कलेतील भावोत्कटतेबरोबरच बुद्धिवैभवासही स्पर्श करण्याची क्षमता असलेला कलावंत प्रयोगांस अव्हेरत नाही. किशोरीताई अशा होत्या.

आपल्या मुठीतील चांदण्यांची जाणीव अनेकांना नसते आणि त्यामुळे असे कलावंत हे अलौकिकाचे देणे वाया घालवतात. किशोरीताई यास मूर्तिमंत अपवाद. त्यांना आपल्यातील अपूर्व, अद्भुत सांगीतिक कलेचे कायम भान होते. त्यामुळे त्यांनी आपले गाणे उगाच नापीक जमिनीवर सांडले नाही. त्यांची प्रत्येक बैठक ही रसरशीत, पाणीदार मोत्यांचा सर व्हायची ती यामुळे.

What is Israel Iron Dome a defense system that prevents Iranian attacks
इराणी हल्ल्यांना रोखून धरले इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ने… काय आहे ही बचाव यंत्रणा?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!
career in singin
चौकट मोडताना : ‘छंद म्हणून हवा तेवढा जोपासा’

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अंगण जेव्हा एकापेक्षा एक स्वप्रकाशित झुंबरे उजळवून टाकत होते, तेव्हाचा हा काळ. सूरश्री केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, अंजनीबाई मालपेकर, हिराबाई बडोदेकर, खाप्रुमाम पर्वतकर, अल्लादिया खाँसाहेब असे एकापेक्षा एक मातबर आपल्या गायन/वादन कलेने स्वरांचे छत निर्माण करीत होते तो हा काळ. ही मंडळी पूर्णवेळ गाणे करीत होती आणि ते करून उरलेल्या वेळेतही गाणे हाच त्यांचा ध्यास होता. महाराष्ट्रातील मिरजेच्या परिसरात, कर्नाटकातील हुबळी-धारवाड इलाख्यात आणि तिकडे संपूर्ण गोव्यात सूरतालाचा दंश होऊन अंगभरात गाणे भिनलेली पिढीच्या पिढी वाढत होती. या दंशाचा अंश ज्यांच्यात पुढे पुरेपूर उतरला, दुपटीने बहरला आणि ज्यांचे जगणे म्हणजेच स्वरोत्सव झाले अशा अवलियांची पिढी त्यातून निपजली. मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव आणि किशोरी आमोणकर ही त्या आद्य संगीताचार्याच्या तपास लागलेली फळे. चौघांचीही सांगीतिक जातकुळी भिन्न. शैली भिन्न. पण ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेण्याची क्षमता मात्र तीच. यातील मन्सूर अण्णा, भीमसेनजी, कुमारजी, वसंतराव हे काळाच्या पडद्याआड जात राहिले. उरल्या होत्या एकटय़ा किशोरीताई. आता त्याही गेल्या. हे असे घरघर लावणारे काय होते त्यांच्या गाण्यात?

किशोरीताईंना आई मोगुबाईंचीच तालीम मिळाली, त्या किती आणि कोणाकडे शिकल्या, त्यांचे सांगीतिक प्रयोग आदी तपशील आता स्वरप्रेमींना मुखोद्गतच आहे. ताना, पलटे, वादी, संवादी आदी व्याकरणाच्या चौकटी सर्वच गायकांकडून पाळल्या जातात. ते गाण्यातील किमान. सुंदर असणे हे जसे फुलाचे किमान. तसेच हे. परंतु एखादे फूल केवळ सुवासासाठी लक्षात राहते असे नाही. त्या फुलात त्या सुवासापेक्षाही अधिक काही असते. हे असे अधिक काही असणे हे किशोरीताईंच्या गाण्याचे मोठेपण. जगताना काही भाग्यवंतांहाती श्रेयस आणि प्रेयस दोन्हीही गवसते. तरीही अशा वेळी या सगळ्याच्या पलीकडे काही आहे, त्याची आस अशा परिपूर्ण जीवनाला व्याकूळ करीत असते. बेगम अख्म्तर यांच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे सितारोंके आगे जहाँ और भी है.. अशी ही अवस्था. हे जे काही हाती गवसलेल्या यशाचे आकाश आहे त्याच्या पलीकडच्या आकाशगंगेचा ध्यास घेणे हे मानवी मनाच्या उत्क्रांत होऊ शकणाऱ्या अवस्थेचे लक्षण. एरवी ठेविले आनंदे वृत्तीने जगणारा महाजनांचा जथा आसपास असतोच. हेच संगीत कलावंतांचेही. केवळ गुरूने पढवलेल्या, तानामात्रांच्या वेलबुट्टीने सजवलेल्या महिरपीत जमेल तितकी आपली मांडणी करणे यालाही गाणेच म्हणतात. परंतु हे सर्व करता करता डोळ्यांना दिसणाऱ्या, बुद्धीला जाणवणाऱ्या सिताऱ्यांच्या पलीकडच्या जगाचा ठाव घेणे हे थोर कलावंताचे लक्षण. ही सारी लक्षणे किशोरीताईंच्या ठायी ठासून भरलेली होती. आणि महत्त्वाची बाब ही की हे त्यांना माहीत होते. एरवी आपल्या मुठीतील चांदण्यांची जाणीव अनेकांना नसते आणि त्यामुळे असे कलावंत हे अलौकिकाचे देणे वाया घालवतात. किशोरीताई यास मूर्तिमंत अपवाद. त्यांना आपल्यातील अपूर्व, अद्भुत सांगीतिक कलेचे कायम भान होते. त्यामुळे त्यांनी आपले गाणे असे उगाच नापीक जमिनीवर सांडले नाही. त्यांची प्रत्येक बैठक ही रसरशीत, पाणीदार मोत्यांचा सर व्हायची ती यामुळे. बैठकीस समोर असणाऱ्यांतील एक मोठा वर्ग हा नेहमीच मिरवणाऱ्यांचा असतो. आपण अमुकतमुकच्या गाण्याला हजेरी लावली एवढाच आनंद त्यास पुरतो. परंतु याच्या पलीकडे एक वर्ग असा असतो की जो संगीतातील दिखाऊपणाच्या पलीकडे जाऊन अद्भुताच्या शोधात असतो. अशांना लौकिक, व्यावहारिक सुखापलीकडच्या आनंदाच्या स्पर्शाची भूक असते. किशोरीताईंचे गाणे म्हणजे अशा वर्गास आपली तहान भागवणारा हक्काचा झरा वाटे आणि असा आगळा वर्ग आपल्याकडे का येतो याची किशोरीताईंनाही जाणीव होती. त्यामुळे या वर्गाने कधी किशोरीताईंच्या मनस्वीपणाची, त्यांच्या बालसुलभ रागलोभांची किंवा हट्टांची पर्वा केली नाही. कारण यांना हे माहीत होते एकदा का बाईंचा षड्ज लागला की गुरुत्वाकर्षणाचे बंध तोडून अद्भुततेच्या जगात तो आपणास आपसूक घेऊन जाणार आहे.

अशी परिपूर्णतेची, जे कधीही हाती लागत नाही त्याचा शोध घेण्याची आस असलेला कलावंत स्वत: नवनव्या वाटा चोखाळतो. किशोरीताईंनी आयुष्यभर हे मार्ग शोधले. वास्तविक घरातून कराल म्हणता येतील अशा मोगुबाईंची तालीम मिळालेली. जे काही करावयाचे ते परंपरांच्या वाटेने जातच मिळवायचे. जे काही इमले बांधावयाचे ते घराण्याच्या नियमचौकटीतच, अशी त्यांची शिस्त. किशोरीताईंनी ती मोडली असे नाही. तिचे पालन त्यांनी केलेच. परंतु ते पालन करता करता त्यांनी स्वत:ला इतके उंच केले की त्यामुळे त्या अन्य घराण्यांतून असेच वाढलेल्यांशी सहज संवाद साधू शकल्या. भारतीय संगीत कलेत या घराण्यांच्या नियम चौकटींचा बाऊ मोठय़ा प्रमाणावर अनेकांनी केला. पण ती एका अर्थी लबाडी होती. आपण मोठे होऊ शकलो नाहीच तर कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडता यावे यासाठीची ती सोय होती. परंतु याच नियमांच्या चौकटीतून आपल्याकडे असे काही कलाकार तयार झाले की कोणतेही सोवळेओवळे न मोडता त्यांनी घराण्यांच्या सीमारेषा अलगद पुसून टाकल्या. किशोरीताई या अशा महानांतील एक. त्याचे आणखी एक मोठेपण म्हणजे आपण काय करीत आहोत हे मांडण्याचे बौद्धिक सामथ्र्य त्यांच्याकडे होते. बऱ्याचदा अनुभव असा की कलाकारांस आपल्याच कलाविष्काराची उकल करून कलाकृतीमागील सौंदर्य समजावून सांगता येतेच असे नाही. किशोरीताई यास अपवाद. आपल्या कलाविष्कारामागील वैचारिक मांडणीची उत्तम जाण त्यांना होती आणि त्याचबरोबर ती तितक्याच कलात्मक शब्दकळेत समजावून सांगण्याचे कौशल्यही त्यांच्या ठायी होते. त्यामुळे किशोरीताईंचे गाणे जसे आणि जितके उत्कट होत असे तसे आणि तितकेच त्यांचे गाण्यावरील भाष्यही कलानंद देणारे होत असे. हे तसे दुर्मीळ.

कलेतील भावोत्कटतेबरोबरच बुद्धिवैभवासही स्पर्श करण्याची क्षमता असलेला कलावंत प्रयोगांस अव्हेरत नाही. किशोरीताई अशा होत्या. मग ते हिंदी चित्रपट संगीत असो वा भावगीत वा मीरेची भजने वा अनवट राग. किशोरीताई या कलाप्रकारांतील प्रयोगांना कधीही नाही म्हणाल्या नाहीत. अवघा रंग एक झाला.. हे भजन असो वा एखादी बैठक. किशोरीताई तितक्याच समरसतेने आपले म्हणणे मांडत. म्हणून त्यांच्या प्रत्येक कलाविष्कारात प्रेक्षक/ श्रोत्यांची अवस्था रंगी रंगलेल्या श्रीरंगासारखीच होत असे. शास्त्रीय संगीत गायकांप्रमाणे ते ऐकण्यास सरावलेल्यांचेही काही राग तयार झालेले असतात. ते गायकाच्या गळ्यात जसे बसलेले असतात तसे श्रोत्यांच्या कानातही ठाण मांडून असतात. त्यामुळे गायकास आपल्या गात्या गळ्याची घडी मोडणे जसे आणि जितके अवघड जाते तसेच श्रोत्यांना आपल्या ऐकण्याची सवय मोडणे कष्टप्रद असते. किशोरीताई सातत्याने ही सवय मोडायच्या. हे अवघड असते. याचे कारण प्रत्येक कलाकारास आपली टाळीची जागा माहीत असते. वेगळे काही गायचे तर त्या टाळीच्या जागेचा मोह टाळावा लागतो. किशोरीताईंनी तो सातत्याने टाळला. खंबावती वा हुसेनी तोडी आदी याचे अनेक दाखले देता येतील. असे करावयाचे तर स्वत:वर विलक्षण विश्वास असावा लागतो आणि त्या बौद्धिक विश्वासाच्या जोडीला भावनिक ओलावा असावा लागतो. हे दोन्हीही असलेले कलावंत अजरामर होतात.

किशोरीताई मोठय़ा ठरतात त्या या सगळ्या गुणांमुळे. ढुढ्ढाचार्य न झालेला शास्त्रीय गायक लोकसंगीताची आपली नाळ कधी नाकारत नाही. मोजूनमापून मशागत केलेल्या बागेत उमललेले फूल सुंदरच. परंतु म्हणून थेट आकाशाच्या निगराणीखाली मुक्त वाढलेल्या फुलाच्या सौंदर्यास काही बाधा येते असे नाही. कला क्षेत्रातील या दोन्ही प्रकारच्या फुलांना एकमेकांच्या सौंदर्याची महती माहीत असते. कारण कोणत्याही जातिवंत कलाकाराच्या मनात ऊर्मी असते ती कलेच्या कंदास स्पर्श करण्याची. असा कलावंत आयुष्यभर या कलेच्या आत्म्याचा शोध घेत असतो. किशोरीताईंच्याच शब्दांत सांगावयाचे तर असा कलावंत जाईन विचारित रानफुला.. असेच म्हणत असतो आणि या प्रवासाच्या अंती अंतिम आनंदाचा भेटेल तिथे ग सजण मला.. अशी त्यास खात्री असते. लाखो श्रोत्यांना असा अमर्त्य आनंद देणाऱ्या किशोरीताई या अंतिम प्रवासाला आता निघाल्या आहेत आणि आपली मात्र अवस्था जाईल बुडून हा प्राण खुळा अशी होणार आहे.

पारलौकिकाचा स्पर्श झालेल्या आणि तो आपल्याला घडवणाऱ्या या अलौकिक गानविदुषीला लोकसत्ता परिवाराची आदरांजली.c