12 July 2020

News Flash

नक्की कोणते सावरकर?

सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, या मागणीने आजचे नवहिंदुत्ववादी सुखावतीलही

सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, या मागणीने आजचे नवहिंदुत्ववादी सुखावतीलही; पण हे सुख अज्ञानातील आहे..

खरे  तर  निवडणुकांच्या हंगामात भारतरत्न मुद्दा आणणे योग्य नव्हे. केवळ राजकीय हेतूंसाठी एमजी रामचंद्रन यांच्यासारख्या तद्दन फिल्मी गृहस्थास भारतरत्न देऊन राजीव गांधी यांनी त्या पुरस्काराची इभ्रत कधीच मातीत मिळवली. याच काँग्रेसने मराठी मतांकडे आशाळभूतपणे पाहात निवडणुकीच्या तोंडावर सचिन तेंडुलकर यास भारतरत्न जाहीर केले. या सर्वापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा फुले हे कर्तृत्व आणि समाजोपयोग या दोहोंत कितीतरी श्रेष्ठ. त्यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा हा निवडणुकीच्या तोंडावर काढण्याची काही गरज नव्हती. त्यामुळे याबाबतच्या उद्देशास राजकीय हेतू चिकटतो. हे भान केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने दाखविले नाही. अलीकडे हिंदुत्वाच्या नावाने आणाभाका घेणाऱ्या कोणीही उठावे आणि सावरकरांवर मालकी सांगावी असे सुरू असताना भारतरत्नसाठी नक्की कोणते सावरकर अभिप्रेत आहेत, हे आता विचारायला हवे.

‘‘हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक रेणू कुमुहूर्तावर जरी एकत्र आले तरी पाणी तयार होते. मुहूर्त वगैरे पाहणे म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा,’’ असे मानणारे सावरकर या मंडळींना पचतील काय? बहुधा नसावेत. कारण विज्ञानातील उच्च संकल्पनांवर आधारित विमानाचे स्वागत करताना मीठमिरची, लिंबू आदी ओवाळण्याची गरज ज्यांना वाटते त्यांचा आणि सावरकरांचा संबंध काय? ‘‘सध्याचे युग हे यंत्रांचे आहे आणि त्या आघाडीवर भारत हा युरोपपेक्षा तब्बल २०० वर्षे मागे आहे,’’ असे मानणारे आणि तसे ठामपणे लिहिणारे सावरकर पुराणातल्या वानग्यांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना माहीत आहेत काय? नवसपूर्तीसाठी पोटावर सरपटत जाणाऱ्याची सावरकरांनी केलेली संभावना आजच्या धर्ममरतडाना झेपेल काय? नाशिक येथील कोणा लहरीमहाराज या इसमाने रामनाम लिहिलेल्या ११ लक्ष चिठ्ठय़ा सुगंधी पिठाच्या गोळ्यांत घालून गंगार्पण करण्याचे व्रत अंगीकारले. ते पूर्णत्वासाठी जाईपर्यंत मौन धारण करण्याची घोषणा केली. हे सर्व कशासाठी? तर मानवजातीच्या भल्यासाठी, असे त्याचे उत्तर होते. त्याचा समाचार घेताना सावरकर त्यांच्या ‘क्ष किरणे’ यांत लिहितात : ‘‘या लहरीमहाराजाच्या व्रताने मानवजातीचा कोणताही लाभ होणार नसून झालाच तर तो पाण्यातील मासे आणि बेडकांचा होईल.’’ अशा वेळी आज कोणत्याही सोम्यागोम्या बाबाबापू वा तत्समांसमोर माथे टेकणाऱ्या, त्यांना शपथविधीच्या वेळी व्यासपीठावरच बसविणाऱ्या आपल्या राज्यकर्त्यांस हे सावरकर आदरणीय वाटतात काय?

‘‘वृषपूजा ही लिंगपूजेचीच एक आनुषंगिक पद्धती आहे,’’ हे सावरकरांचे मत. हे पुराणकाळात ठीक होते. पण ज्ञानविज्ञानाचे शोध जसजसे लागत गेले तसतसे यात बदल होणे गरजेचे होते, असे सावरकर नमूद करतात. कारण ‘‘मनुष्याने देव म्हणून ज्याची पूजा करावयाची ते तत्त्व, प्रतीक हे गुणांत मानवाहून श्रेष्ठ हवे. मनुष्याचा देव हा मनुष्याहूनही हीन असेल तर त्या देवानेच भक्ताची पूजा करणे उचित ठरेल,’’ असे सावरकर गाईस माता म्हणणाऱ्यांना बजावतात. इतकेच नाही तर पशुपूजेस सावरकर ‘हिणकस वेड’ ठरवतात. ‘‘ब्रह्मसृष्टीत गाय आणि गाढव समानच आहेत,’’ असे सावरकर मानतात. आणि गाईचे ‘मूत नि गोमय ओंजळ ओंजळ पितात वा शिंपडतात’ पण ‘‘डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या एखाद्या शुद्ध नि त्यांच्याहूनही सुप्रज्ञ पूर्वास्पृश्याच्या हातचे स्वच्छ गंगोदकही विटाळ मानतात,’’ अशा हिंदूंची सावरकर यथेच्छ निर्भर्त्सना करतात. ‘‘गाईत देव आहेत असे पोथ्या सांगतात आणि वराहावतारी देव डुक्कर झाले होते असेही पोथ्या सांगतात. मग गोरक्षणच का करावे? ’’ या सावरकरांच्या प्रश्नास भिडण्याची वैचारिक क्षमता आपणांत आहे काय, या प्रश्नाचे उत्तर भारतरत्नाआधी मिळायला हवे.

सावरकर म्हणजे हिंदुत्ववाद इतकेच नाही. त्यांना अनेक विषयांत रुची होती आणि त्यासंबंधाने त्यांनी विस्तृत मतप्रदर्शन करून ठेवले आहे. असे अनेक मुद्दे सांगता येतील. पण याबाबत अत्यंत अप्रचलित विषय म्हणजे चित्रपट. ‘‘चित्रपट ही २०व्या शतकाने मानवाला दिलेली सर्वात सुंदर भेट आहे,’’ असे ते मानत. पण त्याचबरोबर या माध्यमाच्या अभिव्यक्तीवर येणारे निर्बंध सावरकरांना अमान्य होते, हे त्यांना भारतरत्न देऊ  पाहणाऱ्यांना माहीत आहे काय? ‘‘आधुनिक  संस्कृती आणि आधुनिक विचार हा शोधांतून, नावीन्याच्या हव्यासातून विकसित झालेला आहे. या सर्वाचे प्रतिबिंब चित्रपटांत पडते,’’ असे मानणाऱ्या सावरकरांनी इंग्लंडमधील वास्तव्यात आपण कसा विविध विषयांवरील सिनेमाचा मुक्तपणे आस्वाद घेतला हेदेखील नमूद करून ठेवले आहे. तेव्हा आपल्या विचारांच्या नसलेल्या चित्रपटांवर बंदी घालण्याची सर्रास मागणी करणाऱ्यांच्या गळी हे सावरकर उतरतील काय?

या सावरकरांनी १९३९ साली केलेल्या एका भाषणात हिंदू आणि मुसलमान कसे सुखासमाधानाने राहू शकतील यावर विवेचन केले आहे. ‘सर्व नागरिकांना समान अधिकार असायला हवेत’, ‘मुक्त विचारस्वातंत्र्य, पूजाअर्चेचे स्वातंत्र्य सर्वानाच असायला हवे’, ‘अल्पसंख्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्था आदींचे स्वातंत्र्य असायला हवे’, ‘त्यांच्यासाठी सरकार स्वतंत्र काही खर्च करू शकते परंतु त्या रकमेचे प्रमाण त्या समाजाकडून दिल्या जाणाऱ्या कररकमेशी निगडित ठेवावे’, अशी सावरकरांची सूचना होती. ती ‘हिंदूंनाही लागू करावी’ असे त्यांचे म्हणणे होते हे समान नागरी कायद्याची एकतर्फी आणि अज्ञानी भुणभुण लावणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. याचे कारण आजही ‘हिंदू अविभक्त कुटुंब’ असे कारण पुढे करीत कर कमी करण्याची मुभा हिंदूंनाच आहे. ती अर्थातच अहिंदूंना नाही. याचा अर्थ समान नागरी कायदा झालाच तर हिंदूंना अन्य धर्मीयांप्रमाणे कर भरावे लागतील. समान नागरी कायद्याचा सोयीस्कर वापर करणाऱ्यांना ही बाब ठाऊक आहे काय?

इतकेच नव्हे तर हिंदूंप्रमाणे मुसलमानांनीही आधुनिकतेची कास धरायला हवी, असा सावरकरांचा आग्रह होता. त्यासाठी मुसलमानांनी तुर्कस्थानच्या केमाल पाशा याचा आदर्श ठेवावा, अशी त्यांची मसलत होती. हे सर्व मुसलमानांनी त्यांच्या भल्यासाठी करायला हवे, हे त्यांचे म्हणणे आज इस्लामी विश्वातच केमाल पाशा नकोसा झालेला असताना किती महत्त्वाचे आहे ते कळते. या दोघांनीही.. म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांनी.. प्रगतिशील युरोपचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला हवे, हा त्यांचा आग्रह. का? तर ‘आमच्या यज्ञ, याग, वेद, धर्मग्रंथ, त्यातील शापउ:शाप यामुळे युरोपचे काहीही वाकडे झाले नाही त्याप्रमाणे तुमच्या तावीज, नमाज, कुर्बानी.. हेही त्यांना रोखू शकत नाहीत,’ हे सावरकरांचे मत भारतास विश्वगुरू वगैरे करू पाहणाऱ्यांना आजही पेलणार नाही.

त्या वेळेस बिहारमध्ये झालेला भूकंप हा जातीप्रथा न पाळल्यामुळे निसर्गाचा झालेला कोप आहे, असे विधान महात्मा गांधी यांनी केले होते. त्याचा सुयोग्य समाचार घेणारे सावरकर, केवळ गांधींवर टीका केली म्हणून हिंदुत्ववाद्यांना प्रिय असतील तर या मंडळींनी केरळातील पूर महिलांवरील शबरिमला मंदिरप्रवेशबंदी उठवल्यामुळे आला असे म्हणणाऱ्यांची वासलात सावरकरांनी कशी लावली असती, याचाही विचार करावा.

तेव्हा सद्य:स्थितीत आजचे नवहिंदुत्ववादी सावरकरांना भारतरत्न दिले जावे या मागणीने सुखावतीलही. पण हे सुख अज्ञानातील आहे. या अज्ञानाचाच धिक्कार सावरकरांनी आयुष्यभर केला. म्हणून नक्की कोणते सावरकर आपल्याला हवेत याचा विचार ज्ञानेच्छूंनी करावा. या ज्ञानापेक्षा भारतरत्न मोठे नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2019 1:10 am

Web Title: loksatta editorial on maharashtra bjp proposed bharat ratna for veer savarkar zws 70
Next Stories
1 नोबेलमागची गरिबी
2 एक सौरव बाकी रौरव
3 चर्चाचऱ्हाटाचा ‘अर्थ’
Just Now!
X