प्रत्यक्ष अनुभवाधारित निष्कर्ष काढतो. संपत्तीनिर्मितीच्या दोन मार्गाचीच चर्चा नेहमी होते. वरून खाली आणि खालून वर हे ते दोन मार्ग. समाजातील सुखवस्तूंना अधिक पसा मिळेल अशी व्यवस्था करायची म्हणजे त्यांच्याकडून समाजातील त्या खालच्या स्तरावर तो झिरपतो असे मानले जाते. दुसरा मार्ग तळाच्या स्तरावरून संपत्तीनिर्मिती करत वर जायचे. पण आर्थिकदृष्टय़ा तळाच्या स्तरावरील व्यक्ती कोणत्या प्रसंगी कशा वागतात हे कळल्याखेरीज त्यांचा संपत्तीनिर्मितीतील सहभाग वाढवत नेणे हे आव्हान असते. गरिबांना खाद्यान्न द्यावे की रोख रक्कम याचे निश्चित उत्तर त्यामुळे मिळत नाही. परिणामी गरिबीनिर्मूलनाच्या प्रयत्नांचे तोकडेपण तेवढे दिसत राहते. या तिघांचा अभ्यास या प्रयत्नांच्या परिपूर्तीचा मार्ग दाखवतो.

कारण या तिघांनी तो प्रत्यक्ष गरिबांच्या सहवासात राहून केलेला आहे. त्यासाठी भारतातील अनेक प्रांत, अफ्रिकेतील काही देश या तिघांनी शब्दश: पिंजून काढले. या परिसरांस त्यांनी केवळ वरवरची भेट दिली नाही. तर ते या आपल्या अभ्यासविषयांच्या सहवासात दीर्घकाळ राहिले. आपली निरीक्षणे नोंदवली. ती एकमेकांशी ताडून पाहिली आणि मग त्यास त्यांनी सद्धांतिक स्वरूप दिले. त्यामुळे हा त्यांचा प्रबंध हा केवळ प्रयोगशालेय राहत नाही. त्यास वास्तवाचा आधार आहे. यात आवर्जून कौतुक करण्यासारखी बाब म्हणजे अशा अभ्यासासाठी परदेशी विद्यापीठांत या अशा अभ्यासकांना मिळणारी उसंत. इतका काळ संशोधन, निरीक्षणासाठी व्यतीत करण्याची मुभा आपली विद्यापीठे देऊ शकत नाहीत आणि दिली तरी तिचा सदुपयोग करण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांतच आपण तयार केलेली नाही.

त्यामुळे या अशांना देशत्यागावाचून पर्याय राहत नाही. परदेशात गेल्यावर आपल्या गुणांच्या जोरावर हे नाव काढतात आणि मग हे पाहा ‘भारतीय, भारतीय’ म्हणत आपण त्यांचे यश साजरे करतो. वेंकटरमण ‘वेन्की’ रामकृष्णन हे असे अलीकडचे आणखी एक उदाहरण. काही वर्षांपूर्वी त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर झाल्यावर येथील अनेकांनी त्यांचा ‘भारतीय, भारतीय’ म्हणून उदोउदो सुरू केला. त्यावर वेंकट यांनी भारतात आले असता येथील व्यवस्थेसंदर्भात व्यक्त केलेले मत जहाल होते. ते अनेकांना रुचले नाही. तीच गत अभिजीत बॅनर्जी यांचीही. ते सध्या ‘राष्ट्रद्रोहा’साठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे, म्हणजे जेएनयूचे विद्यार्थी. तशा आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यादेखील याच विद्यापीठाच्या. ते असो. हे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या चळवळीसाठी ओळखले जाते. सत्ता कोणत्याही पक्षाची असो. सत्ताधीशांना या चळवळी नेहमीच खुपतात. १९८३ सालीही हेच झाले आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने बॅनर्जी आणि मंडळींना तुरुंगात डांबले. त्यांना पोलिसांनी आपला खास प्रसादही दिला. पुढे २०१६ साली अशाच चळवळी करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याच्या पाश्र्वभूमीवर त्या वेळेस बॅनर्जी यांनी इंग्रजी दैनिकात आपली ही आठवण लिहिली आणि हे वास्तव उघड झाले.

पुढे अमेरिकेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आता नोबेल मिळाल्यानंतर तो किती रास्त होता, हे दिसून आले. अन्यथा ते येथेच राहते तर त्यांची गणना ‘अर्बन नक्सल’ अशी होण्याचा धोका होता. अभिजित अमेरिकेत गेल्यावर तो टळला. तेथे मॅसेच्युसेट्स विद्यापीठात त्यांनी आपले गरीब अभ्यास केंद्र सुरू केले आणि जगभरातील गरिबीवर काहीएक निश्चित दिशा मिळू लागली. ही बाब आपण दखल घ्यावी अशी. कारण आपल्याकडे गरीब नक्की कोणास म्हणायचे हे ठरवण्यातच अनेक वर्षे घोळ घातला गेला. अखेर सुरेश तेंडुलकर यांची व्याख्या सर्वमान्य झाली. ‘आधार’च्या माध्यमातून गरिबांना थेट त्यांच्या खात्यावर अनुदान देण्यात या व्याख्येचा आधार घेतला गेला. त्याचप्रमाणे आता सरकारने बॅनर्जी यांच्या संशोधनाचीही मदत घ्यायला हवी. याचे कारण गरीब हा असा काही एक एकसंध घटक नसतो. सर्वसाधारण सामान्यांच्या मनात त्याविषयी असलेल्या कल्पना आणि त्या गरिबाचे वास्तव हे भिन्न असते. गरिबांनी कसे वागावे याचे मार्गदर्शन (?) अन्यांकडून केले जात असले तरी गरीब प्रत्यक्षात तसे वागत नाहीत. ते का, हे बॅनर्जी आणि मंडळी सांगतात. अर्धपोटी राहावयाची वेळ आलेली व्यक्ती पैसे हाती आल्यावर चार घास अन्न खरेदी करण्याऐवजी मनोरंजनावर खर्च करणे पसंत करते. याचे कारण माणसाला जगण्यासाठी अन्नाइतकीच एखाद्या आनंदाची गरज असते, हे निरीक्षण गरिबीनिर्मूलनाच्या मार्गात महत्त्वाचे ठरते. तसेच सरपंचपदी महिला असेल तर ती स्वच्छ पाणीपुरवठय़ासाठी प्रयत्न करते, हे त्यांच्या पाहणीतील निरीक्षण काहीएक दिशा देते.

ती आपण देश म्हणून पाहणार का, हा प्रश्न आहे. तो पडतो याचे कारण आताच या बॅनर्जी यांच्या बदनामीची सुरू झालेली मोहीम. बुद्धी आणि विचारक्षमता यांचा जन्मजात अभाव असल्याखेरीज बॅनर्जी यांना अपश्रेय देण्याच्या या उद्योगात सहभागी होता येणे अशक्य. अशांची प्रचंड रिकामटेकडी फौज आपल्याकडे सज्ज असल्याने हे अर्धवटराव जल्पक आता बॅनर्जी यांच्या मागे हात धुऊन लागतील. त्यातून खरे तर आपलेच लहानपण दिसेल. गरिबीच्या अभ्यासासाठी मिळालेल्या या नोबेलचे स्वागत आपण मुक्तपणाने करायला हवे. ते न करून आपण आपली गरिबी सिद्ध करण्याचे कारण नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2019 12:50 am

Web Title: loksatta editorial abhijit banerjee wins nobel prize for economics 2019 zws 70
Next Stories
1 एक सौरव बाकी रौरव
2 चर्चाचऱ्हाटाचा ‘अर्थ’
3 गमते मानस उदास..
Just Now!
X